आजऱ्यात जिल्हा बँकेकरिता कांटे की टक्कर …’ डी फॅक्टर’चा फॉर्म्युला सुरू
नेहमीप्रमाणे यावेळीही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके करीता आजरा तालुक्यात विकास सेवा संस्था गटातून मोठी चुरस निर्माण झाली आहे. निवडणूक अत्यंत अटीतटीची असल्याने मतदारांचा भाव चांगलाच वधारला असून असून आता ‘डी फॅक्टर’ हा फॉर्म्युला वापरात येऊ लागला असल्याची चर्चा आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात निवडणूकीतील चुरस प्रचंड वाढत चालले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात एका रोमांचक वळणावर आली आहे.
काय आहे ‘डी फॅक्टर.’…?
आजरा तालुक्यात विविध सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘डी फॅक्टर’ची चर्चा नेहमीच असते ‘डी फॅक्टर’ याचा साधा सोपा सरळ अर्थ ‘देसाई फॅक्टर’ असा आहे. तालुक्यामध्ये राजकारणात देसाई मंडळींचे वर्चस्व नेहमीच राहिले आहे विशेषतः अण्णा-भाऊ संस्था समूह वगळता इतर सर्व छोट्या-मोठ्या संस्थांमध्ये देसाई मंडळींचा प्रभाव प्रचंड आहे.विविध संस्था उभारणीतही या मंडळींचा वाटा मोठा राहिला आहे. स्व.अमृतकाका देसाई, स्व. बळीरामदादा देसाई,माजी आमदार स्व. वसंतराव देसाई, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. राजारामबापू देसाई, श्रीपतराव देसाई यांच्यासह अनेक देसाई मंडळी तालुक्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहेत. ज्या-ज्या वेळी राजकारणामध्ये प्रमूख ‘देसाई’ मंडळी अडचणीत आली त्या-त्या वेळी इतर सर्व ‘देसाई’ मंडळींनी एकत्र येऊन त्यांना अडचणीतून बाहेर काढण्याकरता शर्थीचे प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग तो आजरा कारखान्यात तत्कालीन अध्यक्ष स्व. वसंतराव देसाई यांच्यावर आलेला अविश्वास ठरावाचा प्रसंग असो अथवा जनता बँक, तालुका संघ, आजरा साखर कारखाना या बड्या संस्थांच्या निवडणुका असोत… या मंडळींनी एकत्र येऊन अनेकांना तारण्याचे व अडचणीतून बाहेर काढल्याचे प्रकार घडले आहेत. याचा फटका ‘देसाईतर’मातब्बर मंडळींना वेळोवेळी बसलेला आहे. हे सुद्धा नाकारता येत नाही. इतकेच नाही तर तालुक्यात राजकीय वर्चस्व असणाऱ्या प्रमुख देसाई मंडळींच्या विरोधात गेलेल्या काही देसाई मंडळीनाही या फॅक्टरचा फटका बसल्याने अनेकांना विविध संस्थांमधून अलगदपणे बाजुला व्हावे लागले आहे हा देखील इतिहास नाकारता येत नाही. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणूक निमित्ताने अण्णा – भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व सुधीर देसाई हे समोरासमोर उभे ठाकले आहेत. निवडणूक कमालीची चुरस आहे. दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जात आहे. दोन-चार ठराव धारकांच्या मतदानावरच विजयाचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार हे अवलंबून असल्याने नेहमीप्रमाणे आता ‘डि फॅक्टर’ ची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आजरा तालुक्यातील ठरावधारकांमध्ये ‘देसाई’ मंडळीही मोठ्या प्रमाणात आहेत. शेवटच्या टप्प्यात ‘डि फॅक्टर’ ची चर्चा जोरात सुरू झाल्याने याचा कितपत परिणाम या निवडणुकीत होणार यावरही उमेदवारांचे यशापयश अवलंबून आहे हे नक्की…

आजरा टू-व्हिलर मेकॅनिकल असोशिएशन पदी मनोज पंडित…
आजरा तालुका टु-व्हिलर मेकॅनिकल असोशियएशनच्या सन २०२१-२२ करिता नूतन अध्यक्ष पदी मनोज पंडित , उपाध्यक्षपदी इम्रान भडगावकर तर सेक्रेटरीपदी संदेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
आजरा महाविद्यालयात ‘स्वच्छ भारत हरित भारत’ वर कार्यक्रम
आजरा महाविद्यालयामध्ये यांची एनसीसी विभाग व नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ भारत.. हरित भारत’ या विषयावर प्रा. मलिकार्जुन शिंत्रे यांचे व्याख्यान पार पडले. प्रा. शिंत्रे यांनी या वेळी नेहरू युवा केंद्र हे एक जागतिक स्तरावरील सर्वात मोठे युवा संघटन असून याद्वारे विविध सामाजिक पर्यावरणीय, कला, क्रीडा कौशल्य विकास, आरोग्य जनजागृती, ग्रामीण युवक विकास शिबिरे, व्यसनमुक्ती, बालविकास अशा विविध उपक्रमांतर्गत युवकांना मार्गदर्शन केले जाते त्यांच्या कौशल्य वाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण स्तरावर काम सुरू आहे त्याचा फायदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य ए.एन. सादळे यांनी युवकांनी आपली राज्य व देशपातळीवरील जबाबदारी ओळखून स्वयंप्रेरणेने विधायक भूमिका घ्यावी जेणेकरून राष्ट्र निर्माणासाठी त्यांची मदत होऊ शकेल असे सांगितले. कार्यक्रम प्रसंगी डॉ. संजय चव्हाण, डॉ. रणजीत पवार, गणेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफीज तगारे यांनी केले, तर आभार रत्नाकर चाळके याने मानले.
आजरा साखर कारखाना गाळप स्थिती
दिवस -४५
एकुण गाळप १,२०,९९० मे.टन
एकुण साखर , उत्पादन १,३५,४५० क्विंटल
सरासरी उतारा- ११.१७





आजऱ्यात जिल्हा बँकेकरिता कांटे की टक्कर …’ डी फॅक्टर’चा फॉर्म्युला सुरू