शनिवार ६ जून २०२६


एका क्षणात संसार संपला… होण्याळीत चार चितांनी गाव हादरले.
मुलगा, सून आणि दोन चिमुकल्यांना अखेरचा निरोप; आई,बहिणींचा हंबरडा पाहून गावही गहिवरले

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर–बहिरेवाडी मार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झालेल्या दीपक दत्तात्रय चांदे (वय ३५), शोभा दीपक चांदे (वय ३१), पूर्वा दीपक चांदे (वय ६) आणि जय दीपक चांदे (वय ७) या चौघांवर त्यांच्या मूळ गावी होण्याळी येथे शुक्रवारी सकाळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातील चार जीव काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले .
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान अंत्यविधी पार पडला. गावातील प्रत्येक व्यक्ती, रस्ता, प्रत्येक घर सुन्न झाले होते. एकाच वेळी एकाच कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच दुर्दैवी घटना होन्याळी पंचक्रोशीने अनुभवली. अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर ओठांवर शब्दच नव्हते.
अंत्यसंस्कारावेळी आई निशा यांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या काळजाला चिरून जाणारा होता. “माझी लेकरं मला सोडून गेली…” असा आक्रोश करत त्या वारंवार बेशुद्ध पडत होत्या. मुलगा, सून आणि दोन निष्पाप नातवंडांचे मृतदेह समोर पाहून त्यांचा आक्रोश पाहवत नव्हता.
बहिणी रेश्मा घाणेकर आणि सुष्मा गावडे यांचाही हंबरडा उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. वर्षभरापूर्वीच भावाचे निधन झाले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच पुन्हा काळाने घाला घालत संपूर्ण संसार उद्ध्वस्त केला. त्यामुळे आई निशा पूर्णपणे पोरक्या झाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
या चौघांना प्रथमेश चांदे या भावाच्या मुलाने मुखाग्नी दिला. एकाच वेळी चार जणांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार होत असताना संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. चितेचा धूर आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.
अंत्यसंस्कारावेळी पोलीस प्रशासनामार्फत सुदर्शन कांबळे व जमीर मकानदार उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, चुलत भाऊ आनंदा चांदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
उत्तूर–बहिरेवाडी मार्गावरील त्या भीषण अपघाताने चांदे कुटुंबाचा संसार एका क्षणात हिरावून घेतला.

शुद्ध घनसाळ बियाणे निर्मितीसाठी जिल्हा परिषदेची विशेष नाविन्यपूर्ण योजना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून यावर्षी काही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे नियोजन करणेत आले आहे. यानुसार देशी वाण संवर्धन करण्याच्या हेतूने आजरा घनसाळ शुद्ध बियाणे निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. यासाठी सोमवार दिनांक ०८ जुन रोजी दुपारी एक वाजता आजरा तालुक्यातील घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा,शेतकरी मेळावा मृत्युंजयकार कै. शिवाजीराव सावंत स्मृतीदालन आजरा याठिकाणी आयोजित केला आहे. यामध्ये विविध तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी इ. उपस्थित राहणार आहेत.तरी तालुक्यातील जास्तीत जास्त घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्री गाडे, उपसभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.सुधीर देसाई, श्री.शिरीष देसाई,गटविकास अधिकारी श्री. सुभाष सावंत व कृषि अधिकारी श्री. दिनेश शेटे यांनी केले आहे.

आजरा येथे ‘भारत ई-सेवा केंद्र’ (जनता एजन्सी)चा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नागरिकांना शासकीय व ऑनलाइन सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आजरा येथे ‘भारत ई-सेवा केंद्र’ (जनता एजन्सी) सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन आजरा येथील तहसिलदार समीर माने साहेब यांच्या शशहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार श्री. म्हाळसाकांत देसाई आणि श्री. विकास कोलते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक प्रो. डॉ. अशोक बाचुळकर यानी केले. या केंद्राच्या माध्यमातून आता नागरिकांना विविध शासकीय दाखले, अर्ज आणि इतर ऑनलाइन सुविधा एकाच ठिकाणी अत्यंत जलद गतीने मिळणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार असून प्रशासकीय कामात सुलभता येईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या प्रसंगी जनता गृहतारण संस्थेचे संचालक, अखिल भारतीय मराठा महासंघ पदाधिकारी व सदस्य, आजरा तालुका सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, पेन्शनर संघटना, ग्राहक कल्याण फौंडेशन, नागरिक, व्यापारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेला उत्तम सेवा देण्याचा मानस जनता एजन्सीचे संचालक मारुती मोरे यांनी व्यक्त केला असून, नागरिकांनी या सेवा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बुरुडे येथे खरीप हंगाम पूर्व बैठक संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरुडे येथे खरीप हंगाम पूर्व बैठक पार पडली. या बैठकीसाठी तालुका कृषी विभागाची अधिकारी जगताप व कृषी सहाय्यक संकेत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये जगताप यांनी प्रमुख मार्गदर्शन केले .
आपल्या भागामध्ये घेतल्या जाणाऱ्या ऊस. भात. नाचणी. भुईमूग पिकाविषयी माहिती देण्यात आली व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा व सेंद्रिय शेतीवर भर द्या असे सांगितले. तसेच शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी उपसरपंच सुनील बागवे. अमित गुरव. नामदेव रेडेकर .विजय कांबळे. दौलती कांबळे. मारुती घेवडे. परशुराम होण्याळकर. चंद्रकांत होण्याळकर. रामराव कांबळे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

वृक्षारोपणाने आईच्या स्मृती राखण्याचा प्रयत्न…
वाटंगी येथील देसाई कुटुंबीयांचा उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी येथील विजय देसाई यांच्या कुटुंबीयांनी आपल्या आईच्या तिसऱ्या दिवसाच्या कार्यानिमित्त पारंपरिक रक्षाविसर्जन न करता. आमच्या शेतामध्ये आंब्याची झाडांची लागवड केली व श्रुती चिरंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला योगायोग आज पर्यावरण दिन त्याचे औचित्य साधुन आम्ही देसाई कुटुंबीयांनी. आईच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत लावलेले हे वृक्ष तिच्या प्रेम, संस्कार आणि जीवनमूल्यांचे जिवंत स्मारक ठरतील. तिच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, हीच या उपक्रमामागील भावना आहे असे विजय देसाई यांनी स्पष्ट केले.

गोकुळ न्यूज
जिल्ह्यामध्ये कागल तालुका ठरावात आघाडीवर राहील आणि राष्ट्रवादीचे ठराव उच्चांकी करण्यासाठी प्रयत्न करूया. निवडणूक पार्श्वभूमीवर काही गोष्टी घडत असतील त्या विसरून जाऊन एक दिलाने कामाला लागूया. मुख्यमंत्री फडणवीस सांगतील त्याप्रमाणे पॅनलची रचना केली जाईल असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
तर गोकुळच्या ठरावाचे राजकारण उफाळून आले असून काही संस्थांनी या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी संस्थेला जास्तीत जास्त पैशांची मागणी करण्याबरोबरच नोकरीचा शब्दही घेण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
देशामध्ये अनेक एटीएम मध्ये पैसे काढताना ग्राहकांना त्रास होत असून एटीएम मध्ये पैशाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक एटीएम वर क
खडखडाट असून पैसे नसल्याने खरिपाच्या तयारीला लागलेल्या बळीराजाचे रोख रक्कम नसल्यामुळे हाल होत आहेत.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयीसुविधांचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनची चाहूल लागली असून कोल्हापूर, आजरा, इचलकरंजीसह ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.वातावरणातील उष्माही कमी झाला आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ६ जून २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : षष्ठी ( ७ जून रात्री ०२.४० पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (सकाळी ०६.०२ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : इन्द्र योग (सकाळी १०.०३ पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : गराजा करण (दुपारी ०२.०४ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मकर राशी (सायंकाळी ०७.०३ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.१९ ते सकाळी १०.५८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी ०१.०४
सूर्योदय : सकाळी ०६.०१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आ


