mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५

लागा तयारीला…
तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत उद्या

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जिल्ह्यातील १ हजार २६ ग्रामपंचायतींकरीता सरपंच पदापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणा-या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पदे जिल्हानिहाय वाटप केली आहेत. याबाबत तालुकानिहाय सरपंच पद आरक्षण निश्चित करुन आदेश पारीत करण्यात आला आहे. यामुळे इच्छुकांची धालमेल वाढली आहे.

     आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींकरीता असणारे आरक्षण पुढील प्रमाणे :-

अनुसूचित जाती – ४, अनुसूचित जाती स्त्री – ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग- ९, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री – १०, सर्वसाधारण – २३, सर्वसाधारण स्त्री – २३.

     नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत सरपंच पदे वाटप करतांना समर्पित आयोगाच्या अहवालानुसार, तालुकानिहाय वाटप केलेली आकडेवारी न घेता जिल्ह्याकरीता सरासरी देय असणारी २६.६ टक्क्याच्या प्रमाणात तालुकानिहाय ना.मा.प्रवर्गाच्या सरपंच पदाच्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत.

       तहसिलदार यांनी यापूर्वीच्या निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीचा विचार करुन सरपंच पदे प्रवर्ग निहाय आळीपाळीने नेमून  देण्यात येणार आहे.आजरा येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत सभागृहात सदर आरक्षण सोडत होणार आहे.

       यामुळे बरेच दिवस लांबलेल्या अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे चित्र स्पष्ट होणार असून इच्छुक मंडळींचा पुढील मार्ग रिकामा होणार आहे.

     पंचायत समिती नको… सरपंचपदच परवडले 

     अलीकडे पंचायत समितीच्या सदस्यांकडे फारसे अधिकार नसल्याने केवळ नावापुरतेच व मिरवण्याकरता सदस्य पद अशी अवस्था झाली आहे. याउलट ग्रामपंचायतींना भरघोस निधी येऊ लागल्याने पंचायत समिती सदस्यपद नको पण सरपंचपदच मिळावे यासाठी अनेक जण देव पाण्यात घालून आहेत.

आजरा साखर कारखाना अध्यक्ष निवडीच्या हालचाली वेगावल्या

आज कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता..

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा वसंतराव धुरे यांनी दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम आज सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे नूतन अध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

      प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करून धुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याला रीतसर मंजुरीही देण्यात आली आहे.यामुळे नूतन अध्यक्ष कोण ? यावर आता काथ्याकुट सुरू आहे. आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीत असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाने एनसीडीसी च्या माध्यमातून कमी व्याजदरा सुमारे १२२.६८ कोटी रुपयांची मदत करून कारखान्याच्या प्रगतीच्या उद्देशाने साथ दिली आहे. तरी देखील कारखाना तूर्तास आर्थिक अडचणीतून बाहेर पडेल असे दिसत नाही. यावर्षी झालेले ऊस गाळप हे समाधानकारक नाही हे मान्य करावे लागेलच. अशीच परिस्थिती राहिल्यास कारखान्याच्या आर्थिक अडचणीत भविष्यातही वाढच होणार आहे. कारखाना सुस्थितीत आणण्याचे आवाहन नवीन अध्यक्षांसमोर राहणार आहे.

      अध्यक्ष पदासाठी तूर्तास विष्णुपंत केसरकर व जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांची नावे पुढे येत आहेत. सत्ताधारी मंडळींचे वरिष्ठ नेते मंत्री मुश्रीफ यांची भूमिका अध्यक्ष निवडीमध्ये महत्त्वाची राहणार आहे.

नुसती बकरी आणि कोंबडीच…
ना पाणी…ना वीज…ना बैठक व्यवस्था

     आजरा-गडहिंग्लज मार्गावर आजऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व जागृत असे समजले जाणाऱ्या म्हसोबा देवस्थान नजिक कोंबडी व बकरी कापून देवपण करणाऱ्या मंडळींचे आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या पाण्यासह वीज व बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने येथे नव्यानेच येणाऱ्या इतर भाविकांची बरीच कुचंबणा होताना दिसते.

     बुधवार, शुक्रवार रविवार या तीन दिवशी तर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. देवपण करून जेवणावळींच्या पंगती उठत असतात. मात्र या ठिकाणी असणाऱ्या बोरवेलचे पाणी जेवणासाठी वापरण्यायोग्य नाही, परिसरातील बैठकीसाठी ठेवलेली बाकडी तुटली आहेत व त्याचबरोबर येथे उजेडासाठी लावण्यात आलेल्या यंत्रणेतील बॅटऱ्यांसह दिवेही गायब करण्यात आले आहेत.

       अत्यंत गरजेचे असणाऱ्या या तीन प्राथमिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होत आहे.

वनविभागात अवतरले परिसरातील प्राणी…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा वन विभागाच्या सुलगाव रोपवाटिकेतील असणाऱ्या मुख्य कार्यालय परिसरात वन्य जीवांचे हुबेहूब पुतळे उभा करण्यात आले असून हळूहळू हा परिसर पर्यटकांचे आकर्षण पडल्यास आश्चर्य वाटू नये.

       महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या मदतीने या रोपवाटिकेत आजरा वन परिसरात आढळणाऱ्या गवा, बिबट्या, ब्लॅक पॅंथर, सांबर, हरीण, भेकर आधी प्राण्यांचे पुतळे उभा करण्यात आले आहेत. यामुळे या परिसराचे सौंदर्य तर वाढले आहे परंतु त्याचबरोबर पर्यटकही हळूहळू या परिसराला भेट देऊ लागले आहेत.

      येथे पाण्याची व्यवस्था व छोटीशी बाग केल्यास शालेय विद्यार्थी व पर्यटकांची संख्या निश्चितच वाढणार आहे. वनविभागाने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल वर लोक वर्गणीतून खोदली कुपनलिका

पाणीप्रश्न संपुष्टात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये लोक वर्गणीतून कुपनलिका खोदण्यात आली. गेल्या कित्येक दिवसापासून येथील कुपनलीकेची गरज बोलून दाखवली जात होती. संस्थेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार आलम नाईकवाडे यांनी स्वीकारल्यानंतर तातडीने त्यांनी पाणी प्रश्नाला प्राधान्य देत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सदर कुपनलिका खोदली आहे.

      याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शौकतअली लाडजी, अश्कर लष्करे, रशीद पठाण, रियाज तकिलदार, हुसेन दरवाजकर, अबुलास दरवाजकर, शरीफ खेडेकर, बशीर शीडवणकर,सत्तार ढालाईत, ॲड. जावेद दिडबाग ,शरीफ खेडेकर उपस्थित होते.

तालुक्यात रामनवमी उत्साहात

आजऱ्यात आज सोंगी भजन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरासह तालुक्यात राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभू श्रीराम जन्मसोहळ्यासह विविध कार्यक्रम ठीक- ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

      आजरा येथील श्री राम मंदिरामध्ये पंचसूक्त पवमान, अभिषेक जन्म काळ आरती मंत्रपुष्प श्री राम रक्षा स्तोत्र पठण यासह महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. रामतीर्थ येथेही श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

      आजरा येथील श्री राम मंदिर परिसरात आज सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सोंगी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आत्महत्या. ???

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला न्याय देण्यास महाराष्ट्र शासन बांधील… पालकमंत्री केसरकर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!