बुधवार
२६ ऑगस्ट २०२६

अखेर हाजगोळी ग्रामपंचायतीचे सिल काढले…
येळणे यांचा कार्यभारही काढून घेतला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा:
ग्रामपंचायत अधिकारी एस. के. येळणे यांच्याकडे असलेला हाजगोळी खुर्द (ता. आजरा) या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणी व चौकशीसाठी समिती नेमली आहे. श्री. येळणे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई केल्याचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी सांगितले.
ग्रामपंचायत अधिकारी श्री. येळणे यांचा कारभार हा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता चालला आहे. सदस्यांनी कारभाराबाबत विचारणा केल्यास त्यांना उद्धट उत्तरे दिली जातात, अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे दप्तर सील करण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. पण ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयच सील केले. चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा कार्यालयाचे सील काढण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. आज सहा दिवसांनंतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांशी चर्चा झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे सील काढण्यात आले. यानंतर ग्रामपंचायतीचे दप्तर सील करण्यात आले आहे.
दरम्यान, कागल किंवा गडहिंग्लज येथील सहाय्यक गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांमार्फत दप्तराची तपासणी केली जाणार आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर तो उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. आज श्री. येळणे यांच्याकडील हाजगोळी खुर्द ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, डॉ. रोहन जाधव, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी. टी. कुंभार उपस्थित होते.

बिबट्यासाठी मडिलगे येथे पिंजरे व ट्रॅप कॅमेरे…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वनपरीक्षेत्र आजरा, वनपरिमंडळ उत्तर आजरा कडील मौजे मडीलगे येथे बिबट्याचा वावर लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आज रोजी बिबट प्रवण क्षेत्रात २पिंजरे व ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही श्री. सचिन सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी, आजरा यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत श्री. कृष्णा डेळेकर, (वनपाल उत्तर आजरा), श्रीमती प्रियांका पाटील, (वनरक्षक मडीलगे), वनसेवक श्री. सुरेश पताडे, श्री. कुंडलिक शिंदे, श्री. मधूकर दोरुगडे तसेच RRT सदस्य श्री. समीर केरकर, श्री. साहिल डेळेकर, श्री. अक्षय पाटील व श्री. नितीन पाटील यांनी पार पाडली.
प्रसंगी मडीलगे गावचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर ठिकाणी वन्यजीव बचाव पथक व वनकर्मचारी यांचे मार्फत नियमित देखरेख व गस्त सुरू ठेवण्यात आली आहे.

आजरा तालुक्यात ४ कोटी ३ लाखांची कर्जमाफी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील १४१३ शेतकऱ्यांना ४ कोटी ३ लाख ३३ हजार १६२ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. पहिल्या टप्प्यात ६०८ शेतकऱ्यांना २ कोटी ४२ लाख ५१ हजार २७४ रुपयांचा लाभ मिळाला असून संबंधित खातेदारांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा झाली आहे. तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ८०५ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख ८१ हजार ८८८ रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करण्याचे काम गतीने सुरू आहे. हे अल्पमुदतीचे पीक कर्ज आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा लागून राहिली होती. याबाबत विचारणा होत होत्या. या महिन्यात कर्जमाफीच्या याद्या सेवा संस्था व राष्ट्रीयकृत बँकांकडे जमा झाल्या. पहिल्या टप्प्यात सुमारे ६०८ शेतकऱ्यांना २ कोटी ४२ लाख ५१ हजार २७४ रुपयांचा लाभ मिळाला असून त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा झाली आहे.
उर्वरित ८०५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत, पण तांत्रिक अडचणी व त्रुटींमुळे त्यांना लाभ मिळालेला नाही. मयत, स्थलांतरित, समती कर्ज वाटप, देवस्थान जमीन, हयात असूनही अॅग्रोस्टॅक नंबर काढलेला नाही, अॅग्रोस्टॅक नंबर आहे पण ‘नॉट फाउंड’ असा मेसेज येत आहे, बायोमेट्रिक कॅप्चर होत नाही, मयत वारस असून जमीन नावावर नाही, अपात्र असूनही यादीत नाव आले आहे, रकमेबाबत तक्रार आहे, अॅग्रोस्टॅक नंबर आहे पण ई-केवायसी केलेली नाही, काही जणांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, काहींना कर्जमाफीचा लाभ नको आहे, या कारणांमुळे उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांना लाभ मिळणार आहे. तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर वेगाने सुरू असून याबाबत वरिष्ठ पातळीवरून दररोज माहिती घेतली जात आहे.
सुलगाव येथे “माझा गट माझं कुटुंब” कार्यक्रम उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भावेश्वरी शेतकरी गट, सुलगाव यांच्या सहकार्याने महादेव मंदिर, सुलगाव येथे दि. 25 ऑगस्ट रोजी “माझा गट माझं कुटुंब” कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पांडुरंग खवरे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या नंदिनी डोंगरे, पाणी फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर अभिजीत सुतार, फिल्ड ऑफिसर संजना मदने, मंडळ कृषी अधिकारी (उत्तूर) मोहन फुले, उप कृषी अधिकारी प्रकाश पाटील, मेंटर तथा सहाय्यक कृषी अधिकारी मनिषा धनाजी पाटील, मेंटर उमेद सोनाली परीट प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भजन व दिंडीने झाली. माऊली भजनी मंडळाने टाळ-मृदंगाच्या गजरात शोभा वाढवली. यावेळी रणरागिणी शेतकरी गट बोलकेवाडी, अमृतेश्वर गट निंगुडगे, अन्नदाता गट सरंबळवाडी, जगात भारी गट कासार कांडगाव, हरितक्रांती गट साळगाव, नवनिर्माण गट देवकांडगाव या गटांचे भावेश्वरी गटाच्या वतीने पुष्पगुच्छ, आरती व पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.
पाणी फाउंडेशनचे अभिजीत सुतार व संजना मदने यांनी सांघिक खेळातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन भावेश्वरी गटाच्या अध्यक्षा विजया वर्देकर, निमंत्रक विश्वास देसाई, ओंकार खवरे, संजय डोंगरे व सर्व सदस्यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा पाटील यांनी केले तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

साळगाव फाटा येथे बस स्टॉप व शेड मंजूर करा – एसटी प्रवासी संघटनेची मागणी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-गडहिंग्लज महामार्गावरील साळगाव फाटा येथे अधिकृत बस स्टॉप व बस शेड मंजूर करावा, अशी मागणी एसटी प्रवासी संघटनेने आजरा आगार व्यवस्थापकांकडे केली.
संघटनेचे अध्यक्ष सचिन कृष्णा इंदुलकर, सचिव विकास पांडुरंग सुतार, उपाध्यक्ष उदयसिंह सरदेसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या फाट्यावरून ITI कॉलेज, शासकीय वसतिगृहे, विद्यानगर, कमलकुंज, जॉन फर्नांडिस नगर व साळगाव, पेरणोली, हरवडे, कोरीवडे, देवकांडगाव, गारगोटी मार्गावरील शेकडो विद्यार्थी-प्रवाशांची ये-जा असते. स्टॉप नसल्याने बसेस थांबत नाहीत व शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होतात.
यावेळी नाथ नारायण देसाई, सदस्य देविदास गुरव, मंगेश पोतनीस, विराज बिळे, हितेश कुंभार, सुयश लाड, अभिषेक रोडगी यांची उपस्थिती होती.

आमदार सतेज (बंटी) पाटील आज आजरा दौऱ्यावर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा आज बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी आजरा तालुक्यात गोकुळ ठरावधारक संपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे.
त्यांचा दौरा असा – सकाळी ९ वा. बहिरेवाडी – मुम्मेवाडी येथे अण्णासो पाटील यांच्या घरी नाष्टा व ठरावधारक भेट, सकाळी १० वा. उत्तूर येथे, १०.३० वा. मडीलगे येथे के.व्ही. येसणे सर यांच्या घरी, ११ वा. आजरा अर्बन बँक व जनता बँक सभागृहात, १२ वा. किणे येथे जयवंत सुतार यांच्या घरी, १२.३० वा. कोळद्रे येथे रवळनाथ दूध संस्था सभागृहात व दु.१ वा. पेद्रेवाडी येथे शारदा व्ही. चव्हाण पाटील पतसंस्था सभागृहात ठरावधारक भेट व जेवण.
निधन वार्ता
मारुती गोडसे

भादवण ता. आजरा येथील मारुती कोंडीबा गोडसे (वय ६० वर्ष ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी पत्नी असा परिवार आहे.
भादवण हायस्कूलचे ते सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी होते.
आजचे पंचांग
- दिनांक : २६ ऑगस्ट २०२६
- वार : बुधवार
- माह (अमावस्यांत) : श्रावण
- माह (पूर्णिमांत) : श्रावण
- ऋतु : शरद
- आयन : दक्षिणायन
- पक्ष : शुक्ल पक्ष
- तिथी : त्रयोदशी तिथी (सकाळी ७.५९ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
- नक्षत्र : श्रवण नक्षत्र (२७ ऑगस्ट रात्री १२.४७ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
- योग : सौभाग्य योग (सकाळी ०७.५८ पर्यंत) त्यानंतर शोभन योग
- करण : तैतुला करण (सकाळी ०७.५९ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
- चंद्र राशी : मकर राशी
- सूर्य राशी : सिंह राशी
- अशुभ मुहूर्त:
- राहु काळ : दुपारी १२.४० ते दुपारी ०२.१४ पर्यंत
- सूर्योदय : सकाळी ०६.२३
- सूर्यास्त : सायंकाळी ०६.५७
- संवत्सर : पराभव
- संवत्सर(उत्तर) : रौद्र
- विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
- शक संवत: १९४८ शक संवत

