mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि. १७ ऑगस्ट २०२५         

कोवाडे येथे पालखी सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोवाडे (ता. आजरा) येथे ज्ञानेश्वर माऊलीच्या ७५० व्या पुण्यतिथी निमित पालखी सोहळा उत्साहात झाला. यानिमित्त गावात दिंडी निघाली.ग्रामपंचायतीच्यावतीने याचे आयोजन केले होते.

सरपंच संतोष चौगले, उपसरपंच वंदना देसाई यांच्या हस्ते पालखीचे पुजन झाले. कोवाडे बसस्थानकापासून दिंडीला प्रारंभ झाला. अभंगाच्या व टाळमृदंगाच्या गजरात दिंडी निघाली. महीला व युवतींनी फुगडी घातली. सातेरी मंदिर येथे दिंडीची समाप्ती झाली. विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. महीलांनी दिंडीचे औंक्षण केले. ग्रामपंचायत सदस्य मनोहर जगदाळे, रघुनाथ गुरव, गिता देसाई, किरण साळी, सोनाबाई हंदळेकर, रेश्मा सावंत, कुमार चिमणे, विजय जांभळे, संजय देसाई, ग्रामसेवक विद्या भोसले यासह वारकरी सांप्रदायचे सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामस्थ, महीला उपस्थित होत्या.

प्राथमिक शाळा परिसरात हत्ती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खानापूर तालुका आजरा येथे प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये शुक्रवारी रात्री चक्क हत्तीने दोन तास मुक्काम ठोकला होता.

सदरचे वृत्त गावकऱ्यांना समजताच हत्तीला पहाण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या परिसरातील माडाची झाडे हत्तीने कोसळून घातली.

निधन वार्ता
आनंदा कांबळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हाळोली ता. आजरा येथील आनंदा कोंडीबा कांबळे (वय ५८ वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, सून, दोन भाऊ असा परिवार आहे. ते जिल्हा बँकेच्या आजरा शाखेमध्ये शाखाधिकारी म्हणून काम पाहत होते.

कै. मुकुंदराव आपटे फाउंडेशनतर्फे वृद्धांना ‘स्टील स्टिक’चा आधार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)

सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कै. मुकुंदराव आपटे फाउंडेशन तर्फे पंचक्रोशीतल्या वृद्धांना चालण्यासाठी आधाराचा हात देण्यात आला आहे. वयोमानानुसार येणारे पायांचे विकार, गुडघ्यांचे त्रास, चालताना जाणवणारे असंतुलन यामुळे अनेक वृद्धांना दैनंदिन जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. परिस्थितीअभावी महागडे उपचार किंवा गुडघ्याचे ऑपरेशन करणे अनेकांना शक्य होत नाही. अशा वेळी फाउंडेशनचे सर्वेसर्वा उमेश आपटे यांनी गरजू वृद्धांना उंचीप्रमाणे समायोजित करता येणाऱ्या स्टील स्टिक मोफत उपलब्ध करून देत चालण्यास नवा आधार दिला आहे.

फाउंडेशनतर्फे हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून, आतापर्यंत हजाराहून अधिक वृद्धांना या स्टिकचे वाटप करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या वितरण उपक्रमात आरदळ, भादवण, धामणे आणि बहिरेवाडी या गावांतील २०० हून अधिक वृद्धांना स्टिक देण्यात आल्या.
याआधीही फाउंडेशनने समाजसेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. उत्तूर व भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रांना जलद व कार्यक्षम आरोग्य सेवा मिळावी यासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे हे त्यातील एक उल्लेखनीय पाऊल आहे. आरोग्य सुविधा आणि समाजकार्यातील या सातत्यपूर्ण योगदानामुळे फाउंडेशनची कामगिरी विशेषत्वाने उठून दिसते.

फाउंडेशनच्या कार्याबाबत बोलताना उमेश आपटे म्हणाले ,“समाजकार्य हेच माझे ध्येय आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना आरोग्य सुविधा पुरवत राहीन. लोकांच्या तक्रारी जाणून घेऊन सरकारमार्फत अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन. या कार्यात मला सहकाऱ्यांची अमूल्य साथ मिळत आली आहे.

या उपक्रमासाठी संग्राम घोडके, अमित येसादे, अमोल भांबरे, बंडू उतूरकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांचेही योगदान लाभले.

ओम भोलेनाथ सेवा संस्थेकडून पांडुरंग जाधव यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हंदेवाडी ता.आजरा येथील ओम भोलैनाथ विकास सेवा संस्थेकडून गावचे सुपुत्र व एलआयसी चे कोल्हापूर शाखेचे विभागीय अधिकारी श्री. पांडुरंग जाधव यांची केंद्रीय कार्यालयाकडून पश्चिम क्षेत्रसाठी स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड मेंबर म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत श्री. जनार्दन बामणे यांनी केले. यावेळी चेअरमन अरुण जाधव पोलीस पाटील पुंडलिक फडके रामभाऊ फडके गणपत जाधव यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.

आभार पांडुरंग शिवुडकर यांनी मानले.

केंद्रशाळा पेरणोलीत
लेखक आपल्या भेटीला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जीवनाचा निखळ आनंद घेण्यासाठी हसले पाहिजेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी केले . लेखक आपल्या भेटीला कार्यक्रमांतर्गत ते पेरणोली येथील केंद्र शाळेत बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुष्का गोवेकर यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांची २५० पुस्तक प्रकाशित झाली असून विविध क्षेत्रात त्यांचे ५९९ विश्वविक्रम झालेले आहेत. शंभर टॉप विश्वविक्रममधील बहुमान देखील त्यांना मिळालेला आहे . या अनुभवाच्या आधारे त्यांनी शीळ वादन, सही वरून मनोविश्लेषण, ज्योतिष हस्ताक्षर मनोविश्लेषण ,अक्षर रेखाटन याविषयी मुलांना मार्गदर्शन केले आपल्या एकपात्री प्रयोगातून त्यांची संवाद साधताना अनेक बोधपर क्लुप्त्या, विनोद करून मुलांना दिलखुलास हसवले.
मूल्यसंस्कारासाठी साहित्याची ओळख ही मुलांना प्राथमिक स्तरावर झाली पाहिजे .असे मुख्याध्यापक एकनाथ पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई, पत्रकार रणजीत कालेकर यांनी आपले मत मांडले.

कार्यक्रमाला सौ.कविता नाईक सौ. सुप्रिया पाटील . शैलेश कांबळे त्याचबरोबर विद्यार्थी बालचमू उपस्थित होते.

पावसाची रिपरीप कायम…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह परिसरात पावसाची सुरूच आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या सरी अधून मधून कोसळत आहेत.

सततच्या पावसाच्या रिपरिपिमुळे शहरभर चिखल व पाण्याच्या डबक्यांचे साम्राज्य पसरले आहे. ऐन  श्रावणात  हिरण्यकेशी व चित्रा नदी तुडुंब भरून वाहत आहे

स्वातंत्र्य दिन विशेष

पंडित दीनदयाळ विद्यालय

पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा मध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून स्वातंत्र्य चळवळीवर आधारित कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ऑपरेशन सिंदूरवर आधारित कु.शरण्या सुधीर कुंभार कु. दूर्वा भास्करराव बुरुड, कु. आदीला झाकीर लमतुरे या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरेश गुरव,अनिल कुंभार परेश सुतार संदीप ढवळ आणि इतर विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला L.E.D टीव्ही भेट देण्यात आला. केंद्र शासनाच्या नवभारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या साक्षरांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. ‘हर घर तिरंगा ‘मोहिमे अंतर्गत तिरंगा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सौ. शुभदा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा विमल भुसारी वहिनी, संस्थेचे सचिव मलिकुमार बुरुड, संचालक सुधीर कुंभार,भिकाजी पाटील, नाथ देसाई,स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष दयानंद भुसारी,सल्लागार अरुण देसाई,प्रकाश पाटील, आनंदा कुंभार तसेच जेमी डिसोजा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बुरुड यांनी केले आभार प्रकाश प्रभू यांनी मानले.

पार्वती शंकर विद्या संकुल

श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट, उत्तूर व पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री. बसवराजआण्णा करंबळी यांच्या हस्ते संपन्न झाले. संचालक श्री विनायक करंबळी, उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही. एम. पाकले व प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी तालबद्ध संगीत कवायत सादर केली. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पदसंचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
भावगीत-भक्तीगीत गायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला. शासनाच्या नवसाक्षर अभियानातील २२ नवसाक्षरांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त तीन दिवस ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. १३ ऑगस्ट रोजी सुभेदार बळवंत येलकर यांनी विद्यार्थ्यांना संकटांना सामोरे जाण्याचा संदेश दिला, तर १४ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त जवान तानाजी शिवणे यांनी शिस्त, प्रामाणिकपणा व स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले.
संस्थेने आजी-माजी जवानांचा गौरव करून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधले. शेवटी संचालक मंडळाने सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे

बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत गवसेच्या सरपंच सौ. रेखा रणजीत पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत गवसेचे उपसरपंच श्री. यल्लाप्पा बागडी, श्री. महादेव हेब्बाळकर,श्री. शिवाजी पाटील, श्री. सचिन पाटील, श्री. रणजीत पाटील, श्री दशरथ कांबळे,श्री. सहदेव नेवगे, श्री. वीरशेखर माने इत्यादींसह ग्रामस्थ मंडळी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री दिग्विजय भूतल व स्टाफ उपस्थित होता. मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत घुणे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्री. महाजन ए. एस. यांनी केले.

साळगाव

साळगाव ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच बबन भंडारी यांच्या हस्ते तर विद्या मंदिर साळगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानदेव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक विश्वास व्हळतकर, निवृत्ती कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आकर्षक नृत्य सादर केले.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे रवींद्र हुक्केरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. अंजनी देशपांडे, सौ. गीता पोतदार, बंडोपंत चव्हाण, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

सिरसंगी ग्रामपंचायत

स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत सिरसंगी चे ध्वजारोहण सरपंच श्री.संदीप चौगले यांनी केंद्रशाळा सिरसंगी शाळेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील राज्यस्तरीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी कु.प्रेरणा उत्तम कुंभार हिच्या हस्ते करणेत आले. तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.संजीव नाईक यांचाही सत्कार करणेत आला.सरपंचांनी घेतलेल या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरदाळ

माध्यमिक विद्यालय आरदाळ येथे स्वातंत्र्य दिनाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर पाहुणे, शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. संतूमामा शिवणे आणि तानाजी गुरव (वायरमन) संचालक श्री.भैरीदेव सेवा संस्था, आरदाळ यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी देशविषयक घोषणा दिल्या, कवायत प्रकार आणि देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण भारावून टाकले. यानंतर प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय आरदाळ येथील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून ग्रामपंचायत आरदाळ येथे पोहोचले. येथे ग्रामपंचायत प्रांगणात गावच्या सरपंच रूपालीताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत प्रांगणात अर्दाळकर ग्रुपच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल बक्षीस वितरण करण्यात आले. मेहंदी स्पर्धेतील प्रथम क्रमांक रसिका सुतार द्वितीय क्रमांक रागिनी आजगेकर तृतीय क्रमांक धनश्री भाटले विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

सोहाळे येथे एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

साळगाव येथे गव्याच्या धडकेत तरुण जखमी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!