गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५



गांजा प्रकरणी आरोपीस शनिवार पर्यंत पोलिस कोठडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लुकमान अस्लम लमतुरे (वय २८ वर्षे, रा नाईक गल्ली, आजरा ता आजरा, जिल्हा कोल्हापूर ) या तरुणाला बेकायदेशिररित्या विक्रीकरिता आणलेल्या १ किलो १०० ग्रॅम गांजासह पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
लुकमान याला आजरा येथील न्यायालयासमोर हजर केले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार समीर कांबळे व योगेश गोसावी यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळालेल्या माहितीवरून आजरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये भादवण येथील जुन्या बस स्टॉपजवळ सदर कारवाई करण्यात आली होती.
गांजा सेवन करणारी तरुणाई अंडरग्राउंड
गांजा विरोधातील पोलिसांच्या धडक कारवाईमुळे आजरा तालुकावासीय सुखावले असून पोलिसांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण जिल्हाभर पोलिसांनी गांजाविरोधी मोहिमा आखल्याने आजरा तालुक्यातील गांजा सेवन करणारी तरुणाई अंडरग्राउंड झाली आहे. पोलीस मात्र अशा मंडळींचा शोध घेण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसते.

भादवण सरपंचावरील अविश्वास ठराव संमत

भादवण (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्यावरील ठराव ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेत दोन विरोधी दहा मतांनी संमत झाला आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष सभा झाली. अध्यासि अधिकारी तहसीलदार समीर माने अध्यक्षस्थानी होते.
सरपंच सौ. गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पाटील, सदस्य अर्जुन कुंभार, बाळकृष्ण सुतार, प्रमोद घाटगे, तानुबाई देवकर, सुनंदा पाटील, नीलम देवलकर, शितल केसरकर, अश्विनी पाटील, संगीता देसाई या दहा सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. सरपंच अधिकारपदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करत आहेत. ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत. ग्रामपंचायत कारभारामध्ये सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याची कारणे दिली होती. आज ग्रामपंचायतीमध्ये अविश्वास ठरावावर गुप्त मतदान झाले. ठरावाच्या बाजूने दहा ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास ठराव संमत झाला आहे.

आजरा साखर कारखाना उपाध्यक्षपदी सुभाष देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सुभाष गणपतराव देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष एम.के.देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.काल (बुधवारी) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांचे प्रतिनिधी व्ही.एम.पाटील यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. उपाध्यक्ष पदासाठी सुभाष देसाई यांचे नांव मधुकर देसाई यांनी सुचविले त्यास ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी अध्यक्ष वसंतराव धुरे यांच्या सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘मृत्युंजय महान्यूज’चे वृत्त तंतोतंत खरे
आजरा साखर कारखाना उपाध्यक्षपदी सुभाष देसाई यांच्या निवडीची शक्यता ‘मृत्युंजय महान्यूज’ने व्यक्त केले होते आजच्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड झाल्याने ‘मृत्युंजय महान्यूज’चे हे राजकीय वृत्तही इतर वृत्तांप्रमाणे तंतोतंत खरे ठरले आहे.

शिवजयंतीत हुल्लडबाजीसारखे प्रकार टाळा… उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांचे आवाहन
आजरा पोलीस ठाण्यात मंडळांची बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवजयंती उत्सवा दरम्यान हुल्लडबाजीसारखे प्रकार टाळावेत. विना डॉल्बी व पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देऊन रात्री दहा वाजण्यापूर्वी मिरवणुका आटोपण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी केले. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आजरा पोलीस ठाण्यात आयोजित विविध मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी इंगवले म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जयंती दरम्यान उत्सवाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. ज्या ठिकाणी मूर्ती पूजन, फोटो पूजन केले जाणार आहे त्या ठिकाणी संबंधित मंडळांनी स्वयंसेवक नेमावेत. मिरवणुकीसाठी आवश्यक ते कायदेशीर परवाने घ्यावेत. मद्य प्राशनासारखे प्रकार टाळावेत असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नवीन कायद्यांबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली.
बैठकीस तालुक्यातील २६ शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘आजरा ‘चे जनरल मॅनेजर संभाजी सावंत कार्यकारी संचालक पॅनेल परीक्षा उत्तीर्ण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर संभाजी सावंत साखर कारखाना कार्यकारी संचालक पॅनेल परीक्षा उत्तीर्ण झाले. आजरा कारखान्यात १९९७ पासून रुजू झालेले संभाजीराव सावंत हे सध्या टेक्निकल विभागाचे जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ५० कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल तयार करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली.

अपंगांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चासह बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अपंगांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय संघर्ष मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन नगरपंचायत कार्यालय आजरा यांच्यासमोर करणार असल्याचा इशारा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार व मुख्याधिकारी,नगरपंचायत व गटविकास अधिकारी, आजरा यांना निवेदन देऊन चर्चा केली.
तहसीलदार,मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांनी सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीत तर याबाबतीत अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसिलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा व नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत असे संग्राम सावंत यांनी सांगितले.
दिव्यांग- अपंगांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेबाबतीत त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वेळोवेळी आणि वेळच्या वेळी जमा झाली पाहिजे. यासाठी दिव्यांगांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यासाठी दिव्यांगांच्या पेन्शन बाबतीत जे अडथळे आहेत ते दूर करून त्यांची पेन्शन जर महिन्याला त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा झाली पाहिजे. तशीच दिव्यांगांच्या इतर मागणीबाबत आपण लक्ष घालून संबंधित सर्व विभागांना याबाबतीत सूचना करून याबाबतीतील बैठक लावून संघटनेबरोबर चर्चा करून या प्रश्नाची सोडवणूक करायला हवी आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकरिता पुढाकार घेतलेला नाही.त्यामुळे संघटनेला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असेही स्पष्ट केले आहे.
यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, सुनील अहिरे,समीर खेडेकर, मजीद मुल्ला,रविंद्र भोसले, भारती पवार, रुजाय डिसोजा,अबू माणगांवकर, संजय डोंगरे, यल्लुबाई गोंधळी, बबन चौगुले, अहमद नेसरीकर, दिलीप कांबळे, असिफ मुजावर, सुमिता चंदनवाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यात्रा…ऊरुस
आजपासून काळभेरी यात्रा…
उद्या मुख्य दिवस

महाराष्ट्रासह सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गडहिंग्लज येथील काळभैरीची यात्रा आज गुरुवार पासून सुरुवात होत आहे. आज गुरुवारी सायंकाळी शहरात पालखी सोहळा तर उद्या शुक्रवार (दि. १४) रोजी मुख्य यात्रा होणार आहे.
हजरत दावल मलिकसो आजरा यांचा उरूस १९ व २० तारखेला
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत दावल मलिकसो, आजरा यांचा उरूस १९ व २० तारखेला आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार दि. १९/०२/२०२५ रोजी संदल व गंधरात्र तर गुरुवार दि २०/०२/२०२५ रोजी भर उरूस व गलेफ मिरवणूक श्री. विवेक प्रकाश घोडके (समाधान हॉटेल) यांच्या घरातून सुरुवात करण्याचे आयोजित केले आहे. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हजरत दावल मलिकसो उरूस कमिटी, आजरा यांनी केले आहे.


आजऱ्यात संत रोहिदास जयंती उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चर्मकार समाज आजराच्या वतीने संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांचा हस्ते फोटो पूजन व त्यानंतर हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष अमर केंबळे, इंद्रजीत पांडव,रामराव वंजारे, अभय वंजारे ,सुधाकर वंजारे ,गोपाळ जाधव, सुनील वंजारे, बाबुराव वंजारे, अनिल वंजारे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

थोडे हटके…
हौसेन घेतली चार चाकी…

ज्योतिप्रसाद सावंत
अलीकडे नव्या दुचाकी पेक्षा जुन्या चार चाकी गाड्या स्वस्तात मिळू लागल्या आहेत. कमी पैशात चार चाकीत फिरण्याचा आनंद अनेकजण लुटत आहेत. परिणामी अशा जुन्या गाड्या घराघरासमोर दिसत आहेत. यापैकी कांही चालू तर कांही कायमस्वरूपी बंद अवस्थेत आहेत.
अगदी पंचवीस हजारांपासून किंमत असणाऱ्या या गाड्या ‘लाडक्या बहिणीं’च्या दृष्टीने आता अडचणीच्या ठरणार आहेत. कारण चार चाकी असेल तर या योजनेचा लाभ नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. या गाड्यांमुळे लाडक्या बहिणीचे अनुदान बंद होणार असल्याने कशाला घेतली गाडी ? असा प्रश्न या बहिणींना सतावू लागला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी गाडी विकावी तर प्रतिष्ठेचा प्रश्न… आणि गाडी दारात उभी ठेवावी तर लाभापासून वंचित राहावे लागणार… अशा विचित्र अवस्थेत शासनाच्या या निर्णयाने मतदानापूर्वी लाडक्या असणाऱ्या बहिणी मतदानानंतर अडकल्या आहेत. सरकारने तरी लाडक्या बहिणींच्या या चार चाकीतून फिरण्याच्या आनंदावर विरजण का बरे टाकावे…?

निधन वार्ता
हेमंत नातलेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव सन्मित्र सहकारी पतपेढीचे संचालक हेमंत पांडुरंग नातलेकर (वय ६२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईस्थित नातलेकर हे साळगाव येथे मूळ गावी आले असता गावीच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.
मारुती कोरवी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजीनगर आजरा येथील प्रसिद्ध चिरमुरे व्यापारी मारुती बसाप्पा कोरवी ( वाजंत्री, वय वर्ष ७७ वर्षे )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे. राजेंद्र कोरवी यांची ते वडील होत.


