मंगळवार दि. १० डिसेंबर २०२४

बाळासाहेब जक्कणवर यांचे निधन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब जक्कणवर यांचे सोमवार दिनांक ९ रोजी सकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी बातमीदार म्हणून काम केले आहे. निधन समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
कर्नाटकातील इरकल डॅम परीसरातील एका पाचापूर गावाजवळील एका छोट्याशा गावातून व्यवसाय निमित्त उत्तूर येथे स्थलांतरीत झालेले बाळासाहेब निर्भिड वृत्तीचे होते. पत्रकारीते बरोबरच वृत्तपत्र विक्रते होते. जुन्या अकरावी नंतर पुढील शिक्षण न घेता राजकारणात डाव्या विचारसरणीचे एक कम्युनिस्ट पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत होते.संघटना मजबूत करुन कष्टकरी कामगार,शेतकरी,मजूर ,शोषीत,पिडीत लोकांसाठी काम सुरु केले.
त्यांनी एस.टी प्रवासी संघटनेसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करुन उत्तूर – कोल्हापूर एस.टी.सुरु केली होती.मजूर संघटना स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.कोल्हापूर जिल्हा मंजूर संघटनेचे ते संचालक होते.जनता डेअरी सुरु करण्यात त्यांचा वाटा होता.ते मनमिळाऊ स्वभावाचे,अजात शत्रू म्हणून ओळखले जात होते.
आजरा ग्रामीण रुग्णालयात क्षय मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसांच्या क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालय आजरा सल्लागार समितीचे सदस्य विजय थोरवत यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. २०२५ पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. दिनांक सात डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२५ अखेर ही योजना राबवण्यात येणार आहे . क्षय रोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे, अती जोखमीच्या व्यक्तींमध्ये क्षयरोग शोधून काढणे व त्यावर उपचार करणे, आणि क्षय रोगाचा प्रसार थांबवणे ही मोहिमेची उद्दिष्टे आहेत.
अशी माहिती श्रीमती काजल देसाई यांनी उपस्थितांना दिली.
भारत क्षयरोग मुक्त करण्याची शपथ यावेळी संग्राम पाटील यांनी सर्वांना दिली. सदर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून आजरा तालुका क्षयमुक्त करूया असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वंदना ठाकूर , श्री दळवी आजरा ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिक रुग्ण उपस्थित होते.
आभार संतोष पाटील यांनी मांडले.
संध्या बहनजींकडून समाजासाठी आयुष्याचे समर्पण : सुनंदा बहनजी
आजऱ्यात अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लौकिक जीवनाचा त्याग करून तन, मन आणि धनाच्याहीव्दारे संध्या बहनजी यांनी समाजासाठी आणि ईश्वरीय कार्यासाठी आयुष्याचे समर्पण केले असे गौरवोद्गागार प्रजापिता ब्रह्मा कुमारी विश्वविदयालयाच्या क्षेत्रीय संचालिका सुनंदा बहनजी यांनी काढले.
आजरा सेवा केंद्राच्या संचालिका संध्या भास्कर पोतदार उर्फ संध्या बहनजी यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी, जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई, जनता बॅंकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, माजी सरपंच जनार्दन टोपले, संगाप्पा साखरे, भिकाजी गुरव, एम. के. गोंधळी, के.व्ही. येसणे, अनिरूध्द केसरकर, जे. जे. बारदेसकर आणि माऊंट आबूहून आलेले प्रकाश भाई यांच्यासह कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील अनेक सेवा केंद्रांच्या संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.
सुनंदा बहनजी म्हणाल्या, जगभरात भौतिक सुविधा वाढल्या, तसे आजारही वाढले. शिक्षण सुविधा वाढल्या, परंतू संस्कार कमी झाले, समाज खूप शिकला पण घटस्फोटही वाढले. अशा परिस्थितीत मनशांतीची गरज आहे. शास्त्र शाखेतील सुवर्णपदक विजेत्या संध्या बहनजी यांनी ब्रम्हाकुमारीची विचारधारा अंधश्रध्दा नसून विज्ञानपूरक आहे हे समजून घेतल्यानंतर या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. आजरा, गडहिंग्लज, चंदगड परिसरात हा विचार रूजवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
सत्काराला उत्तर देताना संध्या बहनजी म्हणाल्या, मला पटलेल्या या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कार्याला आयुष्य देण्याचा निर्णय घेतला. समाजाच्या पाठबळावर हा विचार मी प्रसारित केला. विचाराच्या माध्यमातून समाजाने मनशांती मिळवण्याचा निर्धार करावा. यावेळी लुईस रॅाड्रिग्ज, यांनी मनोगत व्यक्त केले. मनिषा बहनजी यांनी प्रास्ताविक केले.सुनीता दीदी यांनी विद्यालयाचा परिचय करून दिला. बापू भाई यांनी पोवाडा सादर केला तर उत्तम भाई यांनी आभार मानले. विनायक भाई आणि कीर्ती बहनजी यांनी सूत्र संचालन केले.
खेडे येथे भगवद् गिता जयंती उत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प.पू. सद्गुरु भिकू रामा चौगुले उर्फ भर्तरीनाथ महाराज वारकरी सांप्रदाय भक्ती सेवा मठ खेडे यांच्या वतीने भागवद् गीता जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाची सुरुवात आज मंगळवार दिनांक १० डिसेंबर पासून होणार असून १० डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी पाच ते सहा च्या दरम्यान काकड आरती, त्यानंतर साडेसात ते अकरा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ सात ते आठ प्रवचन व रात्री नऊ ते ११ हरिकीर्तन व १२ ते ४ जागर असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या उत्सवामध्ये विविध गावातील भरणे मंडळे व मान्यवर सहभागी होणार आहेत.
१२ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे असे संयोजकांमार्फत सांगण्यात आले.
निधन वार्ता
प्रकाश मुळीक

भादवण: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता. आजरा येथील प्रकाश मुळीक (वय ४३ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
गणपती जाधव

भादवण: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता-आजरा येथील गणपती जाधव ( वय ९० वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलग , सून आणि नातवंडे असा परिवार आहे.





