
शाहू छत्रपतींना आजरा तालुकावासीयांचा ‘हात ‘…?
नियोजनबद्ध प्रचार व निवडणूक पूर्व मशागत पडणार पथ्यावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आजरा तालुक्यामध्ये मतदान प्रक्रियेनंतर मतदारांचा एकंदर कल पाहिला असता तालुक्याने शाहू छत्रपतींना मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे आता स्पष्ट होत असून वेळेत उमेदवारी जाहीर झाल्याने सर्व घटकांना सोबत घेऊन वाड्या-वस्त्यांवर पोहोचण्यात इंडिया- महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यशस्वी ठरल्याने शाहू छत्रपती तालुक्यातून घसघशीत आघाडी घेतील असे चित्र आहे.
या निवडणुकीत सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी- शरद पवार गटाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित, गिरणी कामगार, शिवसेना (उबाठा) श्रमिक मुक्ती दल, लोकशाहीवादी श्रमिक मुक्ती दल व इतर छोटे मोठे घटक संघटितरित्या आपापसातील मतभेद विसरून शाहू छत्रपतींच्या प्रचार यंत्रणेचे रान उठवण्यात यशस्वी ठरले.
संभाजी राजे छत्रपतींसह शाहू छत्रपतींनी तालुक्यातील संपर्क दौऱ्यात प्रत्यक्ष भाग घेतल्याने त्यांची वेगळी क्रेझ निर्माण झाली व ती शेवटपर्यंत टिकून राहिली. एकीकडे शाहू छत्रपतींची प्रचार यंत्रणा गावागावात व घराघरापर्यंत पोहोचली असताना दुसरीकडे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचार यंत्रणेत फारसा उत्साह दिसून येत नव्हता. नेत्यांनी पाठिंबा दिला आहे म्हणून कार्यकर्ते नाईलाजाने त्यांच्या प्रचार फेऱ्यांना हजेरी लावताना दिसत होते. भाजपा व आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे य मोजके कार्यकर्ते ताकतीने काम करत होते. परंतु प्रचार यंत्रणा राबवताना प्रा. मंडलिक यांच्या समर्थकांच्या मर्यादा निश्चितच स्पष्ट दिसत होत्या. शेवटच्या टप्प्यात तर आबिटकर बंधूंनी स्वतः मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक आजरा शहरासह उत्तुर येथे आमदार भास्कर जाधव आमदार सतेज पाटील यांनी दणकेबाज सभा घेऊन वातावरण निर्मिती केली परंतु महायुतीच्या नेत्यांनी आजूबाजूच्या तालुक्यात हजेरी लावून प्रचार सभा घेतल्या असताना आजरा तालुक्याकडे त्यांनी दुर्लक्ष का केले? एकही जाहीर प्रचार सभा तालुक्यात का होऊ शकली नाही, याचे गूढ अद्याप कायम आहे. आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असताना इतके दुर्लक्ष महायुती कडून होणे अनपेक्षित होते.
संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून भाजपा विरोधी पक्ष व घटकांनी सुरू केलेली सरकार विरोधी मोर्चे बांधणी तालुक्यात शाहू छत्रपतींना अनुकूल वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरली.सुमारे ६४ हजार ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यातून आठ ते दहा हजार मतांची आघाडी शाहू छत्रपतींना मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.
संविधान बचाव, मणिपूर आणि निष्क्रियतेचा आरोप…
प्रचार कालावधीमध्ये कॉ, संपत देसाई, अभिषेक शिंपी, युवराज पोवार, कॉ. संजय तर्डेकर ,मुकुंदराव देसाई, उमेश आपटे, कॉ. शांताराम पाटील, संतोष मासाळे आदी मंडळींनी धडाकेबाज भाषणे करून संविधान बचाव सह मणिपूर प्रकरण, महागाई, खाजगीकरण, बेरोजगारी, शेतकरी आंदोलने इत्यादी गोष्टीवर जोर दिला. या मंडळींची भाषणे देखील मताधिक्यात वाढ करण्यास कारणीभूत ठरणार आहेत.
मुस्लिम मतदारांचीही शाहू छत्रपतींना साथ…?
आजरा शहरांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन शाहू छत्रपतींच्या पाठीशी मुस्लिम समाज संघटितपणे उभा राहिल्याचेही बोलले जाते. याचा फटकाही प्रा. मंडलिक यांना तालुक्यात बसणार असे दिसत आहे.
आमदार आबिटकर यांना धोक्याचा इशारा…
या लोकसभा निवडणुकीतील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक निकालानंतर मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यातील लोकसभेच्या मतदानाचा कल पाहता भविष्यात हा आमदार आबिटकर यांना धोक्याचा इशारा समजण्यास हरकत नाही. विधानसभेला आबिटकर यांच्या विरोधात के.पी. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपानेही मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेऊन एखादा उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवल्यास आमदार आबिटकर यांची चांगलीच दमछाक होणार आहे.(सध्या तिघेही महायुतीत आहेत) ‘डॅमेज कंट्रोल’ चे मोठे आव्हान आम. आबिटकर यांच्यासमोर सध्यातरी दिसत आहे.

कायदा व सुव्यवस्थेला बाधा न आणता शिवजयंती उत्साहात साजरी करा : स.पो.नि.यमगर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डॉल्बीचा वापर टाळून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी करावी असे आवाहन आजरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केले.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यामध्ये विविध मंडळांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना स.पो.नि. यमगर म्हणाले, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन शिवजयंती विधायक कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात यावी. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही अशा प्रकारचे देखावे अथवा अन्य प्रकार टाळावेत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांसह संयुक्त शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


