शनिवार दि. १२ जुलै २०२५


स्वामित्व योजनेमार्फत तयार करण्यात आलेले गावठाणचे नकाशे दुरुस्त करा : सरपंच परिषदेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वामित्व योजनेतून तयार करण्यात आलेल्या एकाही गावचा नकाशा सुबक व अचूक झालेला दिसत नाही. गावातील रस्ते,खोल्या, जागा, नाले, शाळांसारख्या सार्वजनिक इमारती त्याचबरोबर व्यक्तिगत मालमत्तेचे क्षेत्र त्यांचा आकार, अंतर्गत बोळ व रस्ते यामध्ये असंख्य चुका झालेल्या दिसतात.
सदरच्या चुका दुरुस्तीसाठी विविध नमुन्यामध्ये कायदा सल्लागारांच्या मार्फत अर्ज करणे यासह इतर प्रक्रिया वेळखाऊ व खर्चिक आहेत. त्यामुळे सदरची दुरुस्ती प्रक्रिया तालुकास्तरीय भूमी अभिलेख कार्यालयांमध्येच महसूल व ग्रामपंचायत आणि भूमी अभिलेख कार्यालय कडील पुराव्यांचा आधार घेऊन करण्यात यावी अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आली आहे. तसे लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर संघटनेचे राज्य सरचिटणीस राजू पोतनीस, जिल्हाध्यक्ष जी.एम. पाटील, आजरा तालुका अध्यक्ष पांडुरंग तोरगले, सौ. प्रियांका जाधव, विलास जोशीलकर आदींच्या सह्या आहेत.
CCMP कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथीक डॉक्टरांची नोंदणी
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मध्ये केली जावी
तहसीलदारांना निवेदन

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आय. एम. ए. संघटनेचे पदाधिकारी एक वर्षाचा सी. सी. एम. पी. कोर्स पास झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची बदनामी करणारी, दिशाभूल करणारी खोटी माहिती मीडिया मधून प्रसारीत करत असून जनतेची, त्यांच्या सदस्याची व सरकारचीही दिशाभूल करत आहेत. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे.आज पर्यंत आय. एम. ए. या संघटनेने ४ वेळा मुंबई उच्च न्यायालयात व १ वेळा सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करून या कोर्सला परवानगी देऊ नये व एम. एम. सी. मध्ये नोंदणी करू नये असे सांगितले परंतु मा. न्यायालयाने आय. एम. ए. या संघटनेला कोणत्याही प्रकारचा अंतरिम स्थगन आदेश आज पर्यंत दिला नाही. आय. एम. ए. दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप करत त्यांचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार विविध कमिट्यांद्वारे सखोल संशोधन व अभ्यास करून होमिओपॅथीक डॉक्टर्सना मॉडर्न मेडिसिनचा उपचार करण्यासाठी सक्षम वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी एक वर्षाचा वसर्टिफिकेट इन मॉडर्न फार्माकोलॉजी” हा अभ्यासक्रम तयार करून फक्त जेथे एम.बी.बी. एस.शिक्षण घेतात फक्त त्याच वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. फार्माकोलॉजी बरोबरच इतर विषयाचे प्रशिक्षण देऊन त्याची परीक्षा घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कायद्याप्रमाणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये वेगळ्या परिशिष्टमध्ये नोंदणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी दि. ३० जुन २०२५ रोजी आदेश निर्गमित केला. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठीच घेण्यात आलेला आहे.
खरेतर मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बहुतांशी आर. एम. ओ. हे आयुष डॉक्टर्स आहेत तेच डॉक्टर आय. सी. यू. मध्ये २४ तास कार्यरत असतात तेव्हा मात्र हे होमियोपॅथीक डॉक्टर्स सक्षम असतात परंतु त्याची कायद्यातील तरतुदी प्रमाणे एम. एम. सी. नोंदणी करताना वेगळी भूमिका मांडतात असे दुटप्पी धोरण आय. एम. ए. चे पदाधिकारी करतात. कारण पुढील काळात त्याच्या संघटनेच्या निवडणुका होणार आहेत म्हणून हे सर्व त्याच्या सदस्यांची, जनतेची तसेच शासनाची दिशाभूल करत आहेत अशी शंका येते. तसेच आयएमए सह काही संघटना कोणताही अभ्यास न करता असत्य व अर्धसत्य माहितीद्वारे प्रसारमाध्यमातून तसेच रुग्णांना वेठीस धरणाऱ्या आंदोलनाची भाषा करत शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
निवेदनावर डॉ. सुहास गुरव – अध्यक्ष,डॉ. सागर पारपोलकर – उपाध्यक्ष,डॉ. गौरी भोसले – सेक्रेटरी डॉ. अमित बेळगुंदकर – खजिनदार, डॉ. अभिजीत दड्डीकर,डॉ. बी. जी. पाटील,डॉ. दिपक हरमळकर,डॉ. प्रविण निंबाळकर,डॉ. सागर तेऊरवाडकर, डॉ. रोहन जाधव, डॉ. हेमंत भोसले डॉ. सुरजीत मोरे,डॉ. भरत मोहिते,डॉ. अमित घुगरे,डॉ. सुहास देसाई,डॉ.स्मिता कुंभार,डॉ. हिंमत भोसले आदींच्या सह्या आहेत.

गोकुळ दूध संस्था प्रतिनिधींचा उद्या आजऱ्यात मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) आजरा तालुका दूध संस्था प्रतिनिधींचा मेळावा व नूतन अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कार समारंभ असा संयुक्त कार्यक्रम उद्या रविवार दिनांक १३ रोजी कै. रवींद्र आपटे यांच्या गटातर्फे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ, महालक्ष्मी बँक कोल्हापूरच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्मजा रवींद्र आपटे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चैतन्य सांस्कृतिक सभागृह,आजरा येथे सकाळी ११ वाजता सदर कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

वेध वार्षिक सभांचे…
सहकारी संस्थांची लगबग सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभांचे वेध लागले असून जवळपास सर्वच संस्थांमध्ये अहवाल छपाई ,वाटप, अल्पोपहार, सभांचे स्थळ निश्चित करणे याची लगबग सुरू झाली आहे.
सहकार खात्याच्या नियमानुसार ३० सप्टेंबर पूर्वी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होणे बंधनकारक आहे. अद्ययावत असणाऱ्या संगणकीकृत संस्थांची वार्षिक ताळेबंदांसह आर्थिक पत्रके ३१ मार्च रोजीच बाहेर पडली आहेत. तर ज्या संस्थांची थकबाकी मोठी आहे अशा संस्थांची आजही मागील थकबाकी कमी करण्याच्या दृष्टीने वार्षिक पत्रके पूर्ण झालेली नाहीत हे वास्तव आहे.
सभांची वेळ, स्थळ निश्चित करण्यापासून ते सभेमध्ये सभासदांकरिता ठेवण्यात येणाऱ्या अल्पोपहारांच्या मेनू पर्यंतची जबाबदारी वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
एकंदर आता सहकारी संस्थांमध्ये वार्षिक सभांची लगबग सुरू झाली आहे.
सभा घ्यायच्या कुठे…?
बऱ्यापैकी सभासद संख्या असणाऱ्या संस्थांसमोर सभेचे स्थळ निश्चित करताना अनेक अडचणी येत आहेत. श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरासह रवळनाथ मंदिर सभागृह नूतन बांधकामामुळे उपलब्ध नाही, तर डॉ.जे.पी.नाईक सभागृहामध्ये वाचनालय स्थलांतरित करण्यात आल्याने सभांसाठी जागेचा प्रश्न मोठा अडचणीचा झाला आहे.

“गुणवत्तापूर्ण लोकसंख्या घडवण्यासाठी शिक्षण आणि संशोधनाला प्राधान्य देणे काळाची गरज” — डॉ. केशव देशमुख

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून आजरा येथे प्रा.डॉ. केशव देशमुख यांचे “लोकसंख्येची गुणवत्ता आणि भारत” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. देशमुख यांनी आपल्या भाषणात भारत ही जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असली तरीही दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तो १३७ व्या स्थानावर आहे. ही विरोधाभासी स्थिती केवळ आकडेवारी नव्हे तर देशाच्या विकासाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा, कौशल्यविकास व संशोधनाचे बळ या गोष्टी देशाच्या मानवी भांडवलाची (Human Capital) उंची ठरवतात. लोकसंख्येची ताकद ही तेव्हाच राष्ट्रशक्तीमध्ये रूपांतरित होऊ शकते, जेव्हा ती ज्ञान, आरोग्य, तंत्रज्ञान व विवेकाच्या अधारे उभी राहते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिलीप संकपाळ यांनी अनियंत्रित लोकसंख्या वाढ ही बेरोजगारी, दारिद्र्य, पर्यावरणीय असमतोल आणि सामाजिक असमानतेस कारणीभूत ठरते. त्यामुळे युवकांनी या समस्यांकडे सामाजिक दृष्टीकोनातून पाहून जबाबदारीचे भान जपावे असे आवाहन केले.
डॉ. रणजीत पवार यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमास प्राचार्य डॉ.ए. एन. सादळे,डॉ. आप्पासाहेब बुडके, डॉ. धनंजय पाटील, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. मनोज पाटील तसेच कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रत्नदीप पवार यांनी मानले.

स्वरा प्रशांत गुरव पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात राज्यात चौदावी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक [इयत्ता पाचवी] शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लजची विद्यार्थिनी स्वरा स्वाती प्रशांत गुरव हिने शहरी विभागात महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चौदावा क्रमांक पटकावला.
स्वराला छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार, मार्गदर्शक शिक्षिका मीरा खोपकर,निवेदिता बाबर,सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन लाभले.

निधन वार्ता
वसंत पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथील वसंत आप्पा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६६ वर्षे होते.
गजरगाव येथील ते पिठाची गिरणीवाले पाटील या नावाने परीचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.


छायावृत्त

आजरा – पोळगाव मार्गावर काल दुपारी कासार शेत नजीक समोरून येणाऱ्या चार चाकीला चुकवताना रिक्षा पलटी झाली. यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.




