
सातला बातमी…
एक वाजता स्टँड चकाचक
‘मृत्युंजय महान्यूज ‘ इफेक्ट

आजरा : प्रतिनिधी
‘ मृत्युंजय महान्यूज ‘ ने मंगळवारी सकाळी सातच्या बातमीमध्ये आजरा बस स्थानकात धुळीचे साम्राज्य… अशी बातमी प्रसिद्ध केल्यानंतरआजरा शहर अन्याय निवारण समितीने तातडीने हालचाली करत पाण्याचा टँकर मागून संपूर्ण बस स्थानक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धुवून काढले यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
बातमी प्रसिद्ध होताच समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे व उपाध्यक्ष विजय थोरवत यांनी मृत्युंजय महान्यूजचे संपादक ज्योतिप्रसाद सावंत व एसटी आगाराचे व्यवस्थापक घुरे यांच्यासह समिती सदस्यांना बसस्थानक परिसरात बोलावून घेतले. बस स्थानक आभारातील अवस्था पाहून तातडीने येथे पाण्याचा टँकर आणण्यात आला.

रिक्षा युनियनचे पुंडलिक कोले, अन्याय निवारण समितीचे गौरव देशपांडे, प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन इंदलकर, संतोष भाटले आदींनी अध्यक्ष बामणे व उपाध्यक्ष थोरवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः या पाण्याचा वापर करून बस स्थानक परिसर स्वच्छ धुवून काढला.
यावेळी नाथा देसाई, संदीप खवरे, अशोक गाईंगडे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व एसटी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मृत्युंजय महान्यूज चे आभार…
अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी ‘मृत्युंजय महान्यूज ‘ने या बातमीला प्रसिद्धी देऊन बस स्थानक आवाराबाबत आवाज उठवल्याबद्दल मृत्युंजय महान्यूज चे आभार मानले.

वाटंगी येथे दहा एकरातील ऊस जळाला

आजरा: प्रतिनिधी
वाटंगी (ता. आजरा) येथे दहा एकरावरील ऊस जळाला आहे. सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानकपणे वाटंगी येथील देसाई कुटुंबीयांच्या उभ्या उसाच्या फडाला आग लागली. दुपारची वेळ असल्याने झपाट्याने आग पसरत गेली.
खंडेराव रामचंद्र देसाई, शामराव दादू देसाई, बच्चाराम गोविंद देसाई, धनंजय भाऊसाहेब देसाई, शिवाजी आप्पासो देसाई, वसंत बळवंत देसाई, संदिप श्रीपतराव देसाई, गणपतराव कृष्णराव देसाई, अलका गोपाळ देसाई, समिर जयसिंगराव देसाई, गोपाळ विश्वनाथ देसाई, शामराव लक्ष्मण देसाई, अर्जुन लक्ष्मण देसाई यांच्या मालकीच्या उसाचे यामध्ये नुकसान झाले आहे.
आग नेमकी कशाने लागली हे समजू शकते नाही.


रामतीर्थ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्ता व सुविधांची पहाणी

आजरा:प्रतिनिधी
आज-याजवळ असलेल्या रामतीर्थ येथे भरणाऱ्या महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी विविध सेवा व रस्ता सुविधेची पाहणी केली. या वेळी अध्यक्ष परशराम बामणे, उपाध्यक्ष विजय थोरवत, वाय. बी. चव्हाण, पांडुरंग सावरतकर, यशवंत इंजल, राजू विभूते, जावेद पठाण, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी श्री. बामणे म्हणाले, महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या रामतीर्थ यात्रेकरीता आजरा, गडहिंग्लज, चंदगडसह सीमाभाग व कोकणातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. भाविकाची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी मुख्य प्रवेशद्वारावरील टपऱ्या व गाडे साठ फूटाबाहेर लावण्यात यावेत. परिसरातील असणारी स्वच्छतागृहे भाविकांसाठी खुली करावीत. अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण त्वरीत पूर्ण करावेत. भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करावे यासाठी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून आवश्यकत्या सूचना करणार आहे.
येथे नव्याने उभारण्यात आलेली स्वच्छतागृहे अपू-या कामांमुळे बंद अवस्थेत आहेत. आठवडा भरात स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करून परिसरात रंगरंगोटी करण्यासाठी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जातील. स्थानिक नागरीकांनीही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य सूचना समीतीला कराव्यात, जेणेकरून त्यांचा पाठपुरावा करता येईल. या वेळी रामतीर्थ परिसराची व स्वच्छतेची पहाणी करण्यात आली.

विधवा महिलांचा केला हळदी कुंकूने सन्मान

आजरा: प्रतिनिधी
जुन्या रिती-रिवाजाना फाटा देत, सामाजिक बदलाच्या दृष्टीने, च एरंडोळ ग्रामपंचायत व गावातील सर्व महिला बचतगटाच्या संयुक्त विद्यमाने, गावातील विधवा महिलांना हळदी कुंकू व भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले, यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सरीता पाटील होत्या.
स्वागत व प्रास्ताविक रूपाली नेसरीकर यांनी केले, यावेळी गावातील सर्व महिला बचतगटाच्या संकल्पनेतून विधवा महिलांना सन्मान देत, त्याच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमांची सुरुवात करणेत आली.
यावेळी सरपंच सौ. पाटील यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून गावात जुन्या रिती रिवाजाना फाटा देत, सामाजिक बदलाच्या दृष्टीने महिलाचे प्रश्न महिलांनीच समजून घेणे, आवश्यक असल्याने स्त्री म्हणून विधवाना सन्मानित केल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी महिलाच्यासाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया पाटील, सुजाता तळेवाडीकर, सुनिता परिट, शामल सुपल, सुनिता परिट ,सविता कुंभार, सुषमा आतकरी, पार्वती जाधव, प्रमिला जाधव, अनुजा पेडणेकर, वैशाली सुतार याच्या सह गावांतील विधवा महिलाबचतगटाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्या उपस्थित होत्या सुत्रसंचालन बार्देसकर मॅडम यांनी केले, आभार सौ. गिता नाईक यांनी मानले.

‘ आजरा ‘ ची १५ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा

आजरा:प्रतिनिधी
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे दि.१ जाने. ते १५ जाने. अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात रु.१२ कोटी ३५ लाख रु.संबधित ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग बँक खातेवर जमा करण्यात आली असले बाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी दिली.
कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन नवनिर्वाचीत व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणनेस प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता कारखान्यास व व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, कारखानचे संचालक श्री. विष्णू केसरकर श्री उदयसिंह पोवार, श्री. मुकुंदराव देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री. अनिल फडके, श्री. दिपक देसाई, श्री.रणजित देसाई, श्री. संभाजी पाटील (हात्तीवडे) श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरूकटे, श्री.राजेश जोशीलकर, श्री.गोविंद पाटील, श्री.अशोक तर्डेकर, श्री. हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण आणि प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.


समान नागरी कायद्यासाठी आजऱ्यात एकदीवशीय आंदोलन

आजरा : प्रतिनिधी
देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी बुरूडे येथील ग्रामस्थ विश्वनाथ कोरे यांनी आजरा तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवशीय आंदोलन केले. या मागणीचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.
उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा विधानसभेत बहुमताने मंजूर करून घेतला, त्याप्रमाणे देशातही हा कायदा लागू करावा अशी मागणी निवेदनातून कोरे यांनी केली आहे. लोकशाहीमध्ये लोकांना समान संधी मिळाली पाहिजे हाच खरा लोकशाहीचा पाया असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जगभरात केवळ धर्मावर आधारीत देश किती ? त्या देशांची स्थिती काय ? याचाही विचार होणे गरजेचे आहे. मुस्लिम राष्ट्रामध्ये हिंदू, सिख, इसाई, ख्रिश्चन सुखाने नांदत असतील तर त्या देशाचा देशधर्म इस्लाम असणे गैर नाही. आपला भारत देश हिंदुबहुल आहे. आणि आपण आपल्या देशाचा हिंदुराष्ट्र म्हणून उल्लेख करणे यात कुणाला काय नुकसान होत आहे ? हिंदुराष्ट्रात मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध, ख्रिश्चन सुखाने नांदत असतील तर त्यात कोणाला दुःख होण्याचे कारण काय असा प्रश्नही निवेदनातून करण्यात आला आहे.
धर्माला विज्ञानाचे लगाम जरूर लावले पाहिजेत पण धर्माच्या नावाखाली अवडंबर चालू नये यासाठीच देशात समान नागरी कायद्याची गरज आहे. एकाच देशात वेगवेगळ्या धर्मियांसाठी वेगवेगळे कायदे असू नयेत यासाठीच समान नागरी कायदा केंद्र शासनाने लागू करावा या मागणीसाठी कोरे यांनी सोमवारी दिवसभर आजरा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते.

श्री रवळनाथ देवालय उपसमिती, गणेश जयंती….

श्री गणेश जयंती उत्सव,आजरा.
◾सकाळी ८.०० : गणेशयाग
◾दुपारी १२.०० वा : गणेश जन्मकाळ, महाआरती
◾दुपारी १२.३० ते ३.०० : महाप्रसाद
◾ दुपारी ३.०० वा : महिलांसाठी अथर्वशीर्ष पठण
◾सायंकाळी ५.०० वा : सन्मित्र भजनी मंडळ, आजरा यांचा भजनाचा कार्यक्रम
छाया वृत्त…

आजरा बस स्थानक आवारात सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाले असून या परिसरात पाणी मारले जात नसल्याने प्रवासी वर्गाला या धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
निवड

सुप्रीम ह्यूमन राइट्स इंटेलिजन्स इंडिया (मानवाधिकार)च्या आजरा तालुकाध्यक्षपदी महादेव गणपती पाटील (रा. पारपोली, ता. आजरा) यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र वरिष्ठ पदाधिका-यांनी नुकतेच त्यांना दिले.
सत्कार…

को.जि.मा.शि.चे नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते जिल्हा बॅंक संचालक सुधिर देसाई यांची आजरा साखर कारखाना संचालक मंडळावर जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जनता बँक अध्यक्ष मुकुंदराव देसाई,कारखाना उपाध्यक्ष एम. के. देसाई संचालक अनिल फडके, रणजित देसाई, राजू मुरकुटे व मान्यवर उपस्थित होते.



