mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषक्रीडागुन्हाठळक बातम्याराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि. ८ ऑगस्ट २०२५         

महिलेची वीस हजारांची ऑनलाइन फसवणूक


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गवसे या.आजरा येथील रूपाली अमोल पाटील या महिलेची वीस हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना काल गुरुवारी घडली.

येथील आशा स्वयंसेविका शामल पाटील यांच्या तीन लाभार्थ्यांना दुपारच्या सुमारास अज्ञातांकडून फोन आले व त्यांनी लाभाच्या पार्श्वभूमीवर माहिती विचारत व्हिडिओ कॉलही केले. इतरांनी या कॉलला फारसा प्रतिसाद दिला नाही.

परंतु रूपाली पाटील यांना सगळीच माहिती सत्य स्वरूपात सांगितली जात असल्याचे लक्षात आल्याने रूपाली या त्यांच्याशी संवाद करत असतानाच त्यांच्या बँक खात्यावरून वीस हजाराची रक्कम उचलली गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर मात्र सदर फोन बंद असल्याचे आढळून आले.

आवंडी वसाहतीत कचरा कदापिही घेणार नाही

आवंडी वसाहतवासियांचा निर्वाणीचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजऱ्यासह गडहिंग्लज तालुक्यावासियांचे जीवन सुफलाम् सुजलाम् करण्यासाठी प्रसंगी घरदार सोडून आम्ही आजरा शहरात रहावयास आलो. परंतू वस्ती शेजारीच नगरपंचायतीने कचरा डेपो तयार केल्याने आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली सात वर्षे आम्ही हा त्रास सहन करत आहोत आता मात्र आमची सहनशिलता संपली आहे. यापुढे शहरातील कचरा आमच्या वसाहतीत आम्ही कदापिही टाकू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा आवंडी वसाहतवासियांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला.

अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली कचरा व पाणीपुरवठा पार्श्वभूमीवर आवंडी वसाहतवासियांची नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे व अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. गेली ३ वर्षे एक दिवस आड पाणीपुरवठा करून दोन तालुक्यासह कर्नाटक राज्याला पाणी देणाऱ्या आवंडी वसाहतवासियांची नगरपंचायतीने थट्टा चालवली आहे. पाण्यासाठी इतर कोणाताही पर्याय नसल्याने वसाहतवासियांना नाहक वणवण करावी लागत आहे. एकीकडे पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असताना दुसरीकडे वसाहतीच्या चारही बाजूला कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. भटक्या कुत्र्यांसह रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे दिली जातात, त्यामुळे याकडे आम्ही आमच्या वसाहतीत कचरा टाकू देणार नाही अशी भूमिका घेतली.

यावेळी परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, गौरव देशपांडे, अलका मांगले, अलका येसादे, चंद्रकांत निकम, अंकुश निकम, संजय पाटील, वैभव बांदेकर, प्रकाश कालेकर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

अखेर शुक्रवारपासून नियमित पाणीपुरवठा करण्याबरोबरच कचऱ्याची निर्गत लावण्यासाठी तातडीने संबधितांना सूचना करून अमंलबजावणी सुरू केली जाईल असे मुख्याधिकारी सुर्वे यांनी सांगितले. बैठकीला जावेद पठाण, चंद्रकांत शिंदे, दिनकर जाधव, वाय.बी.चव्हाण, जोतिबा आजगेकर, अलका येसादे, अमोल गावडे, वंदना दारूटे, स्वाती चौगुले, कांचन निकम यांच्यासह मानसी कदम, नेहाल अत्तार, नेहाल नायकवडी व नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.

पोलीसांची भिती घालू नका…

दुर्गधीमुळे घंटागाडीतून कचरा टाकण्यास नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालणाऱ्या रहिवाश्यांना अरेरावीची भाषा वापरून पोलीस कारवाईची भिती घातली जाते. आमची तुरूंगात जाण्याची तयारी आहे. आम्हाला पोलीसांची भिती घालू नका असेही यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

 

दिव्यांगत्वावर मात करत उत्तूरच्या आदित्य बामणे यांची IRS सेवेत निवड!


उत्तूर : मंदार हळवणकर

आजरा तालुक्यातील उत्तूर गावचे सुपुत्र आदित्य अनिल बामणे यांनी UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवत प्रतिष्ठित भारतीय राजस्व सेवा (IRS – C&IT) मध्ये अधिकारी म्हणून निवड निश्चित केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आदित्य यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय शाळा जि.प. शाळा , उत्तूर येथे झाले. माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय, कागल येथे तर पदवी शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले. त्यांनी राज्य शास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे.

शारीरिक दिव्यांगत्वावर मात करत, जिद्द, कठोर परिश्रम व नियोजनबद्ध अभ्यासाच्या बळावर आदित्य यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. मागील वर्षी त्यांची ICAS (Indian Civil Accounts Service) या सेवेत निवड झाली होती. यावर्षी त्यांनी IRS (Customs & Indirect Taxes) पदावर घवघवीत घोडदौड करत आपली कामगिरी सिद्ध केली आहे.
याआधी त्यांनी SSC CGL मधून सहाय्यक निरीक्षक आणि MPSC 2022 मधून सहाय्यक गटविकास अधिकारी पदासाठी यश मिळवले होते.त्यांच्या या यशामुळे गावातील नागरिक, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार व नातेवाईकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले,“स्वप्न मोठी ठेवा, प्रामाणिक मेहनत करा आणि वाचनाची सवय जोपासा, यश नक्कीच मिळेल.”

भादवण येथे शाश्वत शेतीदिन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा यांच्या वतीने ग्रामपंचायत मौजे भादवणवाडी तालुका आजरा येथे हरितक्रांती चे जनक भारतरत्न डॉ. एम एस स्वामिनाथन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने “शाश्वत शेतीदिन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव दिवेकर सरपंच उपस्थित होते.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भूषण पाटील, तालुका कृषी अधिकारी आजरा यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.शेतकर्‍यांनी कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करून उत्पन्नाचे साधन वाढवावे असे त्यांनी आवाहन केले.

प्रकाश रावण रिसोर्स फार्मर धामणे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन केले. रासायनिक खतांचा अतिवापरामुळे जमिनीतील कार्बन चे प्रमाण कमी होत असून जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.याचा परिणाम मानवी आरोग्यावर देखील होत आहे. या सगळ्यावर उपाय म्हणुन शेतकर्‍यांनी स्वतः च्या शेतावर सेंद्रिय खत तयार करून त्याचा वापर करावा असे त्यांनी सांगितले.यामध्ये जीवामृत,बीजामृत,दशपर्णी अर्क इत्यादी तयार करण्याच्या पद्धती सांगितल्या. सौ. धन्वंतरी देसाई DRP यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना बाबत माहिती दिली. यामध्ये येणार्‍या विविध कृषी उद्योग बाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश पाटील मंडळ कृषी अधिकारी उत्तुर यांनी कृषी विभागाच्या विविध मोहिमा तसेच फार्मर आयडी याबाबत माहिती दिली व आभार मानले.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्रीकृष्ण पालवे,उमा संकपाळ,संतोष तेरूडकर,गंगाराम दिवेकर,नारायण कुंभार,वैजयंता शिमणे,सुमित्रा पाटील,सुनीता शिमणे आदी शेतकरी उपस्थित होते.

उत्तूर-वझरे मार्गावर पूर्ववत बस सेवा सुरू करा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर, होन्याळी, महागोंड, वझरे मार्गावर धावणारी सकाळची ९.३० ची बस सध्या बंद करण्यात आली आहे. ती पूर्ववत सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमार्फत आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, सध्या शेतकरीवर्गाची शेतीकामांची कामे सुरू असून, उत्तूरकडे जाणारा शेतकरीवर्ग खूप मोठा आहे. त्याचबरोबर दहावी-बारावीबरोबरच सर्व विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालये व इतर संगणक प्रशिक्षणाचे वर्ग सुरू झालेले आहेत.
त्यामुळे विद्यार्थीवर्ग उत्तूरसह गडहिंग्लजकडे मोठ्या प्रमाणावर येतो. त्याचबरोबर रुग्ण, वयोवृद्ध यांचीदेखील वारंवार ये-जा सुरू असते; मात्र गावामधून बस नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे उत्तूर, होन्याळी, महागोंड, वझरे जाणारी ९.३० ची बस पूर्वीप्रमाणे सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनावर मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शिवराज लोखंडे, विशाल ससाणे, मनीष पाटील, प्रकाश लोखंडे, गणेश पाध्ये, विश्वजित भाईंगडे यांच्या सह्या आहेत.

तालुक्याच्या पश्चिम भागात भातावर तांबेरा रोगाचा प्रभाव…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये भात पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.

यावर्षी सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे भात पिके अडचणीत आली आहे त्यातूनही शेतकऱ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून भात पीक जोपासले आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून भात पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे.

अतिवृष्टीने कशीबशी बचावलेली पिके तांबेरा रोगाला बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औषध फवारणी करूनही तांबेरा नियंत्रणात नाही असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

आजरा एसटी आगारात १८ ला प्रवासी राजा दिन

Oplus_131072

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील आजरा आगारात बुधवारी (ता. १८) प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी उपक्रम घेतला जाणार आहे. बुधवारी सकाळी १० ते २ पर्यंत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या जातील. याबाबतच्या उपाययोजनांबाबत विभाग नियंत्रक निर्णय घेतील. दुपारी दुसऱ्या टप्प्यात ३ ते ५ या वेळेत आगारातील कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकून घेऊन त्यावर कार्यवाही केली जाईल. प्रवासी व कर्मचाऱ्यांनी आपल्या लेखी तक्रारी नेमून दिलेल्या वेळेत आगारात द्याव्यात, असे आवाहन केले आहे.

अपघात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा तालुक्यातील कागीनवाडी- मलिग्रे मार्गावर कागिनवाडी नजीक रुग्णवाहिका व रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक भरत शंकर पाटील राहणार सरोळी हे जखमी झाले आहेत. याबाबतची वर्दी सुनील भास्कर सावंत ( रुग्णवाहिका चालक राहणार मलिग्रे) यांनी पोलिसात दिली आहे. जखमी पाटील यांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.

निधन वार्ता
संजय कांबळे

मसोली ता. आजरा येथील संजय मारुती कांबळे ( वय ४८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात वडील मारुती उर्फ एम. आर. कांबळे,आई, पत्नी, दोन मुले,सून असा परिवार आहे.

ते एम. आर. बँजो पार्टीचे प्रसिद्ध कलाकार होते.

 

 

संबंधित पोस्ट

हात्तीवडे येथे महिला नदीत बुडाली…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीचा वाटंगीत धुमाकूळ…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!