
प्रशासन ॲलर्ट मोडवर…
रजा नाहीच.. फोन चालू राहिले पाहिजेतआपत्ती व्यवस्थापन बैठकीत सक्त सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पावसाच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून तहसील कार्यालयात तहसीलदार सुरज माने यांनी बोलावलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत पावसाळ्यामध्ये कोणालाही रजा मिळणार नाही, अतिवृष्टी कालावधीत सर्वांचे फोन चालू राहिले पाहिजेत, कोणीही कोणतीही सबब सांगू नये, नागरिकांच्या प्रत्येक फोनला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी यासह विविध सूचना करून अधिकारी वर्गाला ‘ चार्ज ‘ केले आहे.
तहसील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत बोलताना तहसीलदार माने म्हणाले, आजरा तालुका हा प्रचंड पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो या पार्श्वभूमीवर विविध आपत्तींना पावसाळ्यात सामोरे जावे लागते. तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. या कक्षाची केव्हाही स्थानिक व जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडून तपासणी होऊ शकते. गजरगाव, साळगाव, किटवडे व रामतीर्थ परिसरामध्ये धोकादायक घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून अतिवृष्टी कालावधीत या भागाकडे विशेष लक्ष ठेवले जाईल. नदीकाठच्या १९ गावांना पूरस्थितीचा धोका उद्भवू शकतो असे गृहीत धरून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
अतिवृष्टी कालावधीत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी. वनविभाग,सार्वजनिक बांधकाम व पंचायत समिती बांधकाम विभागाने अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या रस्त्यांची तातडीने पूर्तता करून घ्यावी. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी पाऊस व नुकसानी संदर्भात रोजच्या रोज तसे कार्यालयाकडे अहवाल सादर करावेत. शक्यतो डोंगरी भागात रहाणाऱ्या वस्त्यांना काही अडचणी येणार नाहीत याची आतापासूनच काळजी घ्यावी.आरोग्य विषयक कोणतेही अडचणी येऊ नये म्हणून रुग्णवाहिका डॉक्टर्स व इतर यंत्रणा सज्ज ठेवावी. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त असल्याने सर्वांनी आपापल्या यंत्रणा अद्ययावत करून घ्याव्यात. विशेष म्हणजे तालुक्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांमध्ये एकमेकांत समन्वय असण्याची गरज आहे. पावसामध्ये कोसळतील अशा धोकादायक घरातील कुटुंबांना तशा सूचना करून ती कुटुंबे अन्यत्र हलवावीत अशा सूचनाही केल्या.
बैठकीस गटविकास अधिकारी संजय ढमाळ, नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई, सार्वजनिक बांधकामचे आर.एस. सावंत, डॉ. यशवंत सोनवणे, डॉक्टर पी. जी. ढेकळे, अविनाश फडतारे, सूर्यकांत नाईक, सुरज पाटील, स्वाती उरुणकर,अनिकेत चव्हाण, राकेश चौगुले, बसवराज गुरव, विजय दळवी, एन. के. नायकवडी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शॉर्टकट नको…
भिडभाडही नको
अनेक वेळा पावसामध्ये नागरिक जवळच्या मार्गाचा वापर करताना दिसतात याच कारणास्तव ओढ्यामधून किंवा पाणी क्षेत्रातून जाण्याचा प्राधान्य दिले जाते परंतु यातून मोठे अपघात करण्याची शक्यता असल्याने शक्यतो शॉर्टकट चा वापर करू नका. त्याचबरोबर चित्री प्रकल्प परिसर, रामतीर्थ परिसर यासारख्या सुप्रसिद्ध ठिकाणी पावसाळी पर्यटक ओळखी दाखवून पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात परंतु अशा ठिकाणी कोणाचीही भिडभाड ठेवू नका असे देखील यावेळी पोलीस दलाला सांगण्यात आले.

बैलगाडी शर्यती प्रकरणी येथील पाच जणांवर गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी सुळे, तालुका आजरा येथील विशाल पोवार, बाबासाहेब भोसले, राहुल जाधव, वसंत वाळवे, प्रकाश बामणे यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल आनंदा नाईक यांनी दिली आहे.

शहरवासीयांच्या प्रश्नासाठी शिवसेना आक्रमक…
रास्ता रोको

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहरातील अनियमित नळपाणी पुरवठा सुरळीत व्हावा व महामार्ग रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे यासह आजरा शहरवासीयांच्या प्रमुख मागण्यांसाठी आजरा येथील संभाजी चौकात शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले यावेळी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आजऱ्यातील पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे.महामार्ग व नगरपंचायत यांच्या मध्ये समन्वय नसल्याने संभाजी चौक ते भाई-भाई थिएटर पर्यंतचे काम रखडले आहे.याचा वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागत आहे.अवकाळी पडणाऱ्या पावसाने संभाजी चौकाला तळ्याचे स्वरूप येत आहे. येत्या आठ दिवसांत यावर कार्यवाही न झालेस तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हा प्रमुख सुनिल शिंत्रे, तालुका प्रमुख युवराज पोवार व दयानंद भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संभाजी चौक ते भाई-भाई थिएटर हा अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, आजरा शहरातील नळ पाणीपुरवठा खंडीत व अनियमित स्वरुपाचा असून तातडीने विभागवार नळ पाणीपुरवठाचे वेळापत्रक जाहीर करावे,
पोलीस प्रशासनाने संभाजी चौक ते आजरा एस. टी. आगारापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावण्यास बंदी करावी व तसे नो पार्किंग चे बोर्ड लावावेत, खाजगी लक्झरी बसेस शहराबाहेर उभ्या करण्याबाबत सूचना कराव्यात,रस्त्याशेजारी असणारे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी खुले करावे, नवीन नळ पाणी योजनेकरिता केलेले खोदकाम तातडीने मुजवून घ्यावे,ऐतिहासीक व्हिक्टोरीया पुलावर डागडुजी करुन याठिकाणी विरंगुळा केंद्र तयार करावे,महामार्गासाठी प्रचंड वृक्षतोड झालेली आहे. पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर,रवी सावंत ,दिलीप माने (गडहिंग्लज), महेश पाटील, दिनेश कांबळे,संजय येसादे, प्रभाकर कोरवी,सलिम लतिफ, मंजूर मुजावर, समीर चांद, नारायण कांबळे,भिकाजी विभुते,गुड्डू खेडेकर,वसंत भुईंबर,यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग, आजरा नगरपंचायत व पोलीस प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हरपवडे मंदिरा संदर्भात निर्णय नाहीच
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे ता. आजरा येथील कुलूप बंद असलेले श्री रासुबाईदेवीचे मंदिर खुले करण्यासाठी, आजरा तहसिल,आजरा येथे तहसिलदार सूरज माने यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली. बैठकीस नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई व देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापुर चे पदाधिकारी श्री.दिंड्डे, श्री. उत्तम मिटके व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
बैठकीमधील सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांनी आपण वरिष्ठांशी चर्चा करून दोन दिवसामध्ये श्री रासुबाई देवीच्या मंदिराबाबत निर्णय देऊ असे आश्वासित करण्यात आले.


