सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५

शक्तिपीठ विरोधात आज मोर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज सोमवार दि १८ रोजी आजरा तहसील कार्यालयावर शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाची जय्यत तयारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
गेले आठदहा दिवस वेगवेगळ्या गावात मोर्चाच्या तयारीसाठी जोरदार बैठका घेण्यात आल्या आहेत. मोर्चाबाबत बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले तालुक्यातील प्रस्तावित दाभिल, शेळप, पारपोली, खेडगे, आंबाडे, धनगर मोळा, घाटकरवाडी आणि नव्याने सुचविलेल्या जेऊर, चितळे, कासारकांडगाव, भावेवाडी या गावांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे, मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने उतरणार आहेत.
मुकुंदराव देसाई, रियाज शमनजी, अल्बर्ट डिसोझा, विद्याधर गुरबे संजय तरडेकर, राजेंद्र गड्यानवार, अमर चव्हाण, युवराज पोवार, नागेश चौगुले, रवींद्र भाटले, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, कॉ. शांताराम पाटील, नौशाद बुड्डेखान, विक्रम देसाई, कृष्णा सावंत, दिनेश कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आजऱ्यात आज दहीहंडीचा थरार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरात आज राघव सरदेसाई युवा मंच व स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्हीही मंडळांनी दहीहंडीची जंगी तयारी केली आहे.
दहीहंडीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. राघव सरदेसाई युवा मंच ची दहीहंडी आजरा हायस्कूलच्या प्रांगणामध्ये बांधण्यात येणार असून विजेच्या संघाला १,११,१११/- रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
स्वराज्य तालीम मंडळाची दहीहंडी शिवतीर्थ समोरील परिसरात बांधण्यात येणार आहे. विजेत्या संघाला ५५,५५५/- रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

बाप्पांचा मार्ग खडतर…
खड्डे व चिखलातून मुर्त्या नेताना करावी लागणार कसरत…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना शहर व परिसरात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे सर्वत्र चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गणेश आगमना सर विसर्जन करतेवेळी मुर्त्यां ने-आण करताना भक्तमंडळींना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
नगरपंचायतीकडून ठीक ठिकाणी मुरूम टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु जोरदार पावसामुळे त्यावर मर्यादा येताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कालावधीत गल्लीबोळातील मार्ग हे मागील वर्षाप्रमाणेच खडतर राहणार आहे.

नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरू
प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धी अधिसूचना आजपासून

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून आज सोमवार दिनांक १८ ऑगस्ट पासून प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीचे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सदर भौगोलिक सीमा प्रसिद्ध केल्यानंतर सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ दुपारी तीन वाजेपर्यंत या अधिसूचनेवर हरकती व सूचना सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. सदर हरकती व सूचना मुख्याधिकारी आजरा यांचेकडे दाखल करण्याच्या आहेत.

शाळकरी अनुजचे अकस्मित निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील रोझरी इंग्लिश स्कूल येथे शिकणारा विद्यार्थी कु. अनुज देवचंद पाटील (रा. मुरूडे, वय १४) यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या या गुणी व अभ्यासू विद्यार्थ्याच्या निधनाने शाळेत व गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कु. अनुज हा शांत, अभ्यासू, नम्र स्वभावाचा होता. शिक्षकांचा व मित्रांचा लाडका असलेल्या या विद्यार्थ्याचा शालेय स्पर्धांमध्ये सहभाग उल्लेखनीय होता. आजारपणामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो शैक्षणिक उपक्रमांपासून दूर राहिला होता; मात्र आजाराशी जिद्दीने लढा देत असताना त्याने दाखवलेली धैर्याची भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
अनुजच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिक, पालकवर्ग आणि विद्यार्थी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.

पार्वती शंकर बाल मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी

उत्तूर : (मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा/ मंदार हळवणकर)
श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट व पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या बालमंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली.कार्यक्रमाला संस्था संचालक प्रतिनिधी सौ. नम्रता करंबळी, सौ. प्रणाली करंबळी, पालक प्रतिनिधी सौ. वृशाली कुदळे व सौ. ज्योती पाटील उपस्थित होत्या. प्रास्ताविकात शिक्षिका सौ. भारती शिवणे यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील आदर्श गुणांवर प्रकाशझोत टाकला. विद्यार्थ्यांनी भजन, नृत्य व पाळणा सादर करून वातावरण भक्तिमय केले.
यानंतर क्रीडांगणावर दहीहंडीचा जल्लोष रंगला. आकर्षक सजावटीतील दहीहंडीचे पूजन मान. श्री विनायक करंबळी यांच्या हस्ते झाले. लहान, मध्यम व मोठ्या गटातील गोपगोपिकांनी तीन थर रचून दहीहंडीला सलामी दिली. शेवटी हर्ष प्रमोद सुर्वे या बालकृष्णाने दहीहंडी फोडली आणि एकच जल्लोष झाला.सूत्रसंचालन श्री. एम. एल. काकडे यांनी केले, तर व्यवस्थापन मुख्याध्यापिका सौ. गौरीनी चाळक व शिक्षकवृंद यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी, उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. पाकले, प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे उपस्थित होते.
संवेदना फाउंडेशन मार्फत आरदाळ प्रशालेत ग्लोबल डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मेडलाईन इंडिया व संवेदना फाउंडेशन आजरा यांच्या सहकार्याने माध्यमिक विद्यालय आरदाळ येथे ग्लोबल डिजिटल क्लासरूम संगणक लॅब चे उद्घाटन सुधाकर होडगे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव पन्हाळकर होते.
मुख्याध्यापक शरद पाटील यांनी शाळेला मिळालेल्या ५ लॅपटॉप्सबद्दल आभार मानले. संवेदना फाउंडेशनचे युवराज तिप्पे यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. सुरेश देशमुख यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले, तर संजय येजरे यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. उद्घाटक सुधाकर होडगे यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल युगात संगणक क्षेत्रात प्रगती करून ग्लोबल व्हावे असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष शिवाजीराव पन्हाळकर यांनी या लॅबमुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल असे सांगितले. या वेळी शाळेच्या ब्लॉगचे उद्घाटन झाले तसेच जोतिबा पुंडपळ यांनी संगणक लॅबसाठी खुर्च्या भेट दिल्या. शेवटी वृक्षारोपणही करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सुधाकर होडगे (उद्घाटक), शिवाजीराव पन्हाळकर (अध्यक्ष), सुरेश देशमुख, संजय येजरे, युवराज तिप्पे, समीर चव्हाण, पांडुरंग तोरगले, सरपंच रुपाली पाटील, संग्राम पारळे, सिंधुताई आजगेकर, जीवन आजगेकर, राजर्षी शाहू शिक्षण मंडळ संस्थेचे संचालक बजरंग पुंडपळ, विलास पुंडपळ, अमोल बांबरे, सचिन पावले, पांडुरंग साळोखे, मुख्याध्यापक शरद पाटील, शंकर पावले (माजी मुख्याध्यापक), शंकर पावले (माजी सरपंच), दशरथ पावले (व्हाइस चेअरमन सेवासंस्था), तानाजी गुरव (संचालक सेवा सोसायटी), सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, दुंडाप्पा शिवणे (मुंबई), सुहास कोंडूसकर (शिक्षक), सदाशिव पावले (कोल्हापूर), समीर मारुती शिवणे (पुणे), जोतिबा पुंडपळ (आर्मी, पुणे), शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन लक्ष्मण लोहार यांनी केले व आभार किरण चव्हाण यांनी मानले.

रानभाज्या दैनंदिन आहाराचा घटक बनणे आवश्यक : श्री. आमणगी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निसर्गात विपुल प्रमाणात आढळणाऱ्या रानभाज्या या दैनंदिन आहाराचा अविभाज्य घटक बनल्या पाहिजेत, तरच सर्वांचे आरोग्य सुदृढ व सक्षम होईल, असे प्रतिपादन सरपंच श्री. किरण आमणगी यांनी केले.
नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज, उत्तूर तसेच कृष्णा व्हॅली ॲग्री ॲडव्हान्स सेंटर यांच्या वतीने रानभाजी प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्री. किरण आमणगी, उपसरपंच सौ. समीक्षा देसाई, आजरा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. गणपतराव चव्हाण व प्राचार्य श्री. रामकृष्ण मगदूम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध २७ प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने व त्यांपासून तयार केलेल्या पाककृती प्रदर्शित केल्या. तसेच रानभाज्यांची विक्रीही करण्यात आली. उत्तूर परिसरातील अनेक खवय्ये व नागरिकांनी रानभाज्यांची उत्स्फूर्त खरेदी करून विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य श्री. रामकृष्ण मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सोनल गिलबिले, अक्षता मोरे, रेश्मा माळगावकर, नेहा खोत, गीता पाटील व विशाल वडवळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. विद्या शिवणे यांनी केले.


