mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

बुधवार 

१ जुलै २०२६

एक झोका… चुकला काळजाचा ठोका

शालेय विद्यार्थिनीचा गळफास लागून मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

घरात ओढणीचा झोपाळा करून खेळत असताना अचानक ओढणीचा फास आवळला गेल्याने नाईक गल्ती येथील १३ वर्षीय आफिया जाबीर शेख या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी घडली.

जाबीर शेख कुटुंबीय हे नाईक गल्लीत भाडोत्री घरामध्ये रहातात. काल रात्री साडे आठच्या दरम्यान मयत आफिया ही घरातच खेळत होती.घरातील अँगल ला ओढणी बांधून गोल झोका घेत होती.खेळताना अचानक ओढणीचा फास गळ्यात अडकला व त्यातच तीचा फास लागून मृत्यू झाला.

हातावरचे पोट असणाऱ्या शेक कुटुंबीयांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांना तीन मुले आहेत.मयत आफिया ही मोठी मुलगी.घरातील सर्व कामे करुन आईला मदत करायची.घरात मुले खेळतात म्हणून दोनच दिवसांपूर्वी वडील जाबीर यांनी ती ओढणी काढून टाकली होती मात्र कालच आफियाने वडील घरात नाहीत म्हणून खेळण्यासाठी पुन्हा ओढणी बांधली.त्याच ओढणीने आफियाचा बळी घेतला.

घटनेची वर्दी अफियाचे वडील जाबिर आजरा पोलिसात दिली आहे.आफिया ही येथील डॉ.झाकिर हुसेन ॲंग्लो उर्दू हायस्कूल येथे ७ वीत शिकत होती.

आजरा नगरपंचायत कचऱ्याच्या नियोजनासाठी प्रयत्नशील, पण नागरिकांचाच असहकार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

‘स्वच्छ आजरा, सुंदर आजरा’चा नारा देत नगरपंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी कंबर कसली आहे. मात्र, नागरिकच जर गांभीर्याने घेत नसतील तर आजऱ्यातील कचरा प्रश्न सुटणार कसा, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. घरोघरी जाऊन ओला-सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी रोज सकाळी घंटागाडी फिरते. परंतु अनेक ठिकाणी नागरिकांच्या असहकार्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य दिसू लागले आहे.

मुख्य चौक, बाजारपेठ, वॉर्डांमध्ये सार्वजनिक कचराकुंड ठेवले आहेत, जनजागृती मोहीम, ओला-सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड आकारण्याची तरतूद आहे.

या सर्व उपक्रमांना नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसू लागले आहे. हिरण्यकेशी नदीकाठ, चित्रा नदीपात्र, पोलीस स्टेशन परिसर, भाजी मार्केट परिसर, बसस्थानकामागील मोकळी जागा येथे प्लास्टिक, कचऱ्याचे ढीग साचत आहेत.

रात्रीच्या वेळी अनेकजण पिशव्या बांधून मोकळ्या जागेत कचरा फेकतात. दुकानदारांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे.

पावसाळा तोंडावर असताना कचरा साचल्याने डास, दुर्गंधी व साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. नदीकाठचा कचरा थेट पाण्यात मिसळून पाणी प प्रदूषण होणार आहे. आजऱ्याचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही धोक्यात आले आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर  यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आजरा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले तसेच रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून हरित पर्यावरणाचा संकल्प करण्यात आला.

यानंतर  रामतीर्थ मंदिर येथे विधिवत आरती करून माननीय पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.

या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरावत इंद्रजीत देसाई, संतोष भाटले, काका देसाई, दयानंद निऊंगरे, महेश खेडेकर, मंदार बिरजे, सुनील दिवेकर, जगदीश ढोकरे,अभिजित शिंदे ,नितीन यादव, विक्रम गायकवाड, अमजद माणगावकर, शरीफ खेडेकर तसेच परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेरणोली येथे यश फाऊंडेशनचा शैक्षणिक साहित्याचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील केंद्र शाळेमधे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश जोशीलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत, रविंद्र देसाई, ग्रामपंचायत सदस्य रणजित फगरे, उ‌द्योजक एकनाथ जोशीलकर आदी प्रमुख उपस्थित होते. यश जाधव यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यश फौंडेशनचे संस्थापक संतोष जाधव म्हणाले, यश फाऊंडेशनची स्थापना समाजातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, तसेच सामाजिक सेवे‌द्वारे प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दिलेले शैक्षणिक साहित्य हे केवळ मदतीचे साधन नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील एक छोटी गुंतवणूक आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा सेवाभावी कार्यात सहभागी होऊन शिक्षणाचा दीप प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा, हीच अपेक्षा. सर्वांच्या सहकार्याने यश फाऊंडेशन भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहील. गीता नाईक म्हणाल्या, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे यश फाऊंडेशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य, समाजसेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. शिक्षक धनाजी रावण यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एकनाथ पाटील, नामदेव सावंत, सोपान फगरे, राजेंद्र कळेकर, भाऊ भोकरे, हर्षद लोंढे, काकासो सुतार, संतोष सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा वाढदिवस निमित्य सोहाळे येथे शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा वाढदिवस उत्साहात झाला. सोहाळे, बाची, सोहाळेवाडी ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांच्या पुढाकाराने अनंत विद्या मंदिर, आहाळे व विद्या मंदिर, बाची येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या वेळी सरपंच सा. डेळेकर, उपसरपंच वसंत कॉडूस्कर, प्रगतशील शेतकरी सूर्यकांत दोरुगडे, माजी सैनिक महादेव देसाई, सूर्यकांत देसाई, वीरदेव समितीचे अध्यक्ष शिवाजी दोरुगडे गुणबा कोंडूस्कर तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच उपस्थित होते. सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

वाढदिवसानिमित्त धामणेत आमराई चा संकल्प

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

धामणे गावाची ‘आमराईकडे हरित वाटचाल’ या संकल्पनेला चालना देत गावचे उपसरपंच शिवाजी लोकरे व माजी उपसरपंच बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त धामणे प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थी व शिक्षकांना २०० केशर आंबा कलमांची मोफत रोपे वाटप करण्यात आली.
धामणे गावचे सुपुत्र प्रताप अस्वले यांनी अंबाजी गुरव व अरुण पाटील यांच्या पुढाकारातून शेतकरी बांधवांसाठी केवळ १३० रुपये दराने ४०० आंबा कलमे उपलब्ध करून दिली. तसेच ग्रामदैवत आई अंबाबाई मंदिर परिसरासाठी दहा विविध प्रकारची शोभेची वृक्षही भेट दिली.

या उपक्रमासाठी दशरथ कांबळे, चंद्रकांत ईळके, हळवणकर गुरुजी, अरुण पाटील, अंबाजी गुरव, बाळासाहेब जाधव, ज्ञानदेव आरेकर, राहुल गुरव, पुंडलिक मगदूम, बाळू भोसले, ग्रामपंचायत धामणे व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. विशेषत अंबाजी गुरव व अरुण पाटील यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

छाया वृत्त

अन्याय निवारण समितीच्या वतीने आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मधील चराटी कॉलनी, आपटे कॉलनी, आनंदवन कॉलनी, रवळनाथ कॉलनी व आयडियल कॉलनी येथे स्ट्रीट लाईट बसविण्याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी व महावितरणचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात संबंधित भागात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत असून, चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी करण्यात आली.

आजचे पंचांग

दिनांक : १ जुलै २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : प्रथम तिथी (सकाळी ०७.३८ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (सकाळी ०६.५० पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : इन्द्र योग (सायंकाळी ०४.०३ पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : कौलव करण (सकाळी ०७.३८ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : धनु राशी (दुपारी ०१.३१ पर्यंत) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४२ ते दुपारी ०२.२२ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पावसाने भिंत कोसळली… महिला गंभीर जखमी

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!