

वडकशिवाले येथील मंदिरातील घंटांची चोरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वडकशीवाले ता. आजरा येथील कलेश्वर व हनुमान मंदिरातील पितळी घंटा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. सुमारे २७ किलो पितळेच्या या दोन घंटा ११ जुलै रोजी रात्री चोरीस गेल्याने मंदिराचे पुजारी हणमंत गुरव यांनी पोलीसांत धाव घेतली आहे.
सदर प्रकारामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
संसारोपयोगी साहित्यानंतर आता घंटा लक्ष्य ..
चोरट्यांकडून तांब्याचे बंब, घागरी अशा संसारोपयोगी साहित्याच्या भुरट्या चो-यांचे प्रकार वारंवार घडत असतात. तांबे व पितळ धातूचे दर वाढल्यामुळे आता चोरट्यांनी थेट मंदिरातील पितळी घंटांना लक्ष्य बनवले आहे. यापूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मंदिरांमधील घंटांची चोरी झाल्याचे प्रकार घडले आहेत.

आठवडा बाजार गेला पाण्यात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरामध्ये शुक्रवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापारी वर्गासह तालुका वासीयांची चांगलीच धांदल उडाली.
सकाळच्या सत्रात कडकडीत ऊन असल्याने तालुकावासीयांनी आठवडा बाजारासाठी गर्दी केली होती. परंतु दीड वाजण्याच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढे सुमारे दोन तास पाऊस सुरू होता. पावसामुळे मुख्य बाजारपेठेसह शिवाजीनगर मधील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. बाजारामध्ये दुकाने मांडणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच अडचण झाली.

विजय पोतदार, सुधाकर वजारे यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील जनता शिक्षण संस्था सेवकाची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विजय अशोक पोतदार तर उपाध्यक्षपदी सुधाकर दत्तू वंजारे यांची निवड झाली आहे. आजऱ्याचे सहाय्यक निबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी बी. एस. येजरे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षपदासाठी श्री. पोतदार यांचे नाव सुनिल गणपती नाईक यांनी सुचविले. तानाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी श्री. वंजारे यांचे नाव विनायक गंगाधर चव्हाण यांनी सुचविले संजय बापुराव सावंत यांनी अनुमोदन दिले.
श्री. येजरे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. सर्वांना विश्वासात घेवून काम करणार असल्याचे अध्यक्ष श्री. पोतदार व उपाध्यक्ष श्री. वंजारे यांनी सांगीतले. या वेळी सर्व संचालक उपस्थित होते. सुनिल पाटील यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.

पाऊस –पाणी
आजरा शहर व परिसरात गेल्या २४ तासात (शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत ) ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आंबेओहोळ मध्यम प्रकल्पामध्ये ८३% तर चित्री मध्यम प्रकल्पांमध्ये ६२.०९ टक्के इतका पाणी साठा झाला आहे.

