mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार

दिनांक २८ ऑगस्ट २०२६

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आजरा येथे संघर्ष व लढा मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या २४ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे संघर्ष व लढा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात देवस्थान व मठ ट्रस्ट जमीन, शेतकरी-कर्जमुक्ती, वीज, सिंचन, पीक विमा, ऊस-दूध दर, वनहक्क, शेतमजूर, भूमिहीन, बेघर व गावठाण वाढ आदी प्रश्नांवर चर्चा व पुढील लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे.

हा मेळावा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्रमिक पतसंस्था, जिजामाता कॉलनी, आजरा येथे होणार आहे. अध्यक्षस्थानी कायदेतज्ज्ञ ॲड. दशरथ दळवी असतील.

यावेळी किसान सभेचे जिल्हा सहसचिव कॉ. संग्राम सावंत, तालुका नेते कॉ. शिवाजी गुरव, देवस्थान जमीन लढ्यातील कार्यकर्ते शिवाजी गिलबिले व भाकपा माले तालुकाध्यक्ष कॉ. शांताराम पाटील भूमिका मांडतील, अशी माहिती कॉ. शिवाजी गुरव, समीर खेडेकर, शिवाजी गिलबिले, संजय कांबळे यांनी दिली.

एरंडोळ येथे आत्महत्या…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

एरंडोळ (ता. आजरा) येथील शिवाजी धोंडीबा पताडे (वय ५८) यांनी आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता राहत्या घराच्या पाठीमागे घडली.

याबाबत मुलगा संजय शिवाजी पताडे (वय ३३, रा. एरंडोळ) यांनी दिलेल्या वर्दीप्रमाणे आजरा पोलीस ठाण्यात  नोंद झाली आहे. पताडे यांना मागील तीन वर्षांपासून असलेल्या आजाराच्या उपचार खर्चाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे वर्दीत म्हटले आहे.

पोलीस पुढील तपास  करीत आहेत.

मुदतवाढीनंतर उत्तूर बसस्थानक आंदोलनाला तात्पुरता ब्रेक.

उत्तूर : मंदार हाळवणकर

रखडलेल्या उत्तूर बसस्थानकाच्या बांधकामासाठी सुरू असलेले धरणे आंदोलन प्रवासी संघटनेने तात्पुरते स्थगित केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला निवेदन देत संघटनेने प्रशासनाला एक महिन्याची मुदत दिली आहे.

प्रवासी संघटनेच्या वतीने शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी बसस्थानकाचे बांधकाम पुन्हा सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

मात्र, प्रत्यक्ष काम नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने संघटनेने तात्पुरती माघार घेत प्रशासनाला अंतिम संधी दिली आहे. दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने निवेदनातून दिला आहे.

डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा : पोलीस प्रशासनाचे आवाहन.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

गणेशोत्सव २०२६ शांततापूर्ण व कायदेशीर पद्धतीने साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर उत्तूर दूरक्षेत्रातील उत्तूर, बहिरेवाडी व धामणे येथील गणेश तरुण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उत्तूर ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. बैठकीत डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी सर्व मंडळांनी आवश्यक शासकीय व ऑनलाइन परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मूर्ती प्रतिष्ठापना ठिकाणी २४ तास स्वयंसेवक ठेवावेत तसेच आगमन व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, वाहतूक नियम जनजागृती, महिला व बालसुरक्षा आदी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अश्लील गाणी, प्रतिबंधित लेसर लाईट, डॉल्बी आणि धार्मिक भावना दुखावतील असे डिजिटल फलक टाळण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बैठकीस सरपंच किरण आमणगी. महेश करबळी, ग्रामसेवक राजू येसादे, बीट अंमलदार सुदर्शन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार तसेच ७० ते ८० गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आजरा बाजारपेठेत राख्यांच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला आजरा बाजारपेठ राख्यांच्या खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती.

बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनासाठी बाजारात आकर्षक डिझाईनच्या राख्या दाखल झाल्या आहेत. लहान मुलांसाठी कार्टून राख्या, चंदन, रेशीम, स्टोन वर्क तसेच महागड्या चांदीच्या राख्यांना मागणी आहे. १० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत.

राख्यांसोबतच मिठाई, गिफ्ट, ड्रेसच्या दुकानातही महिला खरेदी करताना दिसल्या. सणामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

आजरा शहरात मोकाट घोड्यांचा उच्छाद सुरूच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

शहरात वानरे, मोकाट कुत्री, गाई-बैल, शेळ्यांनंतर आता चक्क कित्येक दिवस घोड्यांचा कळप रस्त्यावर फिरत आहे. वाहनांच्या धडकेची भीती असतानाच पादचाऱ्यांना घोड्याच्या लाथेचीही भीती निर्माण झाली आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : २८ ऑगस्ट २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पौर्णिमा तिथी (सकाळी ०९.४८ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (२९ऑगस्ट पहाटे ०३.१३ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : अतिगण्ड योग (सकाळी ०७.२७ पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
करण : भाव करण (सकाळी ०९.४८ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ :सकाळी ११.०६ ते दुपारी १२.४० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.२४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सोमवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातला बातमी… एक वाजता स्टॅन्ड चकाचक

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

आजरा जनता बँक निवडणूक बिनविरोध

mrityunjay mahanews
error: Content is protected !!