mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मसोली येथे मारामारी…
पाच जखमी…
१० जणांविरोधात गुन्हा नोंद

          आजरा :मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मसोली ता.आजरा येथे वाढीव गावठाण मधील भूखंडाच्या मालकीचा कांबळे कुटुंबीयांमध्ये वाद आहे . मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सदर भूखंडामध्ये मोहन चंद्रू कांबळे यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली लावताना संतोष कांबळे यांच्या कुंपणाचे नुकसान केल्याच्या समजातून पुन्हा एकदा वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर मारामारीत होऊन यामध्ये पाच जण जखमी झाले असून पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे .याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

     पांडुरंग चंद्ररूप कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष शिवाजी कांबळे, शिवाजी गोपाळ कांबळे, लक्ष्मी संतोष कांबळे व कमल शिवाजी कांबळे यांनी पांडुरंग कांबळे व मोहन कांबळे यांना दगडाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले असून यामध्ये हे दोघेजण जखमी झाले आहेत. या फिर्यादीवरून वरील चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      तर संतोष शिवाजी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत मोहन चंद्रू कांबळे, पांडुरंग चंद्रू कांबळे, चंद्रू गोपाळ कांबळे, कविता श्रीकांत कांबळे, अनिता मोहन कांबळे,पूजा पांडुरंग कांबळे यांनी शिवाजी गोपाळ कांबळे व संतोष गोपाळ कांबळे या दोघा बंधूंसह शिवाजी कांबळे यांना मारहाण केल्याने ते दोघे जखमी झाले आहेत असे नमूद केले आहे . या फिर्यादीवरून वरील सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     सर्व जखमींवर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

     न्याय सोडवण्यासाठी गेलेल्या मंडळींसमोरच सदर मारामारी झाल्याने मसोली पंचक्रोशीत या प्रकरणाची जोरात चर्चा आहे.

आज-यात रविवारी संविधान परिषद
पत्रकार बैठकीत माहिती

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क व अधिकारासाठी तसेच भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम व वास्तव यांची ठोसपणे मांडणी करून भारतीय राज्य घटनेत असलेले अल्पसंख्यांकांचे स्थान व मूलभूत अधिकार यांची सविस्तर चर्चा करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० जून रोजी सकाळी ११ ते ४ कालावधीत श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत सभागृहात ‘ संविधान सन्मान परिषद’ आयोजित केली आहे, अशी माहिती कॉ. संग्राम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      संविधान हे प्रमाण मानून मुस्लिम समाजाची वाटचाल सुरू असताना मुस्लिम समाजाबाबत अनेक समज-गैरसमज तयार झाले आहेत. प्रसंगी एखाद्या घटनेवरून संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचे प्रयत्न होताना दिसतात. या सर्वाचा उहापोह या परिषदेत करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

      कार्यक्रमाचे उदघाट्न रियाजभाई शमनजी चेअरमन, शमनजी ग्रुप अँड इन्स्टिट्यूट, डॉ. नवनाथ शिंदे, बाळेश नाईक, अब्दुलवाहिद सोनेखान यांच्या हस्ते होणार आहे. इंजि. फारुख गवंडी , महेश परुळेकर , आशपाक मकानदार सामाजिक कार्यकर्ते, गडहिंग्लज हे मार्गदर्शन करणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले.

      पत्रकार बैठकीस अमित खेडेकर, रशिद पठाण,आलम नाईकवाडे,समीर खेडेकर , अबूसईद माणगांवकर, मौजुद माणगांवकर, बबलू शेख, सलीम लतीफ, अ. करिम कांडगावकर, जुबेर चांद उपस्थित होते.

छ. शिवरायांच्या पुतळ्याचे आचारसंहितेपूर्वी उद्घाटन करा…
अन्याय निवारण समितीची मागणी


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा येथे स्थानिक शिवप्रेमी नागरिक, विविध संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या योगदानातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आचारसंहितेपूर्वी अनावरण करा अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने पुतळा समितीचे अध्यक्ष बापू टोपले यांच्याकडे करण्यात आली आहे.तसे लेखी पत्रही समितीला देण्यात आले आहे.

    सद्यस्थितीस येथे असणारा पुतळा झाकून ठेवण्यात आला आहे. पुतळा झाकून ठेवणे म्हणजे शिवप्रेमींच्या दृष्टीने अपमानकारक बाब आहे.जर समितीने सदर उद्घाटन केले नाही तर या पुतळ्यासाठी घसघशीत पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अन्याय निवारण समिती पुतळ्याचे अनावरण करील असा इशाराही या पत्रामध्ये देण्यात आला आहे.

     यावेळी परशुराम बामणे, सुधीर कुंभार, संतोष बांदिवडेकर, पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव, वाय.बी. चव्हाण,संजय जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चांगला माणूस बनविण्याचे व्यासपीठ म्हणजेच आजरा महाविद्यालय ‘ : सिने अभिनेते आत्माराम पाटील 

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान मधील नवागतांचा स्वागत सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेते आत्माराम पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ होते.

       यावेळी आत्माराम पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय हे अत्यंत चांगले व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून एक चांगला माणूस बनण्यासाठी ज्ञान संपादन करा. आजरा महाविद्यालयासारख्या नामांकित महाविद्यालयामध्ये प्राध्यापक ज्ञानदान करण्यासाठी कटिबद्ध आहेत. ज्ञानदानाबरोबरच सर्व कौशल्यांचा विकास व व्यक्तिमत्त्वाचा विकास नक्कीच या ज्ञानपीठातून होईल यात काही शंका नाही. यशाची नवी शिखरे गाठत असताना आपल्याला पाठीमागे वळून पाहणे गरजेचे असते. आपल्या यशामागील आई-वडील, शिक्षक व गुरुजन यांना कदापिही विसरू नका ‘ असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

       डॉ. आनंद बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘महाविद्यालय हे ज्ञानाचे भांडार आहे तुम्हाला जे हवे आहे ते अमर्यादपणे आत्मसात करा. स्वकर्तुत्वावर तुम्ही यशाची शिखरे पादाक्रांत करा. महाविद्यालयातील सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्या’ असे मत व्यक्त केले.

      कार्यक्रमाची सुरुवात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालय आणि शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. तसेच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीच्या सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

      या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक श्री योगेश पाटील, प्रा.विनायक चव्हाण प्रा.मल्लिकार्जुन शिंत्रे प्रा.अल्बर्ट फर्नांडिस प्रा.वैशाली देसाई प्रा.शोभा केंद्रे, प्रा.संजीवनी कांबळे , प्रा.पल्लवी नार्वेकर, प्रा. पुनम पाटील, प्रा. वैशाली देसाई आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे स्वागत प्रा.विठ्ठल हाक्के तर प्रास्ताविक प्रा. सौ. सुवर्णा धामणेकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा.अनिल निर्मळे यांनी तर आभार वैशाली देसाई यांनी मानले.

     सूत्रसंचालन प्रा.रत्नदीप पवार यांनी केले.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाघाच्या हल्यात बैल ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखाना बेरिंग्ज चोरीप्रकरणी पाचजण अटकेत… धक्कादायक.. ‘कुंपणानेच खाल्ले शेत’.कार्यकारी संचालकासह पाचजण गजाआड

mrityunjay mahanews

सुळे येथील तिघांचा बुडून मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!