mrityunjaymahanews
अन्य

गुरूवार सातच्या बातम्या

गुरूवार 

२ जुलै २०२६

आजऱ्यात काजू पिकाला निसर्गाचा फटका, शेतकरी व उद्योजक दोघेही अडचणीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

‘काजूची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजरा तालुक्याला यंदा निसर्गाने मोठा तडाखा दिला आहे. काजू पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच पावसाची साथ नसल्याने खरीप हंगामही धोक्यात आला आहे.

यंदा फळधारणा झाल्यानंतर अवकाळी उष्णता आणि नंतर पावसाचा खंड यामुळे काजू बिया पोसल्या नाहीत. सरासरीच्या तुलनेत ६०% पेक्षा जास्त उत्पादन घटल्याचा अंदाज आहे.
काजूच्या उत्पन्नातूनच अनेक शेतकरी खरीप हंगामासाठी भात, नाचणीचे बियाणे-खते खरेदी करतात. काजूने हात दिल्याने आता खरीपाचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

सध्या आजरा बाजारपेठेत काजू बियांचा दर १५ हजार रुपये प्रति क्विंटल इतका आहे. दर बऱ्यापैकी चांगला असला तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मालच उपलब्ध नाही. त्यामुळे ‘दर आहे पण माल नाही’ अशी अवस्था झाली आहे.

आजरा तालुक्यात लहान-मोठे २०० पेक्षा जास्त काजू प्रक्रिया उद्योग आहेत. स्थानिकांना रोजगार देणारा हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे अनेक कारखाने सध्या बंद अवस्थेत आहेत.
काजू फोडणीचे काम करणाऱ्या ५ हजारांहून अधिक महिला कामगारांचा रोजगार बुडाला आहे.

कारखान्यांसाठी घेतलेले बँकांचे लाखो रुपयांचे कर्ज, कामगारांचे पगार, वीज बिल यांचा तगादा उद्योजकांना सहन करावा लागत आहे. “उद्योगच बंद आहे, उत्पन्न शून्य आहे. बँकांचे हप्ते कसे भरायचे? आमच्या नाकीनऊ आले आहेत,” अशी व्यथा एका काजू उद्योजकाने नाव न सांगण्याच्या अटीवर मांडली.

काजू बागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच काजू उद्योजकांसाठी बँक कर्जाचे हप्ते पुढे ढकलणे व व्याजात सवलत देण्याची गरज आहे. काजूसाठी हवामान आधारित पीक विमा योजना प्रभावीपणे राबवावी.

आजऱ्याची अर्थव्यवस्था काजूवर अवलंबून आहे. शेतकरी जगला तर उद्योग जगेल आणि उद्योग जगला तर रोजगार टिकेल. शासनाने तातडीने लक्ष घालून शेतकरी व उद्योजक दोघांनाही दिलासा देणे गरजेचे आहे, अन्यथा ‘काजूची पंढरी’ ओस पडायला वेळ लागणार नाही.

आजऱ्यात कृषी दिन उत्साहात


आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पंचायत समिती, आजरा व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रम पंचायत समिती आजरा येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे या होत्या. यावेळी उप सभापती सौ. यशोदा पोवार, जि. प. सदस्य शिरीष देसाई, पं स सदस्य समीर पारदे, उप विभागीय कृषी अधिकारी किरण पाटील , सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश पुजारी, कृषी अधिकारी दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, विस्तार अधिकारी पृथ्वीराज चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री. फुले व कृषी विभागाकडील अधिकारी – कर्मचारी व संख्येने शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

सुरुवातीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वस्तंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सहायक गट विकास अधिकारी श्री. सुरेश पुजारी यांनी केले. यानंतर तालुका पातळी भात, भुईमूग, नाचनी पीक स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी, कृषी विभागाकडील विविध शासकीय योजनांमधील पुरस्कार प्राप्त शेतकरी, जिल्हा परिषदे कडील कृषी विभागाकडील विविध योजनातील अनुदान प्राप्त शेतकरी तसेच पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांमध्ये लाभधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. किरण पाटील यांनी शासनाच्या कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती दिली. पंचायत समिती सदस्य श्री. समीर पारदे यांनी “आज सन्मानित केलेले शेतकरी हे या सन्मानास खऱ्या अर्थाने पात्र असल्याचे सांगितले.” यावेळी बोलताना पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा पोवार या म्हणाल्या की, “कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे शेतकऱ्याच्या हिताच्या योजना ताळागाळापर्यंत पोहोचवल्यास शेतकऱ्यांची जीवनात खऱ्या अर्थाने उन्नती व समृद्धी येईल.” जिल्हा परिषद सदस्य श्री शिरीष देसाई यांनी “कै.वसंतरावजी नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये राबवलेल्या विविध कायद्यांचा, योजनांचा व उपक्रमांचा उल्लेख करून शेतकऱ्याच्या आयुष्यात नंदनवन फुलवण्यासाठी कशाप्रकारे त्यांच्या कारकीर्दीत मनापासून काम केले याचे सविस्तर मार्गदर्शन करून आजच्या काळातही त्यांच्या कार्याची व विचारांची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात सभापती सौ. जयश्री गाडे यांनी “यापुढे शेती हा उद्योग मानून शेतकऱ्याने आधुनिक शेतीचा अंगीकार करून विविध योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या शेतीचे उत्पादन वाढवून आर्थिक जीवनमान उंचवावे” असे अहवान केले महिलांनीही यापुढे शेतीमध्ये शेतकरी गट स्थापन करून शेती उद्योगांमध्ये आपले स्वावलंबन शोधावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे आभार कृषी अधिकारी श्री. दिनेश शेटे यांनी मांडले. सूत्रसंचालन श्री. मारुती डेळेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांची आजऱ्याला भेट

तहसील कार्यालयात बैठक: आपत्ती व्यवस्थापन, मतदार यादीबाबत सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हाधिकारी डॉ. विजयसिंह राठोड यांनी आजऱ्याला भेट दिली. येथील तहसीलदार कार्यालयात सर्व विभागाच्या प्रमुखासोबत बैठक घेतली. आपत्ती व्यवस्थापन, विशेष सखोल पुर्ननिरीक्षण कार्यक्रम २०२६ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदार यादी यासह विविध विषयावर चर्चा केली व मार्गदर्शक सूचना केल्या.

आज सकाळी कोल्हाप्रह्न जिल्हाधिकारी उत्तूरमधे दाखल झाले. त्यांनी उत्तूर येथील निसर्गोपचार आरोग्य केंद्र व सौर उर्जा प्रकल्पाला भेट देवून पहाणी केली. या वेळी रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ते थेट आजरा तहसीलदार कार्यालयात आले.

या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, मतदारयादीसह विविध विषयावर विभागप्रमुखासोबत बैठक घेतली. या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. मतदार यादीच्या कामाबाबतही माहीती घेतली. मार्गदर्शन करून आवश्यक सूचना केल्या. त्यांच्यासोबत आजरा गारगोटीचे प्रातांधिकारी हरेश सुळ होते. यावेळी तहसीलदार समीर माने यांनी कामकाजाचा आढावा दिला. गटविकास अधिकारी सुभाष सावंत, आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, मसल नायब तहसीलदार विकास कोलते. तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बँकेची आजरा तालुक्याची ९९.३०% वसुली : संचालक सुधीर देसाई यांची माहिती

 

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आजरा तालुक्याची बँक पातळीवरील वसुली ९९.३० % झाल्याची माहिती संचालक सुधीर देसाई यांनी दिली.

वसुलीकामी बँकेचे चेअरमन ना. हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन व सर्व विकास सेवा संस्थांचे चेअरमन, संचालक व सभासदांचे सहकार्य लाभल्याचे देसाई म्हणाले.

सन २०२५-२६ करिता बँकेचे १११ संस्थाकडे वसुलपात्र अल्प मुदत कर्ज ६८ कोटी ८० लाख ८६ हजार, तर मध्यम मुदत कर्ज २ कोटी ३७ लाख २७ हजार असे एकूण ७१ कोटी १८ लाख १३ हजार इतके कर्ज होते. पैकी मध्यम मुदत संपूर्ण कर्ज वसुल झाले. अल्पमुदत कर्ज ६८ कोटी ३१ लाख ११ हजार इतके वसुल झाले.

वसुलीकामी सर्व विकास सेवा संस्थांचे चेअरमन, संचालक, सभासद तसेच बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे, सर्व निरीक्षक, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे तसेच सहकार खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

१९ संस्था सभासद पातळीवर १०० %

तालुक्यातील १११ पैकी तब्बल १९ संस्थाची ह्या वेळी सभासद पातळीवर १००% वसुली झाली आहे. त्यामध्ये दर्डेवाडी, वडकशिवाले, महागोंड, खोराटवाडी, मेढेवाडी, विनायकवाडी, हंदेवाडी, मसोली, हनुमान वाटंगी, मोरेवाडी, एमेकोंड, सिद्धिविनायक देवर्डे, सुलगाव, बाची, चाफवडे, आवंडी, शृंगारवाडी, भावेश्वरी सरोळी व बुरुडे ह्या संस्थांचा समावेश आहे.

शिवसेना पेरणोली शाखेमार्फत पालकमंत्री नाम. आबीटकर यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिवसेना पेरणोली शाखेमार्फत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने विविध उपक्रम पार पडले.

गावातील ५०० ग्रामस्थांना मोफत धनुर्वात लस देण्यात आली. गावामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. संतोष जाधव, रवींद्र देसाई, अविनाश जोशीलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 छाया वृत्त…

डॉक्टर दिनानिमित्त ‘ मृत्युंजय ‘ कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डॉक्टर्स व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या हातून गोरगरीब रुग्णांची सेवा होऊ दे अशा सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख समीर चांद,संजय सावंत, हरिश्चंद्र व्हरकटे, महादेव गुरव, महादेव खामकर, डॉक्टर केळकर/सातोसकक्र, डॉ. तेऊरवाडकर , मुजावर यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो क्लिक 

रामतीर्थ धबधबा पुन्हा एकदा नवा साज व नवा बाज घेऊन कोसळू लागला आहे. 

गोकुळच्या रणांगणात सावळा गोंधळ…
५९५ अतिरिक्त ठराव दाखल

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 484 दुध संस्थांनी ठरावाचे मसुदे पाठवले नेतेमंडळींकडून ७७४४ ठरावांचे दावे झाले पण प्रत्यक्षात ५४३९ ठराव दाखल झाले. दुबार, तिबार ठराव दाखल झाल्याने सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. ४४६५ संस्था पात्र असताना ५४३९ ठराव दाखल झाले आहेत.

छाया वृत्त…

आंबोली – आजरा फाट्यावर पेट्रोल वाहतूक करणारा टॅंकर मंगळवारी रात्री रस्त्याच्या मधोमध कोसळला. सदर टँकर सांगलीहून वेंगुर्ले मठ येथे चालला होता. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. टँकर हलवताना मात्र प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.

आजचे पंचांग

दिनांक : ३ जुलै २०२६

वार : गुरुवार

माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (सकाळी ०९.३७ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (सकाळी ०९.२६ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : वैधृति योग (सायंकाळी ०४.३८ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : गराजा करण (सकाळी ०९.३७ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.२२ ते दुपारी ०४.०१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.०६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!