बुधवार दि.२२ आक्टोंबर २०२५




तिघे जखमी…
सात जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ऐन दिवाळी दिवशी कानोली ता.आजरा काका व पुतण्यांच्या भावकीमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान कोयता व लाठी काठीच्या मारामारीत होऊन तब्बल तिघे जखमी झाले असून सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी...
कानोली ता. आजरा येथील शैलेश चंद्रकांत पाटील व मारुती आप्पा पाटील यांच्यामध्ये बोलण्यातून एकमेकांना शिवीगाळ करण्याचा प्रकार व त्यानंतर वाद झाला. सदर वादाचे पर्यवसान अखेर मारामारीत झाले. यामध्ये तिघे जखमी झाले असून पोलिसांनी सात जणांवरोधात गुन्हा नोंद केला आहे.
शैलेश चंद्रकांत पाटील ( रा.कानोली वय ३६ वर्षे ) यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांनी आपण जेवण करून घरात बसलो होतो. चुलते मारुती आप्पा पाटील हे आपल्या आईला शिवीगाळ करू लागले. याचा जाब विचारण्यासाठी गेलो असता ते घरातून कोयता घेऊन आले व त्यांनी डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले असल्याचे म्हटले आहे. तर मारुती आप्पा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत आपण घरी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जेवण करून बोलत बसलो असता सतीश चंद्रकांत पाटील, शैलेश चंद्रकांत पाटील यांनी घरात घुसून टोण्याने डोक्यात व हातावर जबरी मार देऊन जखमी केले तर सुरेखा चंद्रकांत पाटील व सोनाबाई आळगुंडकर यांनी आपल्या पत्नीला मारहाण केली यामध्ये घरातील वस्तूंची व घड्याळाची तोडफोड केली असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी आजरा पोलिसांनी शैलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारुती आप्पा पाटील व त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा नोंद केला आहे तर मारुती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश चंद्रकांत पाटील, शैलेश चंद्रकांत पाटील, चंद्रकांत आप्पा पाटील, सुरेखा चंद्रकांत पाटील व सोनाबाई आळगुंडकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे यामध्ये शैलेश चंद्रकांत पाटील यांच्यासह मारुती आप्पा पाटील व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. जखमींवर ठीक ठिकाणी उपचार सुरू आहेत.
पुढील तपासाकरीता फॉरेन्सिक लॅब टीमला पाचारण करण्यात आले असून पोलीस हवालदार डी.व्ही. बेनके हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.


कोळींद्रे येथे दीड कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोळिंद्रे ता. आजरा येथे आमदार शिवाजीराव पाटील, अशोकअण्णा चराटी आणि जयवंत मसणू सुतार प्रयत्नातून मंजूर असलेल्या जवळपास एक कोटी पन्नास लाखांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जयवंत सुतार, सरपंच वंदना सावंत, संभाजीराव सरदेसाई, इंजी. विजयकुमार पाटील, तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, संदीप चौगुले, समीर पारदे, विकास बागडी, एम.टी.पाटील, सी.आर.देसाई, उंचगी सरपंच समीर देसाई, लाकूडवाडी उपसरपंच शिवप्रसाद पाटील, उमेश घोरपडे, संदीप देसाई,अजित हरेर, सदाशिव हेब्बाळकर, भिमगोंड पाटील, जनार्दन भोसले, अमर मोरे, प्रकाश पाटील, रमेश बुगडे, सुधाकर पाटील, सुभाष सावंत, गणपती पाटील, तुकाराम बामणे, अक्षय पाटील, रामजी पाटील, अरुण भोगले, ज्योतिबा बोर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


विभागीय सहनिबंधक महेश कदम यांची तालुका खरेदी विक्री संघाला भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विभागीय सहनिबंधक महेश कदम व जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी आजरा तालुका खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली व संस्थेच्या डोंगराळ व दुर्गम भागात असूनही सुरू असलेल्या प्रगती पर कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या आग्रहामुळे आपण तालुका संघाला भेट दिली असे त्यांनी सांगितले. स्वागत व प्रस्ताविक संघाचे अध्यक्ष महादेव पाटील धामणेकर यांनी केले. सुधीर देसाई यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. जिल्हा उपनिबंधक करे यांचे स्वागत व सत्कार उपाध्यक्ष डी.ए. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे संचालक उदयराज पवार, अल्बर्ट डिसोजा, एम.के.देसाई, महादेव हेब्बाळकर, विठ्ठलराव देसाई, राजाराम पाटील, गणपतराव सांगले, मधुकर यलगार, ज्ञानदेव पोवार,रवींद्र होडगे, जोतिबा चाळके, संजय उत्तूरकर, भाऊसाहेब किल्लेदार, व्यवस्थापक जनार्दन बामणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आभार डी.ए.पाटील यांनी मानले.


निधन वार्ता
धोंडीबा रेडेकर

बुरुडे-भटवाडी तंटामुक्त कमिटीचे उपाध्यक्ष व माजी सरपंच धोंडीबा आप्पा रेडेकर (वय ७० वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी सकाळी निधन झाले.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक २४ रोजी आहे.


सानिया सिदलाळे हिची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अग्निपंख फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५ मध्ये आजरा हायस्कूलची विद्यार्थीनी कु. सानिया सिदलाळे हिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत सानियाची ‘बेस्ट परफॉर्मन्स’ या विशेष गटात निवड झाली असून तिच्या प्रभावी भाषणाने परीक्षक व प्रेक्षकांची दाद मिळवली. तिचे मुख्याध्यापक ए.एल.तोडकर उपमुख्याध्यापक एच.एस. कामत व पर्यवेक्षक ए.आर . व्हसकोटी , सर्व शिक्षक, पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


लक्ष्मीपूजन दणक्यात
बाजारपेठेत चैतन्य

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरामध्ये व्यापारी वर्गासह शहरवासीयांनी लक्ष्मीपूजन दणक्यात साजरे केले. कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू भांडी सोने-चांदीचे दागिने खरेदीला प्राधान्य दिले नाही बाजारपेठेमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.
शहरभर विद्युत रोषणाई, आतषबाजी केली जात असल्याचे दिसत होते. यावर्षी झेंडूची आवकही प्रचंड झाली. झेंडूच्या फुलांसह पूजनासाठी लागणारे साहित्य व फळे खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारात गर्दी होती.
सायंकाळच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.


आज शहरात…
ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर येथे पाडव्यानिमित्त दुपारी १२.३० वाजता डोक्यावरील आरतीचा कार्यक्रम होणार आहे.






