


रामतीर्थ यात्रेस आजपासून सुरुवात
आजरा:प्रतिनिधी
आजरा येथून जवळच असणाऱ्या रामतीर्थ परिसरातील महाशिवरात्री यात्रेस आज पासून सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. कोकणासह कर्नाटक व महाराष्ट्रातील इतर भागातून या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात.
यात्रेनिमित्त येथे विविध प्रकारची खेळण्यांची दुकाने, स्टॉल्स, मिठाईची दुकाने, शीतपेयांची दुकाने यांची मांडणी करण्यात आली आहे. यात्रा स्थळी खाजगी वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला असून एसटी आगाराने विशेष बस फेऱ्यांची सोय केली आहे.
आरोग्य विभागासह पोलीस प्रशासन हे यात्रा सुरळीत पडण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करीत आहे. नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी गेले आठ दिवस येथील यात्रेचे नियोजन करीत आहेत. पोलीस व गृह रक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या शनिवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.
अन्याय निवारण समितीचे विशेष लक्ष
गेले पंधरा दिवस यात्रेमध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता स्थानिक अन्याय निवारण समिती विशेष लक्ष ठेवून आहे. समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर ,गौरव देशपांडे,राजू विभूते, वाय. बी. चव्हाण, यशवंत इंजल, विलास नलवडे आदी मंडळी या परिसरातील सोयी – सुविधा सक्षमपणे पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ऐन यात्रेदिवशी बस फेऱ्यांची बोंब
रामतीर्थ यात्रा असतानाच आजरा आगाराकडून अनेक मार्गावरील बस फेऱ्या रद्द करण्यात आले आहे यामुळे आजरा आगार प्रवाशांच्या सेवेसाठी नाही तर गैरसोयीसाठी आहे हे पुन्हा एकदा आगारांने सिद्ध करून दाखवले आहे.
शुक्रवार दिनांक ८ रोजी महागोंड, गडहिंग्लज, धनगरवाडा, बेलेवाडी, पाटगाव,किटवडे, कोल्हापूर या ठिकाणच्या मुक्कामाच्या बसफे-या रद्द करून टाकण्यात आलेल्या आहेत. तर पुणे मार्गावरील बसफे-याही रद्द केलेल्या आहेत.
केले कांही दिवस आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असताना मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत काही बस पाठवण्यात आल्याने या बसफे-या रद्द करण्यात आल्याचे आगाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास… अशी अवस्था आता आगाराची झाली असून यात प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

भावी नगरसेवक क्रिकेट स्पर्धा उत्साहात…

आजरा: प्रतिनिधी
आजरा येथे सलीम उर्फ सुशील लतीफ यांनी आयोजित केलेल्या भावी नगरसेवक चषक अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सोळा संघ सहभागी झाले होते. २१ हजार रुपये रोख बक्षीस पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी फीजान मोबाईल शॉपी संघाने पटकावली.
द्वितीय क्रमांक जुवेरिया स्पोर्ट्स,तृतीय क्रमांक अल्फात,चतुर्थ क्रमांक बूम बूम यांनी पटकावला.
अंतिम सामन्याचा शुभारंभ पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बादशहा नसरदी, ज्योतिप्रसाद सावंत, प्रभाकर कोरवी, रणजीत कालेकर, साजरा कारखान्याचे संचालक हरिबा कांबळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठ्ठलदेव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विजय भडांगे, उपाध्यक्षपदी प्रकाश मनकेकर

आजरा : प्रतिनिधी
चाफवडे येथील श्री विठ्ठलदेव सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विजय भडांगे यांची तर व्हा. चेअरमनपदी प्रकाश मनकेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ‘सहाय्यक निबंधक आजराचे अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या. यावेळी नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीवेळी सरपंच धनाजी दळवी, संचालक गोपाळ ठाकर, विष्णूपंत मांजरेकर, विष्णू ठाकर, हणमंत गावडे, शिवाजी पाटील, प्रकाश मस्कर, संयोगिता बापट, राधिका बिरजे यांच्यासह तज्ज्ञ संचालक सुरेश पाटील, निवृत्ती बापट उपस्थित होते. सचिव बसवराज उत्तूरे यांनी आभार मानले.

स्लो मोटर सायकल रेस स्पर्धेत किशोर तरवाळ ठरले विजेते

उत्तूर: प्रतिनिधी
आरदाळ, पेढारवाडी येथील भेरीदेव यात्रेनिमित्त आरदाळ येथे स्लो मोटर सायकल रेस स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये किशोर तरवाळ याने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा उत्साहात व शांततेत पार पडली.
या स्पर्धेचे उदघाटन प्राथमिक विद्यामंदिर आरदाळचे मुख्याध्यापक लक्ष्मण सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.अँड.सुशांत पोवार, गणपती नागरपोळे, डॉ. पोवार चॅरीटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषदचे अध्यक्ष डॉ. एस.जी. पोवार, आनंद चव्हाण, सौरभ वेसणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सार्थक बेलेकर ( कागल), अनिकेत बारदेस्कर(उत्तूर) नितीन ससाने (आरदाळ) यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावला.

पूनम परुळेकर-भादवणकर भाजपात...

आजरा: प्रतिनिधी
मनसेच्या धडाडीचा कार्यकर्त्या पुनम परुळेकर भादवणकर यांनी चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची कोल्हापूर महीला जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) म्हणून निवड करण्यात आली आहे.



