गुरुवार
दि.२७ ऑगस्ट २०२६

गोकुळच्या भविष्यासाठी रिंगणात
आमदार सतेज पाटील
आजरा तालुक्यात भेटी गाठी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दर दहा दिवसाला पैसे देणारी गोकुळ ही एकमेव व्यवस्था आहे. जिल्ह्यातील तत्कालीन नेतृत्वांनी स्थापन सहकारी संस्थांमुळेच आपला जिल्हा प्रगतीपथावर राहीला आहे. गोकुळ संघ साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा संघ असून या शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणि संघाच्या उज्वल भविष्यासाठी आपण या निवडणूकीत पॅनेल उभा करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आजरा तालुक्यातील प्रमुख नेते तसेच ठराव धारकांच्या भेटी गाठी घेतल्या.
गत निवडणूकीत आम्ही दिलेले शब्द पाळले आहेत. दूधाला दोन रूपये दर वाढ देण्याची ग्वाही दिली होती, तब्बल चौदा रूपयांची वाढ दिली. पशुखाद्याचे दर स्थिर ठेवले. एका बाजूला नऊजणांच्या नेतृत्वाखालील पॅनेल तर आमचं एकट्याच्या नेतृत्वाखाली गरीब व शेतकऱ्यांचे पॅनेल उभे राहणार आहे. संघाची प्रगती झाली तरी आणि काही चुकलं तरी एकटा जबाबदार राहणार असून तसा जाब तुम्ही एकट्याला विचारू शकता. त्यामुळे आपण सर्वांनी आमच्या पाठिशी रहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गोकुळच्या माजी संचालिका अंजना रेडेकर यांनी गोकुळचे मालक दूध उत्पादक असल्याचे सांगितले. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळने विस्तार केला असून दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचे काम केले असल्याचे सांगितले. जनता बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई म्हणाले, गेल्या पाच वर्षात मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली प्रगती केली आहे. या दोन्ही नेत्यांचे आजरा तालुक्यावर उपकार आहेत. पॅनेल कसंही झालं तरी आजरा तालुका तुम्हाला दगा देणार नाही असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील, अभिजित तायशेटे, तसेच राहुल देसाई, शामराव देसाई, सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, अनिष चुयेकर, विद्याधर गुरबे, रणजित देसाई, उदयराज पवार, अंकुश पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे ठराव धारक उपस्थित होते. राजू होलम यांनी आभार मानले.
तत्पूर्वी आमदार पाटील यांनी उत्तूर, मडिलगे, पेरणोली, देवकांडगांव येथे ठराव धारकांच्या भेटी गाठी घेतल्या. जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांची तालुका शेतकरी संघात भेट घेतली. याठिकाणी अल्बर्ट डिसोझा, संघाचे चेअरमन महादेव हेब्बाळकर, एम. के. देसाई, अनिल फडके यांच्यासह साखर कारखाना व तालुका संघाचे संचालक तसेच विविध संस्थांचे ठरावधारक उपस्थित होते.

विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वीजेचा धक्का बसून योगेश किसन पोवार (वय ३३) रा. संभाजीनगर, आजरा या तरुणाचा मृत्यू झाला.काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला दुर्घटना घडली. आजरा पोलीसात उतम नार्वेकर यांनी वर्दी दिली आहे. आजरा पोलीसात रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद सुरु होती .
घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, योगेश यांचे आजरा – पोळगाव रस्त्यावरील आजरा ग्रामिण रुग्णालया नजीक घर आहे. ते येथील आजरा अर्बन बँकेच्या काम करीत होते. सुट्टी असल्याने ते घरी होते. घराचे बांधकाम सुरु असल्यान ते स्लॅबवर गेले होते. साहित्य हलवणे व स्वच्छतेचे काम सुरु होते. साहित्य हलवतांना लोखंडी पाईपचा स्पर्श त्यांच्या घरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहीनीला झाला. त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसल्यावर ते जागीच कोसळले.
त्यांना तातडीने खासगी रुग्णालता हलवले. त्यानंतर नजीकच्या ग्रामिण रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच ग्रामिण रुग्णालय परिसरात पोवार यांचे नातेवाईक, मित्र मंडळीची मोठी गर्दी जमली होती. त्यांच्या मागे पत्नी,मुलगी आईवडील, भाऊ व विवाहीत बहीण असा परिवार आहे. तत्कालीन आजरा ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त कर्मचारी किशोर पवार यांचे ते चिरंजीव होत.या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

आजरा साखर कारखान्याने दुसरा हप्ता त्वरित द्यावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गत गळीत हंगामात तुटलेल्या उसास प्रति टन ४०० रुपये दुसरा हप्ता तातडीने मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याचे चेअरमन / कार्यकारी संचालक यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी साखरेस व उपपदार्थांना वर्षभर चांगला भाव मिळाला आहे, तर दुसरीकडे खतांचे दर, औषधांचे दर, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी केलेली पिळवणूक यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उसाला प्रति टन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अन्यथा कारखान्यातून बाहेर पडणारी साखर व उपपदार्थ रोखण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर तानाजी देसाई, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील, सुरेश कोरगावकर, मारुती पाटील आदींच्या सह्या आहेत.

इंग्रजी भीतीदायक पण सध्या अत्यावश्यक
प्राचार्य डॉ. किरण पोतदार यांचे प्रतिपादन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठी मुलामुलींसाठी इंग्रजी भाषा खरोखरच भीतीदायक आहे. पण आजच्या युगात त्याशिवाय पर्याय नाही. इंग्रजी भाषा आली तरच भविष्यात आपण टिकू शकतो. त्यामुळे या भाषेपासून दूर जाण्यापेक्षा त्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे अपरिहार्य असल्याचे आणि इंग्रजी विभागाने यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम संयुक्तिक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. किरण पोतदार यांनी केले.
येथील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘इंग्लिश-विक’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सहा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या गेल्या. त्यातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, अधीक्षक योगेश पाटील व पर्यवेक्षक मनोज पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. सलमा अत्तार यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा. रमेश चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या सहभागाची सुरवातीला भिती होती, पण विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त आणि उदंड राहिल्याचे समाधान मिळाल्याचे सांगून दरवर्षी असा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतला जाईल अशी ग्वाही दिली.
या विविध स्पर्धांमध्ये तन्वी येसादे, संचिता राणे, आयेशा त्किलदार, प्रतीक्षा घुरे, रूमान माणगावकर, वैभवी कांबळे, वेदिका तेजम, तेजल कांबळे, अथर्व मोहिते, शिवम केसरकर, मानसी बुडके, अनुष्का आळवणे, सालेहा दरवाजकर, मसीरा नाईकवाडे, आदिती चव्हाण, धैर्यशील कावणेकर, सानिया मुजावर, अकमल लमतूरे, सृष्टी पाटील, समृद्धी गायकवाड, दीप्ती राऊत, समर्थ पांगम या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अथर्व मोहिते, मसीरा नाईकवाडे व मानसी बुडके यांची मनोगते झाली. यावेळी डॉ. रणजीत भादवनकर, विठ्ठल हाके, स्वाती देसाई, वैशाली देसाई, सुवर्णा धामणेकर, डॉ. अविनाश वर्धन यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. शेखर शिऊडकर यांनी आभार मानले.

उत्तूर बाजारपेठ मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी राहुल धुरे

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील बाजारपेठ मित्र मंडळाच्या गणेशोत्सव २०२६ पूर्वतयारी बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी राहुल ज्ञानदेव धुरे, उपाध्यक्षपदी मंदार मिलिंद कोळेकर, सचिवपदी प्रितेश दिपीन पटेल आणि खजिनदारपदी ओम सुरेश धुरे यांची निवड झाली.
आजचे पंचांग
दिनांक : २७ ऑगस्ट २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (सकाळी ०९.०८ पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (;२८ ऑगस्ट रात्री ०२.१५ पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : शोभन योग (सकाळी ०७.५५ पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०९.०८ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मकर राशी (दुपारी ०१.३५ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१४ ते दुपारी ०३.४८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.२४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

