mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

बुधवार 

१५ जुलै २०२६

सौ.अस्मिता मृत्यू प्रकरणी पतीसह चौघांना पोलीस कोठडी

कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी

मुलगी झाल्यामुळे सासरच्या नातेवाईकांनी टोमणे मारल्याच्या राग, वारंवार होणारा शारीरिक आणि मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक यामुळे सौ. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २९, रा. सायबर चौक, कोल्हापूर) या विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पती प्रतीकसिंह वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर, सासरे वीरेंद्र काटकर आणि ननंद ऋतुजा काटकर चौघे राहणार सायबर चौक यांची सोमवारपर्यत (दि. २०) पोलिस कोठडीत रवानगी झाली.

लाटगाव ता. आजरा येथील सौ.अस्मिताचे वडील अजित सरदेसाई व आई सौ. संगीता सरदेसाई यांनी अस्मिताच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींवर आरोप करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या असून यातील अस्मिताच्या सासुरवाडीच्या मंडळींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. आजरा तालुक्यामध्येही याप्रकरणी निवेदन देऊन संशयीतांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेकांनी याप्रकरणी न्यायासाठी सरदेसाई कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सुशिक्षित मंडळींचा अडाणीपणा…?

काटकर कुटुंबीय हे सुशिक्षित आहे. तरीदखील एखाद्या अशिक्षित व अडाणी कुटुंबीयांप्रमाणे त्यांचे वर्तन समोर येत आहे. मुलगाच होणार म्हणून मुलाचेच कपडे खरेदी करणे, लग्नानंतरचे सर्व व्यवहार सरदेसाई कुटुंबांच्या माथी मारणे, अस्मिताला अपमानास्पद बोलणे यासारखे प्रकार निश्चितच हे कुटुंब सुशिक्षित  आहे का ? असा प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहेत

तालुक्यात दोन बिबट्यांचा वावर…

चांदेवाडीत बकरे पळवले तर झुलपेवाडीत हल्ल्यात कुत्रे ठार

आजरा तालुक्यामध्ये दोन बिबट्यांचा वावर स्पष्ट झाला असून चांदेवाडीत पुन्हा एक वेळ बिबट्याने अमर भुजंग हसबे यांचे बकरे पळवले आहे तर झुलपेवाडी येथे पाळीव कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे ठार केले आहे.

 आजरा तालुक्यातील मौजे झुलपेवाडी (जाधव माळ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

खंडू आप्पा जाधव यांच्या पाळीव कुत्र्यावर जंगलालगतच्या परिसरात वन्य प्राण्याने हल्ला केला. पंचनाम्यादरम्यान कुत्र्याच्या मान व खांद्यावर चाव्याच्या व ओरखड्यांच्या जखमा आढळून आल्या. तसेच परिसरात वन्य प्राण्याचे पावलांचे ठसेही दिसून आले. जखमांचे स्वरूप व घटनास्थळावरील परिस्थितीवरून हा हल्ला प्रथमदर्शनी बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. चांदेवाडी येथे मात्र त्याच्या अस्तित्वाच्या नव्याने खुणा आढळल्या नसल्याचे वनविभागाने सांगितले.

घटनास्थळी वनपाल सागर पोवार, वनरक्षक रुद्रगौडा पाटील, प्रकाश शिंदे, पोलीस पाटील तानाजी भंडारी, अशोक लोहार तसेच वन्यजीव बचाव पथकाचे समीर केरकर, सौरभ कोंडुस्कर व साहिल डेळेकर उपस्थित होते.
वन विभागाने गावात जनजागृती करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रात्री एकटे बाहेर न पडणे, पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवणे आणि बिबट्या आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी : ‘कुणबी’ दाखले तातडीने द्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिंदे समितीच्या नोंदीनुसार सापडलेल्या ‘कुणबी’ नोंदी असलेल्या व्यक्तींना तातडीने कुणबी जातीचे दाखले देण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ, आजरा तालुका यांच्याकडून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंदे समितीने कोल्हापूर जिल्ह्यात 5566 तर आजरा तालुक्यात 719 कुणबी नोंदी शासनाकडे सादर केल्या आहेत. मात्र अद्याप संबंधितांना दाखले मिळालेले नाहीत.

ग्रामस्तरावरील तलाठी व इतर कर्मचाऱ्यांमार्फत नोंद असलेल्या नागरिकांना माहिती देऊन त्यांना दाखले मिळवून देण्यासाठी मदत करावी, अशी विनंतीही महासंघाने केली आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, दत्तात्रय मोहिते, गणपतराव डोंगरे, संभाजी इंजल,प्रकाश देसाई, सि. डी.सरदेसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाची दखल घ्या : वृक्षप्रेमी समूहाचे पंतप्रधानांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे १५-१६ दिवसांपासून उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत ‘वृक्षप्रेमी समूहा’ने आज पंतप्रधानांच्या नावे तहसीलदारांना निवेदन दिले.

समूहाने आंदोलनातील मागण्यांच्या वादात न पडता, लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करण्याची भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणाऱ्या वांगचूक यांच्या आरोग्याकडे तातडीने लक्ष देऊन केंद्र सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना वृक्षप्रेमी समूहाचे श्री. वृषालआण्णा हूक्केरी, श्री. सुभाष विभुते, सौ. पुष्पलता घोळसे, डॉ. गौरी भोसले आणि श्री. विलास पोवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भादवण हायस्कूलमध्ये गुणवंत-यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण : भादवण हायस्कूलमध्ये एस.एस.सी. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, पालक, दाते, हितचिंतक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक आर.जी. कुंभार यांनी सर्वांचे स्वागत केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर केले.

अध्यक्षस्थानी असले शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के.जी. पटेकर यांनी शाळेच्या भौतिक सुविधांबरोबरच गुणात्मक विकासावर भर द्यावा आणि विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक संधी शोधाव्यात असे सांगितले. प्रमुख पाहुण्या सरपंच माधुरी गाडे यांनी विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी टी.बी. मुळीक यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळवलेल्या यशाचे विशेष गौरव केले.

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह पाचवी ते नववीतील गुणवंतांचा, तसेच विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही देण्यात आली. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या कार्याचे कौतुक झाले.

लक्ष्मी चौगुलेने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पी.एस. गुरव यांनी केले तर आभार व्ही.एच. गवारी यांनी मानले.

सरंबळवाडी येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ ‘ कार्यक्रम संपन्न

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सरंबळवाडी, ता. आजरा येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमांतर्गत विद्या मंदिर, सरंबळवाडी तसेच डॉ. शंकरराव उत्तुरे माध्यमिक विद्यालय,सरंबळवाडी प्रांगणात वृक्षारोपण करणेत आले.त्यानंतर श्री. शिवराज सरंबळे यांच्या शेतात चारसुत्री भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले.

पं.स. सदस्य श्री. समीर पारदे, माजी जि.प. सदस्य सौ. सुनिता रेडेकर, मा. सरपंच सौ. सुनिता कांबळे, ग्रा.पं. सदस्य, ग्राम पंचायत अधिकारी श्री.एस. एस. दुंडगेकर, सहाय्यक कृषि अधिकारी वाय. के. जगताप, अन्नदाता शेतकरी गटाचे सर्व सदस्य, प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

छाया वृत्त

हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पत्रकार पुंडलिक सुतार, शंकर कातकर,दिनकर कांबळे,शीतल कदम,शंकर शिंदे यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे दिला आहे.सदर रस्त्याचे सध्या मूरुमीकरण करण्यात आले असून या मुरुमावरून पावसात चालताना लोकांची दमछाक होते आहे असेही ठरावात म्हटले आहे.

फोटो क्लिक…

वडाचा गोंंड स्मशान भूमीतील दहन विधीसाठी तयार करण्यात आलेल्या भिडाच्या चितांची अवस्था दयनीय झाली आहे. दहनविधी करताना अडचणी येऊ लागल्या आहेत.

आजचा वाढदिवस 

सौ. मनीषा गोविंद गुरव 

माजी महिला व बालकल्याण समिती सभापती 

संपर्क : ९६८९८ ७३५५१

आजचे पंचांग

दिनांक : १५ जुलै २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : प्रथम तिथी (सकाळी ११.५० पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : पुष्य नक्षत्र (रात्री ०९.४६ पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
योग : हर्षण योग (सकाळी ०८.०३ पर्यंत) त्यानंतर वज्र योग
करण : भाव करण (सकाळी ११.५० पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कर्क राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४४ ते दुपारी ०२.२३ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.१०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

प्रतिभाताई कांबळे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!