

नारायण उर्फ बाबूराव देसाई यांचे निधन

स्व. अमृतकाका देसाई कुटुंबीयांवर सहा महिन्यात चौथा आघात
आजरा येथील जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त निरीक्षक नारायण उर्फ बाबुराव देसाई यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. आजरा येथील विविध सहकारी संस्थांचे संस्थापक स्व. अमृतकाका देसाई यांचे ते चिरंजीव होत. गेल्या चार महिन्यापूर्वी काका यांचे ज्येष्ठ चिरंजीव जयसिंग उर्फ बाळदादा यांचे निधन झाले पंधरा दिवसाच्या कालावधीतच बाळदादांच्या पत्नीचे निधन झाले. दोन महिन्यापूर्वी गणपतराव देसाई यांचे तर बुधवारी रात्री बाबुराव उर्फ नारायण देसाई यांचे निधन झाले. बाबूराव देसाई हे पोलीस निरीक्षक अनिल देसाई व रवळनाथ केबल नेटवर्क चे राजेंद्र देसाई यांचे वडील तर आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक प्राचार्य सुनील देसाई यांचे चुलते होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, पत्नी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. देसाई परिवारात केवळ सहा महिन्यात चार दुःखद घटना घडल्याने आजरा शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
‘ते ‘दुकानगाळे अखेर पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त

आजरा शहरांमध्ये गेले दोन महिने चर्चेत असणाऱ्या व बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या ९ दुकान गाळ्यापैकी ६ गाळे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. तर तीन गाळ्यांचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. येथील भुदरगड पतसंस्थे जवळील रस्त्याशेजारी विनापरवाना गाळ्यांचे बांधकाम झाले आहे. गाळे उभारण्यापूर्वी येथे छोट्या टपर्यामध्ये काही व्यावसायिक व्यवसाय करून उपजीविका करत होते. अचानकपणे हे गाळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने संबंधित मूळ व्यावसायिकांना नव्या गाळयांच्या वाटपात डावलण्यात आल्याचा आरोप होत होता.
या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आघाडीचे नगरसेवक धनाजी (किशोर) पारपोलकर यांनी उपोषणाचे हत्यार उगारले होते. या आंदोलनाला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे व आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बुधवारी सदर वादग्रस्त गाळे काढून टाकण्याच्या लेखी संयुक्त पत्रानंतर पारपोलकर यांनी उपोषण मागे घेतले. बुधवारी सदर गाळे काढण्याकरता मोहीम राबवण्यात आली. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. गाळे काढण्यासाठी व गाळे काढू नयेत यासाठी दोन्ही बाजूंनी प्रशासनावर प्रचंड दबाव आणला गेला. यावेळी कार्यकर्ते व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली वारंवार चर्चेच्या फेऱ्या ही झाल्या.
दुपारी तीन वाजेपर्यंत नऊ पैकी चार गाळे जमीनदोस्त करण्यात आले दरम्यान दोन गाळेधारकांनी सार्वजनिक बांधकाम व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना वकिलामार्फत नोटीस देऊन सदर कारवाई थांबवण्याची विनंती केली. यामुळे दोन गाळेधारकांचे गाळे पाडण्यात आले नाहीत तर मूळ मालकापैकी दोघांनी आपणाला लाकडी अथवा पत्र्याचे गाळे हवे आहेत असे सांगत पक्क्या गाळ्यांना विरोध दर्शवल्याने ते गाळेही पाडण्यात आले. दिवसभर गाळे परिसरात तणावाचे वातावरण होते.अनेकवेळा कार्यकर्ते, अधिकारी व नगरसेवक यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.एन. सावंत, अशोकअण्णा चराटी, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक संभाजी पाटील, आनंदा कुंभार, सिकंदर दरवाजकर, किरण कांबळे, सुधीर कुंभार आदी उपस्थित होते.

नगरसेवकांवर विश्वास नाही – डॉ. ठाकूर
शहरातील नगरसेवक या बेकायदेशीर गाळे बांधकाम प्रकरणांमुळे बदनाम झाले आहेत .नगरसेवकांवर आपला आता विश्वास राहिलेला नाही प्रशासनानेच याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांनी मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडे केली.

यापुढे अतिक्रमित बांधकामांची गय नाही : अभियंता सावंत
शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत अनेक बेकायदेशीर रीत्या अतिक्रमणे काढण्यात आली आहेत विभागाकडून उद्यापासून रीतसर मोजमापे घेऊन अतिक्रमणे ठरवून ही अतिक्रमणे काढण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलली जातील, यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही जे गाळे शिल्लक राहिले आहेत त्यांच्याबाबतही कायदेशीर मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याची माहिती अभियंता सावंत यांनी कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

सत्तारूढ नगरसेवकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया
या गाळे प्रकरणा विषय सत्तारूढ नगरसेवकांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या एकीकडे काही नगरसेवक गाळे बचाव करण्यासाठी प्रयत्नशील होते तर दुसरीकडे काही नगरसेवक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून कारवाईवेळी फिरकलेही नाहीत.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अडीच लाखाचा धनादेश सुपूर्त

आजरा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात असून सुमारे २२ लाख रुपये खर्चून सदर पुतळा तयार करण्यात येत आहे. यासाठी पुतळा कमिटी मार्फत अडीच लाखांचा धनादेश पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते मूर्तिकार संजय किलेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. सदर पुतळ्याचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी किलेकर यांनी दिले. याप्रसंगी कमिटीचे अध्यक्ष बापू टोपले, संभाजीराव इंजल, मारुती मोरे, सुजित देसाई, महेश दळवी, सुनील पाटील, संभाजी जाधव, आनंदा कुंभार, सचिन चव्हाण उपस्थित होते.


देवर्डे हायस्कूल मैदान परिसरात वृक्ष लागवड

वृक्षारोपण देवर्डे- (ता. आजरा) येथील श्री रवळनाथ हायस्कूल मैदान परिसरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर परिक्षेत्र चंदगड अंतर्गत फणस, काजू, सीताफळ, पेरु, रामफळ, जांभूळ या रोपांची लागण करण्यात आली. वनरक्षक टी. पी. भोसले यांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक सुभाष सावंत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी वनक्षेत्रपाल एस. जे नागवेकर, वनरक्षक. टी. पी. भोसले, वनपाल राजू पाटील, वसंत चाळके, पी. एस. खापरे, एस. एम. पाटील, डी.जी.हरेर, के.जी. कांबळे, एस. के. तराळ, यांच्यासह राजेंद्र पाटील, देवेंद्र शिखरे, चंद्रकांत धुरे, महेश नावलगी या शिक्षकासह विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

आजरा साखर गाळप रिपोर्ट दिनांक-२८.१२.२०२१
दिवस – ५८
एकुण – १,६५,६८० मे.टन
एकुण साखर उत्पादन – १,८९,२०० क्विंटल
उतारा – १२.८३ सरासरी उतारा- ११.५३



