mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दि.३ फेब्रुवारी २०२६

सावळा गोंधळ…
अंदाज येईना…

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुका अंतिम टप्प्यात मात्र मोठ्या चुरशीच्या होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपासह ताराराणी आघाडीने प्रचारात मुसंडी मारल्याने रंगत वाढली आहे. नेते मंडळींसह कार्यकर्त्यांच्या सोयीच्या भूमिकेमुळे तालुक्याच्या राजकीय पटलावर या निवडणुकांनी गोंधळाचे वातावरण तयार झाले असून निवडणुकीतील अंदाज चुकण्याची शक्यता आता पुढे येत आहे.

कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या तीन घटक पक्षातच राजकीय वर्चस्वासाठी धडपड सुरू आहे. सुरुवातीला जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर देसाई आणि शिंदे सेनेचे विष्णुपंत केसरकर यांच्यात लढत होईल असे चित्र होते. परंतु गेल्या चार दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जयवंतराव सुतार यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. जे भाजपाचे स्थानिक नेते शिवसेना शिंदे गटाबरोबर राहतील अशी अपेक्षा गृहीत धरली जात होती त्यांनी थेट भाजपाच्या प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली आहे. पंचायत समिती करता असणारी पेरणोली पंचायत समिती मतदार संघातील सौ. स्मिता देसाई व वाटंगी पंचायत समिती मतदार संघातील समीर पारदे यांची उमेदवारी जिल्हा परिषदेचे उमेदवार जयवंतराव सुतार यांच्या पथ्यावर पडू लागली आहे. सुरुवातीला आघाडीवर असणाऱ्या सुधीर देसाई यांना अंतिम टप्प्यात मात्र मोठा संघर्ष करावा लागत आहे. पूर्व भागातील कांही बड्या गावात ते शेवटच्या टप्प्यात कोणती नीती वापरणार यावरही त्यांचे यशापयश अवलंबून आहे. त्यांच्यासोबत पंचायत समिती करता असणारे राजू होलम व शिवसेना उबाठा गटाच्या सौ. यशोदा पोवार हे दोघेही एकाच भागातील असल्याने उर्वरित मतदारसंघांमध्ये जोडण्या लावताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या सौ. श्वेता सरदेसाई यांना बरीच मेहनत अजूनही घ्यावी लागणार असे दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाच्या सौ. यशोदा पोवार यांना मतदारांकडून मिळणारी सहानुभूती शेवटपर्यंत टिकणार का? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेचे शिंदे गटाचे उमेदवार विष्णुपंत केसरकर यांच्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठी यंत्रणा लावली आहे. परंतु त्यांचे भवितव्यही पूर्व भागातील कांही मोठ्या गावांवर अवलंबून राहणार आहे.

उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात मात्र ताराराणी आघाडीच्या उमेश आपटे यांनी अनेकांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले आहे. सुरुवातीला आघाडीवर दिसणारे राष्ट्रवादीचे शिरीष देसाई व शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठलराव उत्तूरकर मोठ्या मतदार संख्येच्या गावातून पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे येत्या दोन-तीन दिवसात त्यांना बरीच मशागत करावी लागणार आहे.

भादवण पंचायत समिती करता शिवसेना शिंदे गटाच्या सौ. भारती डेळेकर , ताराराणी आघाडीच्या सौ.साधना केसरकर व राष्ट्रवादीच्या सौ. जयश्री गाडे परस्पर विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. शिंदे सेनेच्या डेळेकर या सोहाळे सारख्या छोट्या मतदारसंख्येच्या गावातून उमेदवार असल्याने भादवण, खेडे, मडिलगे यासारख्या गावामध्ये त्यांना कितपत साथ मिळणार हे महत्त्वाचे आहे. उत्तूर पंचायत समिती मतदार संघामध्ये राष्ट्रवादीतून बहिरेवाडीच्या विकास चोथे यांना संधी देण्यात आली आहे परंतु बहिरेवाडीतच ताराराणी आघाडीचे उमेश आपटे हे आघाडी घेण्याची शक्यता पुढे येत आहे. उत्तुर हे मोठ्या मतदारसंख्येचे गाव असले तरीही येथून महेश करंबळी व संभाजी कुराडे हे अनुक्रमे ताराराणी आघाडी व शिवसेनेचे उमेदवार असल्याने मतदाराचा कौल त्यांच्या बाजूने झुकता राहणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे चोथे हे यातून मार्ग काढण्यात कितपत यशस्वी होणार हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. आजमितीस येथे चोथे व करंबळी यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र असले तरी शेवटच्या टप्प्यात मंत्री आबिटकर व सूत्रधार प्रा. अर्जुन आबिटकर परिस्थिती कशी हाताळणार यावर कुराडे यांचे भवितव्य अवलंबून आहे.

या निवडणुकीत अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उलट सुलट भूमिका घेतल्याने निवडणुकीचे चित्रच संभ्रमावस्था निर्माण करणारे झाले आहे. कांही मंडळींच्या भूमिका अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. ‘लक्ष्मी’ दर्शनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अशा मंडळींच्या शेवटच्या टप्प्यातील भूमिका अंतिम निकालावर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात हे विसरता येणार नाही.

काठावरचे निकाल…

शेवटच्या टप्प्यात तीनही प्रमुख पक्ष व आघाड्यांच्या उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी जोरदार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली असल्याने काठावरच्या मताधिक्याने निकाल लागणार असे दिसत आहे.

चाकरमान्यांसाठी गाड्यांचे बुकिंग…

मुंबई-पुण्यासह बाहेरगावाहून येणाऱ्या मतदारांसाठी खास गाड्यांचीही विशेष सोय करण्यात येत आहे. स्थानिक ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या सर्वच गाड्यांचे बुकिंग झाल्याने आता बाहेर गावाहून गाड्या मागवण्यात येत आहेत. शनिवार हा मतदानाचा दिवस असल्याने बाहेरगावचे अनेक मतदार मतदानासाठी येणार असे दिसत आहे.

संजय देसाई यांचे निधन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सुलगाव ता. आजरा येथील संजय शिवाजीराव देसाई/ सध्या राहणार कोल्हापूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.सकाळ पेपर्स मध्ये ते फोटोग्राफर म्हणून काम करीत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा परदेशात आहे तर एक कोल्हापूरात वास्तव्यास आहे.

भाजपला मिळणाऱ्या जनाधारामुळेच आमचा विजय निश्चित : विलास नाईक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेल्या दहा-बारा वर्षात केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचा कारभार केलेला आहे. सर्वच दृष्टीने सर्वसामान्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करत आले आहे. आजरा तालुक्याला विकासाभिमुख चेहरा भाजपच्या माध्यमात प्राप्त झाला आहे. यामुळेच भाजपला आजरा तालुक्यात मोठा जनाधार मिळत आहे. त्याचे रूपांतर सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मतांमध्ये होणार आहे. यामुळेच आजरा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास नाईक यांनी व्यक्त केला. ते आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषदे मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार व पेरणोली पंचायत समितीचे उमेदवार स्मिता देसाई यांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये बोलत होते. भाजपा नेते व आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी सर्वच गावातील मतदार बंधू-भगिनींनी भाजपच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार करत कमळाला मतदान करणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, विजय पाटील, दशरथ अमृते, इंद्रजित देसाई, उत्तम देसाई, दीपक देसाई, लहू वाकर, संभाजी पाटील, दीपक गवळी, पांडुरंग राणे, अनिल नार्वेकर, विठोबा पाटील, अनिकेत दळवी, अनिल केरकर, विश्वास गवळी, सुभाष जोशीलकर यांच्यासह गावातील प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात भाजपच्या प्रचार रॅलीत नागरिकांचा मोठा सहभाग; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य….

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आजरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीला दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत चालला आहे. तालुक्याचा पश्चिम भाग असलेल्या पेरणोली, देवकांडगाव, दाभील, गवसे, देवर्डे परिसरात भारतीय जनता पार्टीने प्रचार रॅली राबवली. या प्रचार रॅलीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी घर टू घर प्रचार मोहीम राबविण्यात आली. भागातील विविध नागरिक, युवक, महिला यांच्याशी संवाद देखील साधण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार जयवंत सुतार व पंचायत समितीचे उमेदवार स्मिता देसाई यांना मोठे मताधिक्य देत निवडून देण्याचा निर्धार पश्चिम भागातील मतदार बंधू-भगिनींनी केला आहे. पश्चिम भागात मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

यावेळी उमेदवार जयवंत सुतार, स्मिता देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, दीपक गवळी, संभाजी सरदेसाई, विकास बागडी, बळवंत शिंत्रे, सुरेश गिलबिले, उत्तम देसाई, सयाजी नार्वेकर, देविदास गुरव, संदीप देसाई, महादेव निऊंगरे, पांडुरंग पाटील, विश्वास कोडक, विठ्ठल मस्कर, विनायक लोहार, प्रसाद केसरकर, इरफान शेख, राजेंद्र कालेकर, मुकुंद कांबळे, राजू दिक्षित, लहू वाकर, विलास धडाम, प्रकाश कविटकर, उत्तम कासार, अजित हरेर, बबलू शेळके, दिलीप सुतार, हर्षवर्धन महागावकर, अमोल सुतार, पंकज वास्कर, अनिकेत दळवी, रवींद्र दिवेकर यांच्यासह नागरिक प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.

राजू होलम यांचा घर टू घर प्रचार


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी पंचायत समिती मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजू होलम यांच्या प्रचारार्थ कोळींद्रे व पोश्रातवाडी येथे घर टू घर प्रचार करण्यात आला.

यावेळी सौ.रचना होलम, श्री. अशोक तरडेकर ,सौ. राजलक्ष्मी देसाई ,श्री.राजू देसाई , श्री. विष्णू वाके, सौ.कमल वाके, श्री.म. स. पाटील, श्री.रामचंद्र पाटील , श्री. जयराम संकपाळ, श्री. गोविंद नारळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उत्तूर प्रा. आ. केंद्रा मार्फत ‘स्पर्श अभियानास’ सुरुवात

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दिनांक ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ अखेर या १५ दिवसात ‘कुसुम’ (कुष्ठ मुक्त सुरक्षित महाराष्ट्र ) मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने ऊसतोड मजूर, खाण कामगार, रस्ते कामगार, वीट भट्टी कामगार अशा जोखमीच्या घटकांचे सर्व्हेक्षण करून कुष्ठरोगा बाबत तपासणी केली जाणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूर च्या कार्यक्षेत्रातील ६ टीम मार्फत ऊसतोड मजूर ४४७, क्रशर मजूर ४९ व रस्ते कामगार ११ अशा एकूण ५०७ मजुरांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये न खाजणारा, न दुखणारा लालसर रंगाचा बधिर चट्टा, अंगावर गाठी असणे, चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, हातापायाची बोटे वाकडी होणे, पायातून चप्पल गळून पडणे, दुखणाऱ्या मज्जा,बसके नाक,डोळे पूर्णपणे बंद न होणे अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या मजुरांची तपासणी करून बाधित रुग्णांवार तात्काळ उपचार केले जाणार आहेत.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. सौरभ कसबे यांचे मार्गदर्शना खाली आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक व आशा सेविका यांनी नियोजन केले आहे.

जनता गृहतारण संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिला मेळावा…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सुरक्षित आणि खात्रेशीर गुंतवणुकीसाठी जनता सहकारी गृहतारण संस्था आजरा हा एकमेव पर्याय आहे. कारण संस्थेतून घर बांधणीसाठी दिली जाणारी कर्जे ही तारणाशिवाय दिली जात नाही त्यामूळे इथल्या ठेवी १०० टक्के सुरक्षित आहेत, असे प्रतिपादन डॉ. संजीवनी पाटील यांनी केले. जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संचालिका प्रा. सौ. क्रांती शिवणे होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, महिलांमध्ये बचतीची शिस्त आणि सवय असते. हीच गोष्ट कुटुंबाच्या फायदयाची ठरते. तेंव्हा अधिकाधिक महिलांनी जनता गृहतारण संस्थेमध्ये आपली खाती उघडून सहकार्य करावे.

जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती करून दिली. या मेळाव्यासाठी आजरा नगरपंचायतीच्या नूतन उपनगराध्यक्षा सौ. आश्विनी डोंगरे, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी पाटील, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, सौ. सुनंदा मोरे, सौ. सुप्रिता मोरे, सौ. शुभदा बाचूळकर, सौ. सुश्मिता सादळे, सौ. शितल मोरे, सौ. रंजनाताई कावळे, सौ. गीता नाईक, सौ. भैरवी सावंत यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

छायावृत्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती यांच्या कार्यालयाचे उद्घाटन डॉ. श्री. श्रदानंद ठाकुर व नगरसेविका सौ. स्मिता कुंभार यांच्या शुभहस्ते नगरसेवक परशुराम बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रवळनाथ कॉलनी, आजरा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन समारंभास श्री. दयानंद भुसारी,श्री. अरूण देसाई,श्री. नाथ देसाई,श्री. सलामवाडे,श्री. दत्तात्रय मोहिते,श्री. सचिन बिरजे, श्री. विलास रावजीचे, श्री. सुरेश देसाई,श्री. मनवेल बार्देसकर,श्री. मोतीराम बार्देसकर, श्री. धनाजी इलगे, अन्याय निवारण समितीचे श्री. गौरव देशपांडे,श्री. पांडुरंग सावरतकर,श्री. सुधीर कुंभार,श्री. विजय थोरवत, श्री. मिनिन डिसोझा, श्री. जोतिबा आजगेकर,श्री. बंडोपंत चव्हाण,श्री. जावेद पठाण,श्री. रामचंद्र पंडीत, श्री. संतोष बांदिवडेकर श्री. अभिजीत संकपाळ , चंद्रकांत पारपोलकर तेजम मामा तसेच रवळनाथ कॉलनी मराठा प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाठींबा

उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील ताराराणी आघाडीचे अधिकृत उमेदवार उमेश आपटे यांना होन्याळी येथील युवा कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

 

संबंधित पोस्ट

लक्ष्मण कुंभार – परळकर यांचे निधन…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!