रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५


उभ्या दुचाकींच्या बॅटऱ्या चोरीस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरामध्ये ठिकठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींच्या बॅटऱ्या चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असून अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. आपल्या नवापूर येथे दारासमोर उभा केलेल्या गाडीतील बॅटरी चोरीस गेल्याची फिर्याद अजित जीवबा हरेर यांनी आजरा पोलिसात दिली आहे.त्यांनी घरासमोर लावलेल्या गाडीची बॅटरी चोरीस गेली आहे.
चार दिवसापूर्वी चार चाकी गाडीची बॅटरी चोरीस गेली आहे,तर अन्य काही ठिकाणच्या उभ्या गाडीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याचे प्रकार घडले असल्याचे समजते.


सौंदत्ती यात्रेकरूंनी रामतीर्थ परिसर गजबजला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली येथील तब्बल ३०० भाविक सौंदत्ती यात्रा करून रामतीर्थ परिसरात परतल्याने काल शनिवारी दिवसभर विविध धार्मिक विधींमुळे रामतीर्थ परिसर गजबजून गेला होता.
पेरणोली येथून सौंदत्ती यात्रेकरीता दर दोन वर्षांनी भाविक मोठ्या संख्येने जात असतात. चार दिवसांपूर्वी स्वतंत्र बस मधून यात्रेला गेलेले ३०० भावीक सौंदत्ती येथे जोगळ भाव येथील धार्मिक विधी आटोपून रामतीर्थ येथे पडली भरण्याकरता आले होते. यावेळी धार्मिक विधींसह महाप्रसादाचे आयोजन रामतीर्थ येथे करण्यात आले होते. वाजत- गाजत या मंडळींनी व अंतिम येथून मूळ गाव पेरणोलीकडे प्रस्थान केले.
यावेळी उदयराज पवार, सुरेश कालेकर, गणपती कुकडे, विष्णू हळवणकर, राजाराम पाटील, पवन कालेकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.


शिवजयंती निमित्त बुरुडे येथे विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवजयंती निमित्त बुरुडे ता. आजरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक १७ पासून करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी सात वाजता रस्सीखेच स्पर्धा होणार आहे, तर बुधवारी सकाळी पाच वाजता प्रतापराव गुर्जर स्मारक येथून शिवज्योत आणण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत पालखी सोहळा व इतर कार्यक्रम होणार असून यामध्ये मर्दानी खेळ, लेझीम पथक, हळदी कुंकू कार्यक्रम, होम मिनिस्टर यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
याचबरोबर संगीत खुर्ची सह विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले असून १९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजता महाआरती व आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले.


मासेवाडी येथे आज आरोग्य शिबिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री भुतेश्वर व मरगुबाई लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त मासेवाडी ता.आजरा येथे डॉ. पवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फाउंडेशन, विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय उत्तुर यांच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी व उपचार शिबिर आज रविवार दिनांक १६ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिराचे उद्घाटन मासेवाडी चे सरपंच पांडुरंग तोरगले, डॉ. जी. एम. पवार यांच्या हस्ते व मुंबई येथील उद्योजक सदानंद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे असे संयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

रामतीर्थ येथे आज जगद्गगुरु
श्री तुकोबाराया उत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज रविवार दिनांक १६ रोजी श्री क्षेत्र रामतीर्थ आजरा येथे जगद्गगुरु श्री तुकोबाराया यांचा त्रीशतकोत्तर सद्गगुरु अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्य सायंकाळी चार वाजता सांगली येथील ह. भ. प. गुरुवर्य संतोष महाराज सहस्त्रबुद्धे यांचे ‘तुका आकाशाएवढा’ या विषयावर प्रवचन होणार आहे तर ह. भ. प. वैभव महाराज राक्षे यांचे कीर्तन होणार आहे. यासह विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले असून रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.


थोडे हटके…
सव्वाशे रुपये किलो…
आता सुट्टी नाही…

ज्योतिप्रसाद सावंत
गेले दोन-तीन महिने आजऱ्यात चिकनचे भाव कमालीचे खाली आल्याने सध्या आजरेकर चिकनवर ताव मारण्यात गुंतले आहेत. १२५/- रुपये किलो या भावाने चिकन उपलब्ध होऊ लागल्याने तूर्तास ६८०/- रुपये किलोच्या मटणाकडे मांसाहार प्रेमींनी पाठच फिरवल्याचे दिसते.सायंकाळच्या वेळी ठिकठिकाणी चिकन ६५, तंदूर आणि बिर्याणीचा वास दरवळू लागला आहे.
चिकन म्हटले की कांही नाकं मुरडणारी मंडळी घरात चिकन तर सध्या आजूबाजूच्या गावामध्ये यात्रांचा धुमडा सुरू असल्याने अशा जत्रा- यात्रांमध्ये मटण वडून जत्रा- यात्रांची शोभा वाढवण्यात स्वतःला धन्य मानत आहेत.
चिकन विक्रेत्यांमध्येही दरांबाबत स्पर्धा सुरू असलेली दिसते. कोणी ‘माझं ठरलंय’ म्हणत १२५ रुपये किलोचा बोर्ड लावत आहे तर कोणी ‘चिकन हंगामा’ म्हणून १३० रुपये किलोचा बोर्ड लावत आहे.
कांही का असेना विक्रेत्यांचा ‘हंगामा’ आणि ‘माझं ठरलंय’ हे चिकन प्रेमींच्या पथ्यावर पडू लागले असून सध्या तालुक्यात चिकन प्रेमींची दिवाळी सुरू आहे असे म्हणण्यास कांही हरकत नाही. याला तुम्ही- आम्हीतरी हरकत कशाला घ्यायची…?

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९




