


हाळोली परिसरात बिबट्याचे दर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हाळोली – वेळवट्टी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. रविवार (ता.१४) रोजी रात्री वाजण्याच्या सुमाराला आजरा आंबोली महामार्गावर वेळवड्डी पैकी चाळोबा कॉलनी येथे बिबट्याने स्थानिक नागरीकांना दर्शन दिले. रात्रीच्या दरम्यान शनील फत्तेसिंह महागावकर व राणे कुटुंबीयाच्या शेत हद्दीवरील दगडी गराड्यावर बिबट्या पहुडला होता. विकास राणे हे शेतातील घराकडून आजऱ्याच्या दिशेन येत असतांना गाडीच्या प्रकाशझोतामुळे बिबट्याने उडी मारून डॉ. धनाजी राणे व तानाजी राणे यांच्या शेतातून पोबारा केला.
या परिसरातील बिबट्याच्या वावराने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजऱ्यात सवाद्य मिरवणुक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरात आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाद्याच्या निनादात मिरवणूक निघाली. जय भिम तस्ण मंडळ व डॉ. आंबेडकर प्रेमी कार्यकत्यांनी यांचे आयोजन केले होते. जल्लोषी वातावरण मिरवणूक झाली.
व्यंकटराव हायस्कूल पासून मिरवणुकीला सुरवात झाली. आजरा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक अभिषेक शिंपी यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्द्घाटन झाले. डॉ .आंबडेकर यांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आजरा शहरात आज मिरवणूक काढण्यात आली. जयभिम तरुण मंडळ यांच्यावतीने विविध उपक्रमाचे घेण्यात आले. यामध्ये पाळणा कार्यक्रम प्रतिमा पुजन, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक ‘ चित्रपट दाखवण्यात आला आहे. मंगळवार (ता. १६) माझ्या एक महानायक हा सामाजिक कार्यक्रम आयोजीत केला आहे. तर बुधवार (ता. १७) रेकार्ड डान्स स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे. आज व्यंकटराव हायस्कूल येथून मिरवणुकीला सुरवात झाली. डॉल्बी लेझर शो सह सदर मिरवणूक संभाजी चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पर्यंत मिरवणूक झाली. मिरवणुकीमध्ये आंबेडकर प्रेमीची संख्या मोठी होती. महीलांची संख्याही लक्षणीय होती. पारंपारिक वाद्यांच्या व डॉल्बीच्या निनादात मिरवणूक झाली. मिरवणूकीत नाचणारा घोडा आकर्षणाचा विषय होता.
माजी नगरसेवक किरण कांबळे, आकाश कांबळे, अमोल कांबळे, भरत कांबळे, संजय कांबळे, मयूर कांबळे, अश्विन कांबळे, श्रीधर कांबळे, सुजान कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते.

सर्व श्रमिक, गिरणी कामगार व पेन्शनर संघटनेच्या वतीने शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गिरणीकामगारांना मुंबई येथे घरे देण्यात यावीत यासाठी २००८ पासून सातत्याने रस्त्यावरची लढाई व मोर्चे आंदोलने सुरूच आहेत. २०१४ पासून आजअखेर शासनाने गिरणीकामगारांना झुलवत ठेवले असून, पात्र- अपात्र यादी करण्याचे नाटक करून, गिरणीकामगारांना मुंबईच्या बाहेर ठाणे, कल्याण येथे घरे देण्याचा जी.आर. या शासनाने काढला आहे तो मागे घ्यावा नसेल तर भाजप आणी मित्र पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय काॅ. अतूल दिघे यांनी किसान भवन आजरा येथील गिरणीकामगार व पेन्शन संघटना मेळाव्यात अध्यक्षीय स्थानावरून बोलताना व्यक्त केला. यावेळी इंडिया आघाडीचे शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फोटोला पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले , यानंतर बोलताना काॅ. दिघे यांनी आपल्या देशातील संविधान धोक्यात असून मनुचा कायदा परत आणणार-यांना हद्दपार करणे गरजेचे आहे. वाढती महागाई बेरोजगारी नुसते जुमले देवून संपत नाही.माणसाची गॅरंटी नसते तेथे मोदींची काय गॅरंटी ? असा सवाल करून गावागावात गिरणी कामगारांनी आम्हाला मंबईत घरे नाहीत व जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तर भाजपाला मत नाही अशा मजकुराचे मेसेज प्रत्येकाच्या घरावर लावण्याचे आवाहन केले.
काॅ. शांताराम पाटील यानी हे शासन शेतकरी व कामगार विरोधी असून शेती माला हमी भाव नाही. मापात पाप करून खताचे दर वाढवले आहेत. गिरणीकामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्या-या शासनाला अद्दल घडवण्याची वेळ आली आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी काॅ. शिवाजी सावंत , काॅ. धोडिबा कुंभार, काॅ. संजय घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांताराम हरेर, मनप्पा बोलके, हसेन दरवाजकर ,बंडू कांबळे, माया कदम, जयश्री कुंभार, आक्काताई तेजम, नारायण राणे, हिंदूराव कांबळे, महादेव होडगे, आबा पाटील, दिपक दळवी याच्यासह गिरणीकामगार पेन्शनर उपस्थित होते सुत्रसंचालन व आभार नारायण भंडागे यांनी मानले .

नवीन बसफेऱ्या सुरू करा…
अन्याय निवारण समितीची आजरा आगाराकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आगारामार्फत आजरा-मुरगुड व्हाया उत्तूर, गारगोटी, आदमापूर ही नवीन गाडी चालु करणेत यावी. तसेच विना थांबा आजरा-कोल्हापूर, आजरा-बेळगाव अशा नवीन गाड्या सुरु करण्याबरोबरच आजरा – रेड्डी ही सुध्दा गाडी नव्याने सुरु करणेत यावी. याचा विचार करुन नवीन वेळापत्रक तयार करणेत यावे. अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने आजरा आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.
आजरा आगाराकडील सकाळी ६.२० वा. सुरु असलेली आजरा-स्वारगेट ही गाडी वेळेवर सुटत नसलेने प्रवाशांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तेंव्हा सदरची गाडी वेळेवर सोडणेत यावी. तसेच आजरा-कोल्हापूर-आजरा या गाडीचे दिवसभराचे वेळापत्रक योग्य नाही. त्यामुळे कोल्हापूर येथून आज-याकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत व रात्री ९.०० ते १०.०० या वेळेत कोल्हापूर ते आजरा गाडी नव्याने सुरु करणेत यावी. आजरा-गडहिंग्लज मार्गावर सायंकाळी ५.३० नंतर ९.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्याचे वेळापत्रक नव्याने तयार करून साधारण दर अर्ध्या तासानंतर गाडी असावी.
वेळोवेळी आगाराकडून असे सांगणेत येते की, या डेपोला गरजेपेक्षा कमी गाड्या असलेने ओढाताण होते. तरी जादा गाड्या मागविणेसाठी आगाराने काय कार्यवाही केली आहे याची माहिती मिळावी.
वरील सर्व बाबींचा विचार करुन प्रवाशांची गैरसोय दुर होण्याच्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करुन आम्हा आजरेकर प्रवाशी, नागरीक यांना सहकार्य करावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष सुधीर कुंभार, पाडुरंगसावरतकर,गौरव देशपांडे
विजय थोरवत, राजु विभुते, सचिन इंदलकर,धनाजी पारपोलकर, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, वाय. बी. चव्हाण, रौनक कारेकर उपस्थित होते.

संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठान, किणे चा स्तुत्य उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त किणे गावातील ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना मोफत बेसिक इंग्लिश कोर्स चे आयोजन करण्यात आले आहे.निवृत्त शिक्षक श्री. तुकाराम पताडे आणि मारूती गिलबिले यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. सर्वांनी च बेसिक कोर्स विध्यार्थ्यांना कसा उपयोगी आहे आणि त्या चे महत्त्व सांगितले ४० दिवसाचा कोर्स पूर्ण मोफत आहे तरी कोर्स साठी आर्थिक मदत प्रतिष्ठान चे सचीव श्री. उदय मारूती गिलबिले यांच्या कडून मिळाले आहे. विध्यार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.
संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. महादेव सुतार, सहसचिव पांडुरंग शिंदे, मारूती गिलबिले, संतराम केसरकर, आकाश सुतार, पंकज केसरकर, दमयंती तुपट,श्रीकांत बामणे, दिपेश नाईक . किणे शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

निधन वार्ता
सुशीला चव्हाण

आजरा येथील श्रीमती सुशीला सुधाकर चव्हाण (वय वर्ष ७८ ) यांचे अल्पशा आजाराने काल सायंकाळी सहा वाजता निधन झाले.
व्यंकटराव हायस्कूलचे माजी शिक्षक व आजरा महाल शिक्षण मंडळाचे माजी संचालक कै. सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सूना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी आज मंगळवारी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहेत.



