

आरळगुंडीच्या शेतक-याचे ४९ हजार रुपये हातोहात लांबवले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बाजारहाटीसाठी उत्तूरला आलेल्या बळवंत विष्णू पाटील या शेतकऱ्याचे बँकेतून काढलेले ४९ हजार रुपये अज्ञात दुचाकीस्वारांनी हातोहात लांबवण्याची घटना घडली आहे. उत्तुर येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.
पाटील हे उत्तूर येथील एका बँकेतून ४९ हजार रुपये काढून जवळच असणाऱ्या सॉ मिलवर लाकूड कापण्याबाबत चौकशी करण्याकरता चालले असता अज्ञात मोटरसायकलस्वारांनी त्यांना वाटेत थांबवून त्यांच्याजवळ तंबाखूची मागणी केली. आपल्याजवळ तंबाखू नाही असे सांगत असतानाच एकाने त्यांच्या जवळील पिशवी हिसकावून घेतली. पिशवीसह तातडीने दुचाकी स्वार आज-याच्या दिशेने निघून गेल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाऊस कमी नुकसान जास्त…
घरांचे पत्रे उडाले, झाडे कोसळली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये ठीक- ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्याने आजरा सूतगिरणी जवळ ३३ केव्ही विद्युत तारांवर वीज कोसळल्याने तालुक्यातील १५ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला तर पेरणोली ता. आजरा येथे वादळी वा-यामूळे घरांचे पत्रे,कौले व प्राथमिक शाळेची कौले उडून गेल्याने नूकसान झाले आहे.तर आजरा- चंदगड मार्गावरील कासारकांडगाव येथे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काल पाऊस कमी आणि नुकसान जास्त असा प्रकार तालुका वासीयांनी काल अनुभवला.
दुपारी चार वाजल्यानंतर अचानक जोरदार वादळी वा-याला सुरुवात झाली. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे गावा- गावातील व शेतातील घरांचे पत्रे, कौले उडून गेल्याने मोठे नूकसान झाले. पेरणोली येथील काका मोहिते यांच्या घराचे पत्रे उडून ग्रामपंचायतीच्या इमारतीवर पडून नूकसान झाले आहे.तर निवृत्ती मोहीते यांच्याही घराचे पत्रे उडाले आहेत.यासह अनेकांचे पत्रे,कौले उडून ७० हजारापेक्षा अधिक नूकसान झाले आहे.दरम्यान कासारकांडगाव मार्गावर झाड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. आंबा व काजू पिकालाही याचा जबर फटका बसला आहे.
रात्री उशिरापर्यंत विद्युत तारांच्या जोडणीचे काम वीज वितरण कंपनीकडून सुरू होते. तब्बल दहा तास वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवतापासंदर्भात जनजागृती करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत पोळगाव, कासार कांडगाव, गवसे, पारेवाडी, दाभित व शिरसंगी या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये रॅली काढणे, गप्पी मासे सोडणे, गट सभा इत्यादी विविध कार्यक्रम साजरी करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.जी. गुरव यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक साबखान,आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सावंत, सेवक प्रशांत चौधरी, रोहित शेंडे, आणि प्रमोद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

राजवाडा ते धनगरवाडा..मोहीम
फत्ते
छत्रपती कुटुंबीयांशी संवादाने धनगर बांधव सुखावले

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या आठवडाभरात राजवाडा ते आजरा तालुक्यातील धनगरवाडा असा दौरा करून मतदारांशी संपर्क करत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना लोकशाहीच्या प्रवाहात आणण्याची राबवलेली मोहीम फत्ते झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
लोकसभेच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात हे धनगरवाडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षितच राहिले आहेत. स्थानिक जवळपासच्या ग्रामपंचायत निवडणुका व अलीकडे विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून या वाड्यांना लोकशाहीची ओळख होत आहे.
यावेळी मात्र राजवाड्यात रहाणाऱ्या छत्रपती कुटुंबीयांनी आजरा तालुक्यातील डोंगर कपारीत राहणाऱ्या धनगरवाड्यांवरील धनगर बांधवांच्या उंबऱ्याला पाय लावल्याने धनगर बांधव भारावून गेले आहेत.
छत्रपती कुटुंबीयांशी भरभरून बोलताना त्यांच्या डोळ्यातील या कुटुंबीयांविषयी असणारे आत्मियतेचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा अप्रत्यक्ष संदेश हे बांधव देताना दिसत होते.
एकंदर राजवाडा ते धनगरवाडा ही मोहीम यशस्वी करण्यात छत्रपती कुटुंबीय व त्यांचे सहकारी निश्चितच यशस्वी झाले आहेत.



