रविवार ७ जून २०२६

होन्याळी येथील गव्याच्या धडकेतील २४ वर्षीय तरुणाचा अखेर मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मित्राच्या घरी धार्मिक कार्यानिमित्त मुंबईहून आलेल्या होन्याळी ता. आजरा येथील २४ वर्षीय साहिल सुरेश कानोलकर हा तरुण पाच दिवसापूर्वी मलकापूर / शाहुवाडी येथे दुचाकी वरून जाताना गव्याने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.
साहिल व त्याचा मित्र दुचाकीवरून मलकापूरच्या दिशेने चालले होते दरम्यान त्याला गव्याने जबर धडक दिल्याने त्याच्या डोक्याला व फुफ्फुसाला मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई,वडील व बहीण असा परिवार आहे. शनिवारी त्याच्या मृतदेहावर होन्याळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदे कुटुंबीयातील चौघांच्या अपघाती निधनानंतर पाठोपाठ साहिलचा मृत्यू झाल्याने होन्याळी पंचक्रोशी पुन्हा एकदा हादरुन गेली आहे.

तुफानी पावसाने आजऱ्याला झोडपले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व परिसराला शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तुफानी वाऱ्यासह पावसाने झोडपले. पावसामुळे बळीराजाच्या कामांना गती आली आहे.
शनिवारी दुपारी एक वाजता अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली.सुमारे तासभर पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्यासह कांही घरांचे पत्रे,छप्पर उडून गेले येथील सीड फार्म शेजारी/ सुतार गल्लीत काही कुटुंबीयांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली. पावसानंतर हवेत गारवा निर्माण झाला होता.

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच : तहसीलदार समीर माने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वृक्षांची लागवड व त्याचे संगोपन करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे आले पाहिजे. पर्यावरण आरक्षणाची आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन तहसीलदार समीर माने यांनी केले.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पुढाकाराने येथील कृषी विभागाच्या परिसरात तहसीलदार श्री. माने, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील , आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची रोपण करण्यात आले.
यावेळी पेरणोलीच्या सरपंच वनश्री देसाई, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जी. एम. पाटील, नगरसेवक अनिकेत चराटी, माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, वाय.जी. इंजल, धनाजी पाटील, युवराज देसाई ,गीता पाटील, भिकाजी पाटील, दत्तात्रय पाटील, अनिल पाटील, धनाजी दळवी, संजय सावंत ,अरविंद गावडे, मारुती बुरुड ,रूपाली कांबळे, आदी उपस्थित होते.
उपकृषी अधिकारी पी.जी. पाटील यांनी आभार मानले.

ग्रीन क्लब उत्तूरच्या वतीने पर्यावरण दिन उत्साहात साजरा

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रीन क्लब उत्तुरतर्फे श्री जोमकाई देवी परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी बांबू प्रचारक सतीश कांबळे, बापूसाहेब लोखंडे उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले सुमारे ५० वृक्षांची रोपे यावेळी लावण्यात आली. कार्यक्रमास ग्रीन क्लबचे सदस्य शैलेंद्र अमनगी, अतुल देशपांडे, अरविंद पोवार, महेश करंबळी, संदेश रायकर ,प्रदीप लोकरे, विजय पाटील, दीपक भाईगडे, तुषार राबळ, मंदार हळवणकर आदी उपस्थित होते..


आजचे पंचांग
दिनांक ७ जून २०२६ रविवार
माह : अमावस्यात अधिक जेष्ठ
माह : पूर्णिमात अधिक ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : सप्तमी /८ जून पहाटे ३.२४ पर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र/ सकाळी ७.५५ पर्यंत त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : वैधृती योग सकाळी १०.०१ पर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग
करण : विस्ती भद्रा करण दुपारी ३.७ पर्यंत त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त : राहू कळ सायंकाळी ५.३४ ते ७.१३ पर्यंत
शुभ मुहूर्त : अभिजीत दुपारी १२.११ ते दुपारी १.०४
सूर्योदय : सकाळी ६.०१
सूर्यास्त सायंकाळी : ७.१३
संवस्तर : पराभव
संवस्तर उत्तर : रौद्र
विक्रम संवत : २०८३ विक्रम संवत
शकसंवत : १९४८ शक संवत


