सुळे येथे पत्नीचा डोक्यात हातोडासदृश्य वस्तू घालून पतीकडून खून

आजरा : प्रतिनिधी
सुळे ता. आजरा येथील सुमन संभाजी पोवार या ४५ वर्षीय महिलेचा पती संभाजी ईश्वरा पोवार याने चारित्र्याचा संशयावरून डोक्यात हातोडासदृश्य हत्याराने वार करून खून केल्याची घटना निदर्शनास आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती संभाजी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदर गुन्ह्याची कबूली दिल्याचे समजते.
सौ.सुमन व संभाजी पोवार हे दाम्पत्य एकत्र रहात होते. संभाजी पोवार यांची सुमन ही दुसरी पत्नी आहे. या दाम्पत्याची तीनही उच्चशिक्षित मुले पुणे येथे रहातात. सध्या सुळे येथे दोघेच पती पत्नी रहात होते.
या दोघांमध्ये वारंवार सौ.सुमन यांच्या चारित्र्यावरुन वाद होत असत. काल रात्रीही त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाला. या वादानंतर संभाजी यांनी हातोडा सुदृश्य हत्याराने सौ. सुमन यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. यामध्ये सुमन या जागीच मयत झाल्या.
या प्रकारानंतर संभाजी हा नेहमीप्रमाणे मुख्य घराच्या पाठीमागून बाजूस असलेल्या दुसऱ्या घरामध्ये झोपण्यासाठी निघून गेला. दरम्यान सकाळी तो मुख्य घरी आल्यावर सुरुवातीला सुमनना आपण फक्त ढकलले होते असे सांगितले. मात्र नंतर त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पांडुरंग धोंडीबा वळतकर राहणार तावरेवाडी ता. गडहिंग्लज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजी याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
या घटनेमुळे सुळे गावात खळबळ उडाली असून पोलीस पुढील माहिती घेत आहेत.


