mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरूवार  दिनांक १७ ऑक्टोबर २०२४

अशोकअण्णा व  मंत्री हसन मुश्रीफ यांचे मनोमिलन…?

कागलमध्ये मुश्रीफ यांच्यासोबत तर राधानगरीमध्ये आमदार आबिटकर यांच्यासोबत …

         ज्योतिप्रसाद सावंत

मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है…? ‘ असा खुला सवाल करत जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात दंड ठोकून खुले आव्हान देणारे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत कागल विधानसभा मतदारसंघात तर आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत राधानगरी-भुदरगड मतदारसंघात राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दोघांचीही नुकतेच मनोमिलन झाले आहे‌ असेही समजते.

      अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व धाडसी नेता अशी ओळख असणाऱ्या अशोकअण्णा चराटी व मंत्री मुश्रीफ यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून मतभेदाची दरी निर्माण झाली होती. अण्णांनी थेट भाजपाची वाट धरल्यानंतर ही दरी अधिकच रूंदावली. आजरा तालुका खरेदी विक्री संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व आजरा साखर कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून चराटी व मुश्रीफ यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. चराटी यांनी ताकतीने मंत्री मुश्रीफ यांना वेळोवेळी विरोध करण्याचे काम केले. परंतु मंत्री मुश्रीफ यांच्याशी घेतलेला ‘पंगा’ चराटी यांना महागातच पडत गेला. आजरा साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना एक हाती सत्ता मिळवून देण्यात मुश्रीफ यांचा सिंहाचा वाटा होता. एकीकडे मुश्रीफ आक्रमकपणे चराटी यांना विरोध करत असताना दुसरीकडे जिल्हास्तरीय नेते मंडळी स्थानिक राजकारणात चराटी यांच्या मदतीला येत नाहीत असा नाराजीचा सूरही चराटी यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात होता. यामध्ये तथ्य देखील आहे.

     परंतु गेल्या अडीच- तीन वर्षापासून राज्यातील राजकीय वातावरण बदलत गेले. अनपेक्षितरित्या मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या अजीतदादा पवार यांच्या गटातून भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला‌. या निर्णयामुळे आजरा तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांना महायुती धर्म पाळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. गेले काही दिवस बेरजेच्या राजकारणात अव्वल असणारे मंत्री मुश्रीफ यांनी ही संधी साधत त्यांच्या मतदारसंघातील चराटी यांचे राजकीय वजन ओळखून चराटी यांना सोबत घेण्याविषयी हालचाली सुरू होत्या.

      झाला गेला संघर्ष विसरून विधानसभा निवडणुकीत अशोकण्णा चराटी व मंत्री मुश्रीफ यांनी एकत्र येण्याचे दोनच दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. चराटी यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना तशी कल्पनाही दिली आहे असेही समोर येत आहे. लवकरच जाहीर मेळावा घेऊन या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचेही समजते.

      अखेर अशोकअण्णा व मंत्री मुश्रीफ यांचे मनोमिलन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मनोमिलनामुळे विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात बऱ्याच घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राधानगरीत आबिटकर यांच्यासोबत तर चंदगड मध्ये शिवाजीराव पाटील यांना साथ देणार?

     कागल विधानसभा मतदारसंघातील भूमिका स्पष्ट होत असतानाच चराटी यांनी राधानगरी मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत तर चंदगड विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव पाटील यांच्यासोबत रहाण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

तरीही मुश्रीफ यांचे कौतुकच…

मंत्री मुश्रीफ व अशोक चराटी यांच्यातील राजकीय संबंध  मध्यंतरीच्या कालावधीत बिघडले होते. तरीही चराटी  मुश्रीफ यांच्या विकास कामांचे व कार्यपद्धतीचे वेळोवेळी  जाहीररीत्या कौतुकच करताना दिसत होते.

टेम्पोची चारचाकीला धडक लाखाचे नुकसान…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

           आजरा- आंबोली मार्गावर देवर्डे फाट्या नजीक मालवाहू टेम्पोने चार चाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चार चाकी चे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी टेम्पो चालक साजिद इन्तेखाब खान रा. तनवर नगर,मुंब्रा, जिल्हा ठाणे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     देवर्डे फाट्या नजीकच्या वळणावर टाटा अल्ट्रो टेम्पो (एम एच ४३ सी के ४५७९) या गाडीने मारुती नेक्सा (जीए ०८ एके ७२५०) या मडगाव,गोवा येथील विष्णू शेठ शिरोडकर यांच्या गाडीला मागून जोराने धडक दिली. सुदैवाने यामध्ये चार चाकीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अन्यथा रेशन वाटप बंद…

आजरा तालुका रेशन धान्य दुकानदार संघटननेचा इशारा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वाटंगी येथील रेशन धान्य दुकानदारास दमदाटी करून त्याच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी उमेश बाबासो घोरपडे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणास्तव गुन्हा दाखल करावा अशी मागणी आजरा तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी यांचे कडे आजरा तालुका रेशन धान्य दुकानदारांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर प्रकरणी सदर कार्यवाही न केल्यास आजरा तालुका रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने ०१ नोव्हेंबर २०२४ पासून पूर्ण आजरा तालुक्यातील ८७ रेशन धान्य दुकानदारांकडून रेशन वाटप बंद करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

      याप्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय येसादे ,उपाध्यक्ष शंकर कसलकर,खजिनदार जीवन आजगेकर, गुणाजी साबळे, प्रमोद कांबळे, भास्कर मोरे, गीता देसाई, छाया धनवडे, सागर सुतार, जावेद दरवाजकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व रेशन धान्य दुकानदार उपस्थित होते.

हाजगोळी मार्गावर वृक्षतोड :पर्यावरण प्रेमीमधून संताप

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हाजगोळी  मार्गावर वृक्षतोड होत असल्याने नागरीकासह पर्यावरण प्रेमीमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

      गडहिंग्लज- आजरा मार्गावरून हाजगोळीकडे जाताना झाडांची कत्तल करून मार्गात अडथळा निर्माण केला आहे. मोठी झाडे तोडण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

ज्ञानमंदिरे उभारण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : सचिन देसाई


            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       समाजातील ज्यांच्या संवेदना जागृत आहेत अशा तरुणांनी ज्ञानमंदिरे उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सचिन देसाई यांनी केले ते वाटंगी येथील प्राथमिक शाळेच्या ग्लोबल क्लासरूमच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच संजय पवार होते

        ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे . तांत्रिक साधने हाताळताना पालकांनी व मुलांनी सुरक्षितता राखणे महत्त्वाचे आहे . आपल्या बशाचामोळा भुदरगड येथील शाळेची यशोगाथा सांगताना ते म्हणाले की मला तरुणांनी साथ दिली म्हणून त्या शाळेचा कायापालट करू शकलो . शिक्षकांनी सुद्धा आदर्श व प्रेरणा मिळेल असे कार्य करायला हवे . संवेदना फौंडेशन व मेडलाईन इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल क्लासरूमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते व संजय भोसले प्रवक्ते संवेदना टीम यांच्या हस्ते करण्यात आले . सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . यावेळी कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर, शिवाजी , विजय देसाई , सुरेश शिंगटे, पांडुरंग बोर आप्पासाहेब कुराडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले

     सरपंच संजय पोवार म्हणाले, लॅपटॉप हाताळताना मुलांनी भीती न बाळगता बिनधास्त वापरावा, आनंदाने माहिती मिळवावी व तंत्रज्ञानाचा योग्य तो फायदा करून घ्यावा भविष्यातील तंत्रज्ञान विस्तारणारे असून त्याचा वापर करायला शिकणारेच टिकणार आहेत. संवेदनाच्या विविध उपक्रमांची माहिती डिजिटल बोर्ड च्या माध्यमातून श्री . संतराम केसरकर, सुरेश देशमुख , गिरीधर रेडेकर , अनिकेत कांबळे आदी मान्यवरांनी दिली. मुख्याध्यापक सुनील कामत यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले .

        गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, उपसरपंच मीनाक्षी देसाई, मधुकर जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक अनिल देसाई ग्रामसेवक रणजीत पाटील , रणजित देसाई, पुंडलिक नाईक , उमाजी कुंभार , सुभाष नाईक ,अविनाश कांबळे ,उमेश घोरपडे अविनाश घोरपडे शाळा व्यवस्थापनाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969



 

 

संबंधित पोस्ट

बाहुबली कोण ?आज फैसला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रात्रीस खेळ चाले… पोलीसांकडून चौघांना अटक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!