

सर्पदंशाने आणखी एकाचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आठ दिवसापूर्वी भादवण येथील महिलेला सर्पदंश झाल्याने ती मयत झाली. ही घटना ताजी असतानाच बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथे शेताकडे पायवाटेने जाताना सापाने दंश केलेल्या दिगंबर मारुती मुदाळकर (वय ४७ वर्षे ) या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गेले पंधरा दिवस दिगंबर मुदाळकर मृत्यूशी झुंज देत होते.
याबाबत अधिक माहिती अशी, दिगंबर यांना १६ जून रोजी शेतामध्ये सर्पदंश झाला. गावातील नागरिकांनी त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने खासगी दवाखान्यात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरू होते, मात्र प्रकृती चिंताजनक होत गेली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दिगंबर यांच्या मागे आई-वडील पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

धनगरमोळ्यात महामार्गाचे पाणी घरात घुसले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम जरी झाले असले तरी दुतर्फा बाजूची गटारांचे काम अर्धवट स्थितीत आहे. महामार्ग उंच झाला असल्याने ग्रामस्थांच्या घरात महामार्गावरील पाणी घुसले आहे. यामुळे शेतीचेही नुकसान होत आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. धनगरमोळा घाटकरवाडी परिसरातही काम झाले आहे. पण येथील महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गटारीचे काम अर्धवट स्थितीत आहे. महामार्ग उंच झाला असल्याने महामार्गाच्या लगत असलेल्या घरामध्ये महामार्गावरून जाणाऱ्या पाण्याचे लोंढे घरात घुसत आहेत. त्यामुळे घरे पाण्याखाली जात असून त्यांची पडझड होण्याची भिती व्यक्त होत आहे. मोठा पाऊस झाल्यावर पाणी थेट घरात घुसत आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये पाणी घुसत आहे. आंदू बार्देस्कर, बाळक् बार्देस्कर, चंद्रकांत जाधव, यशवंत जाधव, योगेश जाधव यांच्या घरात पाणी घुसल्याचे ग्रामस्थ सांगतात. संतोष शेटगे, बाबू माडभगत, उत्तम माडभगत,यांच्या शेतीमध्ये पाणी घुसले असून या पाण्यामुळे पिक वाहून जाण्याची शक्यता तयार झाली आहे.
याबाबत सुळेरान ग्रामपंचायतीने महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार निवेदन दिली आहेत. पण त्यांनी दुर्लक्ष केले आहे. स्थानिक प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून मार्ग काढावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगांची गरज : तहसीलदार समीर माने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेती परवडत नाही. गुंतवलेले पैसेही निघत नाही अशी सार्वत्रिक भावना आहे. अभ्यासूपणा, आधुनिक तंत्रज्ञानचा वापर व शेतीमध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग केल्यास शेती यशस्वीपणे करता येते. शेतकऱ्यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेवून शेती करावी. असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन कार्यक्रम झाला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. गटविकास अधिकारी संजय ढमाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार श्री. माने, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, ग्रामिण पाणीपुरवठाचे उपअभियंता महादेव तिवले प्रमुख उपस्थित होते.
श्री. माने म्हणाले, शेतकऱ्यांनी यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतीला भेट द्यावी. त्यांचे प्रयोग समजावून घेवून मार्गदर्शन घ्यावे. जे विकतय ते पिकवण्याचा प्रयत्न करावा, शासनाच्या विविध योजनांची माहीती घ्यावी. गटविकास अधिकारी श्री. ढमाळ म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन घेतांना बाजारपेठेचा अभ्यास करावा. प्रगतशील शेतकरी सूर्यकांत दोस्गडे यांनी एकात्मिक शेती व्यवस्थापनबाबत माहीती दिली. प्रयोगशील शेतकरी शुभम धामणकर यांनी सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. फॉडे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहीती दिली. I
या वेळी ए. बी. मासाळ, आर. एस. गवळी, शरद देशमुख, वाय. के. जगताप, तृप्ती पाटील, पी. टी. गावडे, अनिता कांबळे, एम. डी. पाटील, पी. जी. पारपोलकर, शुभम पाटील, श्री. संकेश्वरी, घनश्याम बिक्ड, आप्पासो देसाई, सोपान पोवार, प्रशांत कांबळे यासह शेतकरी उपस्थित होते. विजयसिंह दळवी यांनी स्वागत तर प्रदीप माळी यांनी प्रास्ताविक केले. नंदन गवस यांनी सुत्रसंचालन तर पी. जी. पाटील यांनी आभार मानले.
भात, भूईमूग पिक स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
शिवराज पांडूरंग सरंबळे (सरंबळवाडी), युवराज आप्पासो देसाई (पोश्रातवाडी), शिवाजी रामचंद्र कुंभार (पेठेवाडी), उत्तम मारुती कातकर (बोलकेवाडी), दत् परस् मुळीक (पोळगाव) अनुक्रमे भात पिक स्पर्धेतील विजेते. वसंत मारुती धामणकर (धामणे) भुईमुग पिक स्पर्धेतील विजेते यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.

कोवाडे येथे आजरा वायरमन संघटनेचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोवाडे ता. आजरा येथे आजरा तालुका वायरमन संघटनेची स्थापना व उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. टी.आर.पाटील होते. उद्योजक श्री. महादेव पोवार व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दत्तात्रय देसाई यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील यांनी आपल्या मनोगतात ‘संघटना कशी टिकवावी, कशी वाढवावी, काम कोणत्या पद्धतीने केल पाहिजे हे सांगितले. उद्योजक श्री. पोवार यांनी आपल्या मनोगतात ‘संघटनेचे महत्व काय आहे, त्यातून आपण काय साध्य करू शकतो हे स्पष्ट केले.संघटनेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय देसाई यांनी संघटना स्थापन करण्याचा हेतू स्पष्ट केला.
संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. दत्तात्रय देसाई, उपाध्यक्षपदी श्री. बाळकृष्ण कोंडूसकर यांची तर सचिवपदी श्री. यशवंत देसाई यांची निवड झाली.सर्व निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश देसाई यांनी केले.
कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



