
काळाचा घाला…
सुळे पंचक्रोशी हादरली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यात्रा झाली. यात्रेसाठी बोलावलेले पै-पाहुणे माघारी परतू लागले. यात्रेसाठी इतरांचे आणलेले साहित्य देण्याचे काम सुरू झाले. याचाच भाग म्हणून घरातील अंथरुन पांघरूण नदीवर जाऊन धुवायचे, पाण्यात येथे डुंबायचे, मौज मजा करून घरी परतायचे असे बेत करून मंगळवारी सकाळी लवकर घरातून निघून गेलेल्या सुळे ता आजरा येथील कटाळे कुटुंबीयांना धक्कादायकरीत्या कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांसह एका शाळकरी मुलाला गमावण्याची वेळ आली. यामुळे केवळ कटाळे कुटुंबीय नाही तर संपूर्ण सुळे पंचक्रोशी हादरून गेली आहे. या घटनेमुळे कटाळे कुटुंबियांना उद्वस्त होण्याची वेळ आली आहे.
धुणे झाल्यानंतर पाण्यात मजा करण्यासाठी गजरगाव बंधाऱ्यानजीकच्या हिरण्यकेशी नदीपात्रात साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश अरुण कटाळे हा शाळकरी मुलगा पाण्यात उतरला. पाण्याचा दाब व प्रवाह जोरात असल्याने तो पाण्यामध्ये बुडू लागला त्याचा बचाव करण्यासाठी वडील अरुण बचाराम कटाळे यांनी त्याला हात दिला. तेही पाण्यात बुडू लागलेले निदर्शनास आल्याने त्यांचा भाऊ उदय बचाराम कटाळे यांनी या दोघांना वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तिघेही पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या भोवऱ्यामध्ये अडकले व बुडाले. केवळ पाच मिनिटांमध्ये या तिघांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले.
सदरचे वृत्त सुळे पंचक्रोशीत समजतात गजरगाव बंधाऱ्याला नजीक मोठी गर्दी झाली. उदय व अरुण यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.तर जयप्रकाश याचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला आहे.
चौथा बचावला...
ऋग्वेद उदय कटाळे हादेखील पाण्यामध्ये या तिघांसोबत बुडत होता. सुदैवाने त्याला वेळीच बाहेर काढण्यात आजूबाजूच्या लोकांना यश आले.त्याच्यावर प्राथमिक उपचार तातडीने करण्यात आल्याने तो मात्र बचावला.
पोहता येत असूनही…
मृत तिघांनाही पोहता येत होते. परंतु पाण्याचा प्रचंड दाब आणि प्रवाहाचा वेग यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. रात्री उशिरा अरुण व उदय यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शाळकरी मुलांना सांभाळण्याची गरज
सध्या सुट्टीचे दिवस सुरू असल्याने शाळकरी मुलांचा कल पोहण्याकडे दिसतो. परंतु सोबत जबाबदार मंडळी असतानाच शाळकरी मुलांनी पाण्यात उतरण्याचे धाडस करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्दैवी घटना घडताना दिसतात.

आजरा तालुक्यात लोकशाहीचा उत्सव दणक्यात
६१.८२ टक्के मतदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये लोकसभेकरता मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत उन्हाचा तडाखा असूनही मतदान प्रक्रियेला सामोरे जाणे पसंत केल्याने तालुक्यात सरासरी ६१.८२ टक्के मतदान झाले आहे.१ लाख ६ हजार ५७८ मतदारापैकी ६४ हजार २४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. कोणताही अनुचित प्रकार अथवा वादावादी असे प्रसंग घडले नाहीत.
आजरा शहरात तर सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. दोन्हीही प्रमुख आघाड्यांची समर्थक मंडळी आपापल्या बूथवर थांबून मतदारांना आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत होती.

मतदान प्रक्रिया सुरू असतानाच इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती व महायुतीचे प्रमुख मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला.
तालुक्यात सर्वात जास्त मतदान सुळे येथे( ७६. २२ टक्के) तर सर्वात कमी मतदान वडकशिवाले येथे (५१ टक्के) इतके झाले.
गावनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी …
आजरा ६३.५८, शेळप ६२.३३, किटवडे ७३.१४, अंबाडे ४३.१३, धनगरमोळा ६०.४३ , गवसे ६१.२५, दाभिल ६४.७०, पारपोली ६६.६६, देवर्डे ६६.७१, हाळोली ६७.०१, मेढेवाडी ६८.७०, मसोली ७०.२४, वेळवट्टी ६५.४३, पारेवाडी ७३.८३, एरंडोळ ५१.०७,लाटगाव ६८.३८, देऊळवाडी ७१.२३, इटे ५८.०५, आवंडी ६३.८३, देवकांडगाव ५०.५२, कोरीवडे ६९.२३, पेरणोली ६४.०२, हरपवडे ६७.४०, साळगाव ६७.७२, सुलगाव ६६.६६, चांदेवाडी ६८.८७, हाजगोळी बु|| ६५.३६, हाजगोळी खु|| ६८.८०, खेडे ६५.१८
उत्तूर ६३.७९, बहिरेवाडी ६३, मुमेवाडी ६८, धामणे ५८ बेलेवाडी हु|| ६५.९७, चव्हाणवाडी ५९.५६, चिमणे ५६.५२, करपेवाडी ५२.६३, होन्याळी ५९.४९, महागोंड ५८.३०, वझरे ६४, वडकशिवाले ५१, झुलपेवाडी ६४.३६, हालेवाडी ६०.३०, आर्दाळ ५८.७४, पेंढारवाडी ५६.८३, मासेवाडी ५८.९६, भादवण ६१.८७ भादवणवाडी ६६, खोराटवाडी ६८, मडिलगे ६३.२७, सोहाळे ६३.७९
हात्तीवडे ६१.८७, पेद्रेवाडी वाडी ७४.५५, कोवाडे ६७.५२ , निंगुडगे ६३.९७, सरोळी ६८.७३, गजरगाव ६५.३५, कानोली ५८.०९, मलिग्रे ६५.८९, होनेवाडी ६९.८२, मेंढोली ६१.८५, बुरुडे ६७.८६, मुरुडे ७२.३६, कासारकांडगाव ६६.६८, खानापूर ६७.१९, पोळगाव ६६.८७, चितळे ६३.२९, चाफवडे ५८, शृंगारवाडी ६४.२३, उचंगी ७४.७८, वाटंगी ६४.७३, मोरेवाडी ७६.४३ शिरसंगी ६४.९३, एमेकोंड ७३.६०, सरंबळवाडी ६३.०२, हारुर ६६.२४, सुळे ७६.२२, लाकूडवाडी ६८.५४, हंदेवाडी ७१.७२, कोळींद्रे ६४.१९, किणे ६६.३९
तालुक्यामध्ये मतदानाची एकंदर परिस्थिती पाहता शाहू छत्रपतींची क्रेझ मतदानापर्यंत कायम असल्याचे जाणवत होते.

निधन वार्ता…
सरस्वती नार्वेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नार्वेकर वसाहत कोरिवडे येथील सरस्वती गणपती नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात ३ मुले ५ मुली, जावई ,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.गुरुवार दि. ९ रोजी सकाळी ९ वाजता रक्षाविसर्जन आहे.


