रविवार
२३ ऑगस्ट २०२६

मडिलगे येथे भर दिवसा चोरी…
सोन्याचे दागिने व रोकड लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे (ता. आजरा) येथील एका घरात अज्ञात चोरट्याने घराच्या बाजूला असलेल्या जनावरांच्या गोठ्याच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करून कपाटातील, तिजोरीतील लॉकरमधील पावणे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सौ. रेश्मा संतोष घाडगे (वय ३७, रा. मडिलगे) या शेतकामानिमित्त बाहेर गेल्या असताना दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे दहा ते सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली.
चोरट्याने घरातील खोलीतील तिजोरी फोडून अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण (पदक असलेले), दीड तोळ्याची स्वस्तिक लॉकेट असलेली चैन, अर्ध्या तोळ्याची मण्यामण्याची लाखी बोरमाळ आणि २५ हजार रुपये रोख असा ऐवज लांबविला आहे.
या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

निराधारांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय वाटचाल यशस्वी : ना. हसन मुश्रीफ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे ऋण कितीही जन्म घेतले तरी फेडणे अशक्य आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी सलग सहावेळा आमदार आणि नऊवेळा मंत्री होण्याचे भाग्य लाभले, असे भावनिक प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. उत्तूर येथे आयोजित कार्यक्रमात उत्तूर विभागातील ४५६ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुनील दिवटे होते.
मुश्रीफ म्हणाले, १९९९ मध्ये विशेष सहाय्य खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संजय गांधी योजनेतील अनेक कडक अटी शिथिल करून ही योजना खऱ्या अर्थाने वृद्ध, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग व निराधारांसाठी अधिक सुलभ केली. उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करणे, वयोमर्यादा ६० वर्षांवर आणणे आणि मासिक पेन्शन २,००० रुपये करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी करून पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी चेअरमन वसंतराव धुरे, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, सदस्य विकास चोथे, माजी उपसरपंच समीक्षा देसाई, मारुतीराव घोरपडे, संभाजीराव तांबेकर, संजय येजरे, दीपक देसाई, राजेंद्र मुरकुटे, सुधीर सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सुनील दिवटे यांनी, सूत्रसंचालन सुधाकर मुळीक यांनी तर आभार अंबाजी गुरव यांनी मानले.

ज्ञानाच्या वाटेवर सायकलींची साथ…

विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाला गती देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा प्रेरणादायी सायकल वितरण सोहळा भादवण हायस्कूल, भादवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.जी.कुंभार यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा,त्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे आणि शिक्षणाच्या वाटचालीला अधिक वेग मिळावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना,जिद्दीला आणि उज्ज्वल भविष्यातील वाटचालीला मिळालेली प्रेरणेची चाके आहेत,अशी भावना यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष के.जी.पटेकर यांनी व्यक्त केली.
प्रातिनिधिक स्वरूपात पालकांच्या वतीने स्वाती सचिन पाटील यांनी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराच्या पदाधिकाऱ्यांनी राबविलेल्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के.जी.पटेकर,खजिनदार सुनील पाटील,उद्योजक सचिन शिंपी,ज्येष्ठ संचालक सुधीर जाधव,विलास पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मान्यवर,पालक स्वाती पाटील, सुमित्रा पाटील,दत्तात्रय पाटील, विजय गवळी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विषय शिक्षक प्रशांत गुरव यांनी केले तर आभार विलास गवारी यांनी मानले.
आजऱ्यात संजय गांधी निराधारची ४५६ प्रकरणे मंजूर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीने जुलै व ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जापैकी ४५६ लाभार्थांची प्रकरणे मंजूर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुनील दिवटे यांनी दिली. समितीकडे ५२१ अर्ज आले होते. पैकी संजय गांधी निराधार योजनेतून ९२ तर श्रावणबाळ योजनेतून ३६४ अर्ज पात्र करण्यात आले. ९ अर्ज विविध कारणांनी अपात्र करण्यात आले,तर ५६ अर्ज फेरचौकशीसाठी मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. बैठकीला तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार कोलते यांच्यासह सदस्य शशिकांत सावंत,दशरथ अमृते संतोष चौगले, किशोर जाधव, मधुकर राणे यांच्यासह जावेद बागवान, संतोष सांगडे उपस्तिथ होते.
निधन वार्ता
हेमंत नरके

लिंगायत गल्ली आजरा येथील हेमंत (राजू) नरके यांचे आज दि.२२ ऑगस्ट रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
आजचे पंचांग
दिनांक : २३ ऑगस्ट २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : एकादशी तिथी ( २४ ऑगस्ट पहाटे ०४.१८ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (सायंकाळी ०५.४४ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (सकाळी ०६.१३ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०३.१० पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.२५ ते सायंकाळी ०६ .५९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.२३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


