mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

आजरा शहरासह तालुक्यात विजयादशमी उत्साहात

                  आजरा : प्रतिनिधी

      आजरा शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये विजयादशमी उत्साहात पार पडली. ठिकठिकाणी ग्रामदेवतांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तू ,सोने-चांदी,वहाने खरेदीकडे नागरिकांचा कल दिसत होता. त्यामुळे बाजारपेठेत बऱ्यापैकी उत्साहाचे वातावरण होते.

        सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गा माता मूर्तींचे भावपूर्ण वातावरणात सवाद्य विसर्जन मिरवणुका काढून विसर्जन करण्यात आले.

         आजरा येथील पालखीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखीसोबत आनंदा कुंभार, पोलीस पाटील सागर पाटील, धनाजी पारपोलकर, सुधीर कुंभार, आनंदा नाईक, संभाजीराव सावंत यांच्यासह देवस्थानचे मानकरी व पंचमंडळी उपस्थित होती.

        गेल्या नऊ दिवसांमध्ये पोलीस व गृह रक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.


ऊस उत्पादकांनी आजरा कारखाना पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी सहकार्य करावे : . बसवकिरण स्वामी


                     आजरा : प्रतिनिधी

          आजरा साखर कारखाना आजही सहकार तत्वावर चालू आहे. बंद झालेला कारखाना पुन्हा सर्वाच्या सहकार्याने चालू झाला आहे. एकीकडे साखर कारखानदारी अडचणीत असतानाही आजरा साखर कारखाना मात्र सहकार तत्वावर सुरू आहे. कारखाना चालवणारी माणसे चांगली आहेत, त्यामुळे हे शक्य झाले आहे. चालू गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला पुरवून कारखान्याचे चार लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन प.पू. बसवकिरण स्वामी यांनी केले

      आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा “बॉयलर अग्नि प्रदीपन व होमहवन विधी” समारंभ संचालक मधुकर कृष्णराव देसाई व त्यांच्या पत्नी सौ. मंगल मधुकर देसाई यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी स्वामीजी बोलत होते.कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी चेअरमन सुनिल शिंत्रे होते

       स्वागत प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी केले. प्रास्ताविक चेअरमन प्रा.सुनील शिंत्रे यांनी केले.

        कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, अंजनाताई रेडेकर, मुकुंदराव देसाई,वसंतराव धुरे,मारुती घोरपडे,सुभाष देसाई,सौ. विजयमाला देसाई, दशरथ अमृते, अनिल फडके,सौ.सुनीता रेडेकर,तानाजी देसाई, यांच्यासह कारखान्याचे बहुतांश संचालक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


आज माघार…

पेरणोली, मेंढोली, हरपवडेसह वेळवट्टी येथील नेत्यांची कसोटी

                  आजरा : प्रतिनिधी

       आजरा तालुक्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या दहा ग्रामपंचायतीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून पेरणोली, मेंढोली, वेळवट्टी,हरपवडे येथे मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने कार्यकर्त्यांना शांत करण्याचे आव्हान स्थानिक नेतेमंडळींसमोर आहे. तर देऊळवाडी व चांदेवाडी ग्रामपंचायत बिनविरोधची अधिकृत घोषणा आज होईल.

      आज बुधवारी दिनांक २५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे ती प्रक्रिया तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर संबंधित उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

 जागा  ९… इच्छुक ४७…

……..पेरणोली ग्रामपंचायत….

           सरपंच पद – सर्वसाधारण महिला

माधवी जयवंत येरुडकर, विद्या शिवाजी तिबिले,दिपाली सचिन देसाई, शुभदा अमित सावंत, राजश्री दीपक देसाई, प्रियंका संतोष जाधव

.……………प्रभाग एक (३ जागा )……………

१.अनुसूचित जाती स्त्री राखीव

कमल तानाजी कांबळे अश्विनी गौतम कांबळे

२. सर्वसाधारण महिला राखीव 

कीर्ती उर्फ रेखा किशोर परब,
अनिता संजय सोले,रूपाली पांडुरंग पाईम अश्विनी नामदेव वांद्रे

३ सर्वसाधारण प्रवर्ग

श्रावण परशराम जाधव, संदीप तुकाराम सासुलकर, कृष्णा शिवाजी सावंत, अनिल रामा पारदे
इनास डूमिंग फर्नांडिस, रणजीत धनाजी फगरे

…………….प्रभाग दोन ( ३ जागा)…………..

१. अनुसूचित जाती प्रवर्ग

संपत तानाजी जाधव, दीपक राणबा लोखंडे, सर्जेराव दत्तू जाधव,अमोल राजाराम जाधव, रामचंद्र जोतिबा कांबळे, शंकर राणबा मांग

२.सर्वसाधारण महिला राखीव

संजीवनी मारुती नावलकर,सुनिता बाळासाहेब कालेकर,दिपाली सचिन देसाई, संध्या संतोष कालेकर

३.सर्वसाधारण प्रवर्ग

दीपक शामराव देसाई, वैभव भरत भिउंगडे,
संतोष शंकर नावलकर, अरविंद विष्णू नावलकर, संदीप निवृत्ती नावलकर, सचिन संपत देसाई, औदुंबर तुकाराम हवालदार सुरेश विष्णू कालेकर

……………..प्रभाग तीन (३ जागा)…………..

१. नागरिकांचा मागास प्रवर्ग

संदीप तुकाराम सासुलकर, संकेत बाळासाहेब सावंत,शेखर पांडुरंग गुरव, अविनाश तुकाराम सुतार, पांडुरंग विठोबा गुरव

२ व ३ सर्वसाधारण महिला राखीव

सिंधू निवृत्ती मोहिते, राजश्री दीपक देसाई, गीताताई कृष्णा लोंढे, माधवी जयवंत येरुडकर, सुषमा नामदेव मोहिते ,वनश्री रवींद्र देसाई,शुभदा अमित सावंत,रेश्मा कृष्णा सावंत,सुनिता श्रीधर येरुडकर,स्वाती राजेंद्र कालेकर,संगीता हरिबा कांबळे


मधुकर क्रमित यांच्याकडून   पालखी विश्रांतीसाठी दहा गुंठे जमीन

                      आजरा : प्रतिनिधी

       गेली बरीच वर्षे प्रलंबित असलेला दसऱ्यानिमित्त निघणाऱ्या पालखीच्या विश्रांती स्थळाचा प्रश्न ज्येष्ठ भाविक मधुकर क्रमित यांच्यामुळे निकाली निघाला असून स्वमार्कीची १० गुंठे जमीन त्यांनी पालखी विश्रांतीसाठी कट्टा बांधण्यासह देवस्थान समितीकडे सुपूर्त केली आहे.

        आज निघणाऱ्या पालखीचे औचित्य साधून त्यांचा स्थानिक समितीच्या वतीने सत्कार तहसीलदार सुरज माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आनंदा कुंभार, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई,सुधीर कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे,माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी,माजी नगरसेविका संजीवनी सावंत, आनंदा नाईक, पोलीस पाटील सागर देसाई यांच्यासह मानकरी व मान्यवर उपस्थित होते.



 सिमोलंघन  नेत्यांचे… निमित्त दसरा मेळाव्याचे


३५ पुरणपोळ्या खाऊन ढेकर द्यायचे, नवरा-बायकोत भांडण लावायचं आणि…, उद्धव ठाकरेंनी सांगितली भाजपाची परंपरा

        ♦️ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या घणाघाती भाषण करत एकनाथ शिंदेंवर आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या ४० आमदारांवर जोरदार टीका केली आहे. तसंच भाजपाची परंपरा काय? तेदेखील सांगितलं आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचेही आभार मानले आहेत. तसंच आत्ताच्या सरकारचा उल्लेख डायरचं सरकार असा केला आहे.

भाजपाची परंपरा काय? उद्धव ठाकरे म्हणाले..

        “आज जे जमले आहेत तिकडे ते आमच्यावर टीका करतील त्यांना मी किंमत देत नाही. जातीपातीच्या भिंती उभ्या करुन सगळ्यांना आपसांत लढवण्याचं काम जे भाजपा करतं आहे ते आपल्याला मोडून काढायचं आहे. ज्यांच्याशी आपण लढतो आहोत तो (भाजपा) कपटी आहे. भाजपा इतका विघ्नसंतोषी आहे की कुणाचंही लग्न असो हे जाणार पंगतीत बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. श्रीखंड पुरी, बासुंदी, ३५ पुरणपोळ्या खाणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करुन ढेकर देणार. पण लग्नातून निघताना नवरा बायकोत भांडण लावून निघणार असली ही (भाजपा) अवलाद आहे.

स्वातंत्र्य लढ्याचा आणि भाजपाचा संबंध नाही…

       मी परत एकदा सांगतो भाजपा असो किंवा त्याकाळातला जनसंघ असेल यांचा कुठल्याही लढ्याशी संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात ते नव्हते, मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांचं नाव ऐकलं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले? संयुक्त महाराष्ट्र समितीत आले. कशासाठी आले? आयतं अन्न शिजतंय चला हात मारु म्हणून आले. सगळ्यात शेवटी हे आले आणि सर्वात आधी बाहेर पडले. जागावाटपाचं भांडण त्यावेळी त्यांनी केलं. विघ्नसंतोषीपण म्हणतात तो यालाच.”

      असल्या विघ्नसंतोषी अवलादीपासून सावध राहा…

         त्यानंतर भाजपा जनता पक्षाबरोबर गेली तिथे दुहेरी वाद निर्माण केला, तोडफोड केली. मग शिवसेनेबरोबर आले, कधी अकाली दलाबरोबर गेले, कधी नितीश कुमारांबरोबर कधी यांच्या बरोबर कधी त्यांच्या बरोबर गेले. गोव्यात मगो पक्षाबरोबर गेले. जिथे जाते तिथे ती सत्यानास करते त्यामुळे भाजपापासून सावध राहण्याची गरज आहे. आजही भगवा मानाने आणि डौलाने फडकतो आहे त्या भगव्यातही भाजपाने दुही माजवली. अहमद शाह अब्दाली आला होता त्यानेही हेच केलं होतं. दुहीची बीजं पेरायची भांडणं लावायची आणि त्या भांडणातले खरे प्रश्न बाजूला सारायचे. तुमच्या चुली पेटवण्यापेक्षा आम्ही तुमची घरं आम्ही पेटवतो आणि त्यावर आम्ही आमची पोळी भाजतो हे यांचं धोरण आहे. आता हे सगळं उघड उघड दिसतंच आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


“आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि…”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप ; म्हणाले, “मी साक्षीदार.”

      ♦️आझाद मैदानातून दसरा मेळाव्याला सुरुवात होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर तोफ डागायला सुरुवात केली. “५० खोके, एकदम ओके” असा आरोप शिंदे गटावर झाला आहे. या टीकेवरून त्यांनी ठाकरे गटाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

       एकनाथ शिंदे म्हणाले की, रक्ताचं नातं सांगण्याऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी आहे. त्यांनी कोणतीही सीमा ठेवली नाही. निर्लज्जपणाचा कळस गाठला. आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर त्यांनी शिवेसनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. पण ५० कोटी द्यायला बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे. त्यामुळे ठाकरेंनी निर्लज्जपणे पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांवर आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडेच मागता. या एकनाथ शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले.

       “मी सांगितलं यांचं प्रेम बाळासाहेबांवर नाही, विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही. कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले की यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. योग्य वेळेला बोलेन”, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.

       “आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर यात आश्चर्य वाटालयाल नको. त्या पापात आपण सहभागी नाही हे समाधान आहे. बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना हे डोक्यावर घेऊन फिरत आहेत”, अशीही टीका त्यांनी केली.


देशात नवीन आजाराचा कहर ! संपूर्ण गाव गूढ तापाच्या विळख्यात…

५०० हून अधिक आजारी

♦️ गेल्या काही वर्षात अनेक नवीन आजारांनी माणसाला हैराण करुन सोडले आहे. कोरोना विषाणूने तर जगभर कहर केला होता. आता अशाच एक घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे. देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद गावात गूढ तापाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले असून ५०० हून अधिक लोक या तापाच्या विळख्यात आहेत.

       प्रत्येक घरात आजारी लोकांची संख्या वाढत असून त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण या तापाच्या विळख्यात आहेत. वाढते आजार पाहून आरोग्य विभागाचे पथकही खडबडून जागं झाले आहे. प्रशासनाकडून लोकांना औषधे देताना खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

         मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदीनगर, गाझियाबादच्या भानेरा गावात गूढ तापामुळे सुमारे १० लोकांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. या आजाराची माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक गावात पोहोचले, तेथे डझनभर लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. जवळपास दररोज १०० हून अधिक लोक हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये पोहोचत आहेत. २० सप्टेंबरच्या सुमारास गावातील काही लोकांना ताप आला होता. त्यानंतर ही साथ संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली.

आरोग्य विभागाकडून डेंग्यू व विषाणूची तपासणी…

       आरोग्य विभागाचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी घरोघरी जाऊन डेंग्यू आणि विषाणू संसर्गाच्या लोकांची तपासणी केली. मात्र, हा आजार कसा पसरला आणि लोकांना आपला जीव का गमवावा लागतोय? हे डॉक्टरांच्या टीमने अद्याप सांगितलेले नाही. गावाशेजारी काही तलाव असून तेथे पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याचे समजते. तलावातील पाणी कुजल्याने डासांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरल्याचे बोलले जात आहे.

अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस…

       आरोग्य विभागाचे पथक गेल्या तीन दिवसांपासून गावात तळ ठोकून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. गावात स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत आहे. आरोग्य जिल्हा देखरेख अधिकारी डॉ. आर के गुप्ता यांनी सांगितले की सर्व काही नियंत्रणात आहे आणि निष्काळजीपणा प्रकरणी ग्यासपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. अन्सारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Newssource…https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq

संबंधित पोस्ट

राजकीय घडामोडी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कोरीवडे सेवा संस्थेचे ९० सभासद अपात्र… आजऱ्यात ना. सतेज पाटील समर्थकांचा जल्‍लोष यासह आजरा स्थानिक बातम्या

mrityunjay mahanews

उमेश आपटे यांचा राष्ट्रीय काँग्रेसला रामराम

mrityunjay mahanews
error: Content is protected !!