mrityunjaymahanews
अन्य

शनिवार … सातच्या बातम्या

शनिवार

दिनांक २९ ऑगस्ट २०२६

बसस्थानक, वसुली व जलजीवन प्रश्नांवर खडाजंगी…
उत्तूर गावसभा   

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

उत्तूर ग्रामपंचायतीची वार्षिक गावसभा शुक्रवारी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मात्र एस.टी. बसस्थानक बांधकाम, जलजीवन मिशन, पाणीपट्टी-घरफाळा वसुली आणि ग्रामपंचायतीच्या गाळ्यांच्या लिलावावरून काही काळ जोरदार चर्चा रंगली. अखेरीस लोकप्रतिनिधींनी व्यवहार आणि कायद्याची सांगड घालून निर्णय घेण्याचे आवाहन केल्याने वातावरण निवळले.सरपंच किरण आमणगी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेची सुरुवात मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून झाली. ग्रामसेवक राजेंद्र येसादे यांनी विषयवाचन केले. जलजीवन मिशनचे रखडलेले काम वाढीव निधीनंतर जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदार व अधिकारी स्वप्नील जाधव यांनी दिली. शासन नियमांनुसार पाणीपट्टी वाढ, थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर सविस्तर चर्चा झाली.

थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यानंतर जप्तीची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मुदत संपलेल्या ग्रामपंचायत गाळ्यांचा नव्याने लिलाव करून करारपत्र करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सभेत शेतीसाठी ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करावा तसेच आजरा तालुक्याला स्वतंत्र मतदारसंघाचा दर्जा द्यावा, असे ठराव मंजूर करण्यात आले. गावसभेत मंजूर होणाऱ्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत अतिश देसाई यांनी व्यक्त केली आणि मंजूर निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

प्रधानमंत्री आवास योजना व अन्नसुरक्षा लाभार्थ्यांवरही चर्चा झाली. एस.टी. बसस्थानकाच्या बांधकाम परवानगीबाबत २१ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास ग्रामस्थ उपोषणाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा सभेत देण्यात आला. चर्चेत धोंडिराम सावंत, पराग देशमाने, विठ्ठल उत्तूरकर, स्वागत परुळेकर, राजशेखर पांडव, बाळासो सावंत, प्रविण लोकरे, हर्षवर्धन कुराडे, सौरभ वांजोळे आदींनी सहभाग घेतला. जि.प. सदस्य शिरीष देसाई, माजी सरपंच रमेश ढोणुक्षे व अतिश देसाई यांनी कायदेशीर प्रक्रियेचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट केल्याने सभेतील तणाव निवळला.

दुर्गम भागातील शाळा इमारतींची दुरुस्ती व्हावी… यशवंत क्रांती संघटनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

जिल्ह्यातील दुर्गम भागातील गळक्या व धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेने केली आहे.

संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण सभापती शितल यादव, मुख्य कार्यकारी डॉ. जॅसमिन, शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दि. १९ ऑगस्ट रोजी मराठी विद्या मंदिर चितळे धनगरवाडा, ता. आजरा येथे भेट दिली असता छप्पर गळतीने वर्गात पाणी साचले होते, विद्यार्थी पाण्यात बसून शिक्षण घेत होते. काहींच्या पायांना जखमा झाल्या आहेत. छप्पर कोसळण्याचा धोका आहे.

तातडीने निधी देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात सुनील शेळके, गोविंद कस्त्रे, चिंतामणी येडगे, संभाजी थोरवत, यमाजी कस्तुरे,, संभाजी बयाजी थोरवत आदी उपस्थित होते.

गजरगाव सरपंच अपात्र…

रस्त्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

गजरगावचे सरपंच आनंदा राणकू कांबळे व त्यांचे कुटुंबीयांचे सरकारी रस्त्यावर अतिक्रमण असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांना गजरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह सरपंच पदावरून जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र ठरवण्यात आले आहे. आदेशानुसार त्यांना पुणे आयुक्ताकडे याबाबत पंधरा दिवसात दाद मागता येईल असेही स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना कांबळे यांनी  आपण पुणे आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. जगदीश अर्जुन पाथरवट यांनी कांबळे यांच्याविरुद्ध याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

उद्या श्री रवळनाथ मंदिरात स्थिर उंबरा व चौकट स्थापना विधी 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

श्री रवळनाथ देवालय उपसमिती, आजरा यांच्या वतीने श्री रवळनाथ मंदिराच्या नूतनीकरण कामाचा भाग म्हणून स्थिर उंबरा व चौकट स्थापना विधीचे उद्या रविवारी मंदिर स्थळी सकाळी साडेसात वाजता आयोजन करण्यात आले आहे.

देवालयाच्या जीर्णोद्धार व सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरु आहे. दगडी कोरीव काम असलेला मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरा व चौकट बसवण्याचे काम कामगारांकडून सुरु असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

या पवित्र विधीसाठी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन उपसमितीने केले आहे.

आजरा शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री रवळनाथाच्या या ऐतिहासिक कार्यात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रवळनाथ देवालय उपसमिती, आजरा यांनी केले आहे.

सबलांनी दुर्बलांचे रक्षण करणे हाच रक्षाबंधनाचा मुख्य हेतू : उपप्राचार्य दिलीप संकपाळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालयात कनिष्ठ विभागात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य दिलीप संकपाळ होते. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राख्या बांधल्या.

यावेळी तमन्ना जमाल, साक्षी कांबळे, नागेश गाडीवड्ड, स्मिता अडसूळ, जागृती ठोकळे, श्रावणी वाजंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. आर्या जाधव, तनुजा पाटील, साक्षी जाधव यांनी गीते सादर केली. प्रा. अनिल निर्मळे, प्रा. रत्नदीप पोवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य संकपाळ म्हणाले, महाविद्यालयात रक्षाबंधनाची परंपरा आहे. सबलांनी दुर्बलांचे रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज असून हाच रक्षाबंधनाचा खरा अर्थ आहे.

कार्यक्रमाचे स्वागत तेजल कांबळे, आभार साक्षी जाधव, सूत्रसंचालन जिया मुल्ला यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक प्रा. मनोजकुमार पाटील, प्रा. शिंत्रे, हाक्के, केंद्रे, धामणेकर, चव्हाण उपस्थित होते. संयोजन प्रा. अनिल निर्मळे व प्रा. शोभा फड यांनी केले.

सेवाभावी हातांना कृतज्ञतेची राखी : सेवा भारतीतर्फे सामाजिक रक्षाबंधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

समाजासाठी सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी, वायरमन व पोस्टमन यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत, दक्षिण कोल्हापूर, आजरा तालुकातर्फे सामाजिक रक्षाबंधन उत्सव साजरा झाला.

४० कर्मचारी उपस्थित होते. कोरोना, महापूर काळात त्यांनी दिलेली सेवा अतुलनीय असल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

अध्यक्षस्थानी सेवा भारती दक्षिण कोल्हापूरच्या उपाध्यक्षा सौ. रेणू ताई सातोस्कर होत्या. प्रमुख पाहुणे ऋग्वेद समूहाचे प्रमुख श्री. सुभाष विभुते होते. यावेळी अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, शंकर आपटे, अनिल पवार, गोपाळ पाटील, विनायक चिटणीस, महिला वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो क्लिक…

खेडे येथील गॅस सिलेंडर गोडाऊन मधून गॅस सिलेंडर रस्त्यापर्यंत आणताना रस्त्यावरील चिखल व दलदलीमुळे ग्राहकांची चांगलीच दमछाक होत आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : २९ ऑगस्ट २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : प्रथम तिथी (सकाळी ०९.५६ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (३० ऑगस्ट पहाटे ०३.४१ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : सुकर्मा योग (सकाळी ०६.३५ पर्यंत) त्यानंतर धृति योग
करण : कौलव करण (सकाळी ०९.५६ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कुंभ राशी (रात्री ०९.३७ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ :सकाळी ०९.३२ ते सकाळी ११.०५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१४ ते दुपारी ०१.०४
सूर्योदय : सकाळी ०६.२४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मारकासाठी दोन कोटींची तरतूद करणार :नामदार मुश्रीफ…… यासह आजरा स्थानिक ताज्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!