सोमवार दिनांक १९ मे २०२५


श्वान घुटमळले…
पोलीस चक्रावले…
तपासचक्रे वेगावली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे ता. आजरा येथे काल रविवारी पहाटे सौ. पूजा सुशांत गुरव यांची हत्या करून दरोडेखोरांनी तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने व नव्वद हजार रुपये रोख लांबवल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळी तातडीने श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु श्वान पथक जागीच घुटमळल्याने पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मडिलगे येथे भेट देऊन तपासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले आहे.
शनिवारी सकाळी दिवसभर घडलेल्या घटनाक्रमाचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक, फॉरेन्सिक लॅबचे तज्ञ ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणातील कांही महत्त्वाचे धागेदोरे रात्री उशिरा पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. सौ. पूजा यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री नऊ वाजता सुमारास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरून गेला असून पोलीस तपासाकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.

रविवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास भर वस्तीत असणाऱ्या सुशांत सुरेश गुरव यांच्या घरामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करून पत्नी सौ. पूजा गुरव यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची हत्या करण्याबरोबरच घरातील सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने व ९० हजार रुपये रोख लंपास केल्याची फिर्याद सुशांत यांनी दिली आहे. फिर्यादीमध्ये सुशांत यांनाही मारहाण झाल्याचे नमूद केले आहे.
पोलीसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. हे प्रकरण पोलिसांसमोर तपासाच्या दृष्टीने आव्हान आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर पुढील तपास करीत आहेत.

२००६ च्या खुनाचा तपास सुरूच आहे…
७ मार्च २००६ रोजी राणकू येसणे व जनाबाई येसणे अशा दोन वृद्ध पती-पत्नीची एकाच वेळी हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. त्यानंतर मडिलगे येथे घडलेली ही दुसरी मोठी घटना आहे.
सोपानसह मुक्ताही पोरकी झाली
घटनेतील मृत सौ.पूजा यांना सोपान व मुक्ताबाई अशी दोन दीड वर्षीय जुळी मुले आहेत. आईच्या निधनाने ही दोन बालके आईला पोरकी झाली आहेत. सुदैवाने दरोडेखोरांनी त्यांना काहीही इजा केली नाही.
गुरव कुटुंबीयांचीही चौकशी
सदर घटनेनंतर अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी रवींद्र कळमकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झाले. घटनेच्या इतर माहिती बरोबरच तपासाचा भाग म्हणून फिर्यादी सुशांत गुरव व त्यांच्या कुटुंबीयांचीही कसून चौकशी केली.
‘मृत्युंजय महान्यूज’च्या वृत्ताची दिवसभर चर्चा…
पहाटे तीन वाजता घडलेल्या या घटनेची सविस्तर बातमी ‘ मृत्युंजय महान्यूज ‘ ने सकाळी सात वाजता सविस्तर प्रसिद्ध केल्यानंतर तालुक्यातील अनेकांनी आजरा पोलीस स्टेशन व घटनास्थळी भेट देऊन झाल्या प्रकाराची माहिती घेण्याचा प्रयत्न चालवला होता. दिवसभर या बातमीची चर्चा होती. सायंकाळी साडेसात वाजता पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिलेली माहिती ‘मृत्युंजय महान्यूज ‘ ने दिलेल्या बातमीतील मजकूराशी तंतोतंत जुळत असल्यानेही या चॅनलची विश्वासार्हता पुन्हा एक वेळ अधोरेखित झाली आहे.

आजऱ्यात तिरंगा यात्रा…
आजी माजी सैनिकांसह स्थानिक नागरिकांचा सहभाग

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली.तहसील कार्यालय आवारातून सुरू झालेली ही यात्रा शिवतीर्थ येथे आल्यानंतर यात्रेची सांगता करण्यात आली.
यात्रेमध्ये अशोकअण्णा चराटी, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, बाळ केसरकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय मोहिते व उपाध्यक्ष दिनकर जाधव,परशुराम बामणे भाऊजी, जनार्दन टोपले, प्रभाकर कोरवी. अनिल पाटील, जोतिबा आजगेकर, जयवंत सुतार, सी. आर. देसाई , संतोष चौगुले, गौतम भोसले अनिल पाटील, प्रकाश पाटील,मदन तानवडे, अतुल पाटील, वाय. बी. चव्हाण, संयोगिता बापट, किटवडे सरपंच लहू वाकर व प्रकाश पाटील,माजी सैनिक आजी-माजी सैनिक वेल्फर संघटना आजराचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

उत्तूर येथील महालक्ष्मी यात्रा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर येथील श्री महालक्ष्मी यात्रा उत्साहात पार पडली. भाविकांनी यात्रेस उदंड प्रतिसाद दर्शवल्याने हातावरील लक्ष्मी खेळवण्यासह सर्वच कार्यक्रम नेटक्या पद्धतीने पार पडले.
महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक १७ हा यात्रेचा मुख्य दिवस असला तरीही बऱ्याच जणांच्या जेवणावळींचा कार्यक्रम सुट्टी धरून काल रविवारी पार पडला. दुचाकी व चार चाकी वाहनांसह भाविकांनी उत्तूर शहर व परिसरात मोठी गर्दी केल्याने वाहतुकीवर नियंत्रण आणताना यात्रा कमिटीसह पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.
हजारो भाविकांनी लक्ष्मी खेळण्यासाठी विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
पावसाची साथ…
यात्रा कालावधीत पावसाळी वातावरण असले तरीही यात्रा पार पडेपर्यंत पावसाचा कोणताही व्यत्यय न आल्याने उत्तूरकरांना यात्रा जल्लोषात करणे शक्य झाले.

वीज कोसळल्याने हिरवागार वृक्षाची काही क्षणातच दुर्दशा

शनिवारी दुपारी सुरू असलेल्या पावसादरम्यान जोरदार वीज कोसळल्याने सुलगाव येथील तळीचे शेत येथे असणाऱ्या हिरव्यागार वृक्षाची दुर्दशा झाली.काही क्षणातच सदर वृक्ष वाळून पूर्णपणे कोसळून गेला.

पाऊस पाणी…
आजरा तालुक्यामध्ये काल रविवारी आजरा शहरासह ठिकठिकाणी कमी- जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाळी वातावरण होते.


