मंगळवार
२५ ऑगस्ट २०२६

कचऱ्यासह विविध प्रश्नांवरून धुमशान आजरा नगरपंचायत मासिक सभा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहरातील कचरा उठावाचा प्रश्न, रस्त्यांवर पडलेले खड्डे, टाकी भरून वाहून जाणारे पाणी, वर्क ऑर्डर्स देणास होणारा विलंब या विषयावर वादळी चर्चा झाली. अनेक प्रश्नांवरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक चराटी होते.
निहाल नायकवाडे यांनी स्वागत केले. सुरुवातीला शहरातील पाण्याच्या नळांना मीटर बसवण्याचा विषय आला. यावेळी नगरसेवकांनी पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर मीटर बसवण्याबाबत विचार करू असे ठरवले, तोपर्यंत मीटरचा विषय स्थगित करण्यात आला आहे. अन्वी केसरकर यांनी एकता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतील ओव्हर फ्लो पाण्यासंदर्भात विचारणा केली. यावर अभिषेक शिंपी यांनीही पाणी वाया जात असताना ऑटोमेशन बसवण्याची गरज असल्याचे सांगितले. यावर पाणी योजनेचे ठेकेदार आर. डी. देसाई यांनी पाणी योजनेच्या अंदाजपत्रकात तरतूद नसल्याचे सांगितले. निसार लाडजी यांनी सहा महिने पैसे भरून ही नवीन नळ कलेक्शन मिळत नसल्याकडे लक्ष वेधले. परेश पोतदार यांनी सुतार गल्लीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली. मुरूम टाकून जास्त दिवस राहत नसल्यास काँक्रीटने खड्डे भरण्याची मागणी केली. तसेच शहरातील गणेश विसर्जन मार्गांची स्वच्छता व डागडुजी करण्याची मागणीही केली.
रामतीर्थ विश्रामगृह डागडुजीचा विषय विषय पत्रिकेवर होता. यावर नगरसेवकांनी जुनी धर्मशाळा देखील दुरुस्ती विषय घेऊन अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले. खंदक व जनावरांचा बाजार जागेवरील अतिक्रमण काढून पार्किंगसाठी जागा तयार करा, असे नगराध्यक्ष अशोक चराटी यांनी सांगितले. नगरसेवक विषय मांडतात मात्र अधिकारी पाठपुरावा करत नाहीत, असे विक्रम पटेकर यांनी सांगितले. मलिक बुरुड कॉर्नर ते सीड फार्म रस्ता नगरपंचायत कडे हस्तांतर करावा, अशी मागणी रेशमा बुड्ढेखान यांनी लेखी केली आहे. स्वच्छतेच्या ठेक्यावरून सर्वच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना लक्ष केले. स्वच्छता ठेकेदाराकडून होणाऱ्या स्वच्छतेचे दररोजचे रेकॉर्ड ठेवा. स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड करू नका. स्वच्छतेकडे मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्तिगत लक्ष घालावे, असे नगरसेवकांनी सांगितले. यावेळी सांडपाणी व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली. गांधीनगरातील वाटप केलेल्या भूखंडावरील इमारत बांधकाम प्रश्नाकडे स्मिता कुंभार यांनी लक्ष वेधले. यावेळी उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, अनिकेत चराटी, मुख्याधिकारी सुरज सुर्वे, नगरसेवक परशुराम बामणे, असिफ पटेल, असिफ सोनेखान, डॉ. इंद्रजीत देसाई, रहमतबी खेडेकर, पुनम लिचम, अश्विनी चव्हाण यांच्यासह खाते प्रमुख उपस्थित होते.
गांधीनगर घरकुलांना बांधकाम परवाने द्या...
गांधीनगर येथील भूखंड हे निवासी कारणाकरता देण्यात आले आहेत. बांधकाम परवाने मागणी केली असता संबंधिताला सदर जमिनी अ वर्ग करून घ्या असा सल्ला अधिकाऱ्यांकडून दिला जातो. मुळातच हे भूखंड निवासी कारणाकरीता देण्यात आल्याने बांधकाम परवाने मागणी करणाऱ्यांची अडवणूक न करता तातडीने परवाने द्या असे सभागृहाने अधिकाऱ्यांना सांगितले.

“आमच्या जमिनी तुम्हीच कसा आणि आम्हाला खंड द्या ! ” – वनविभागाला मडीलगे ग्रामस्थांचा इशारा

मडीलगे : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे मडीलगे परिसरात भीतीचे वातावरण आहे. शेती करणे आणि रात्री घराबाहेर पडणेही धोकादायक झाल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आजरा वनविभागाला निवेदन दिले.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:-
– बिबट्या व वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा
– संवेदनशील ठिकाणी कॅमेरे व पिंजरे बसवावेत
– वनविभागाची गस्त वाढवावी आणि रात्री विशेष पथकाकडून पाहणी करावी
– केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष कारवाई करावी
संतप्त ग्रामस्थांनी “वन्यप्राण्यांचा बंदोबस्त होत नसेल तर आमच्या जमिनी वनविभागानेच ताब्यात घेऊन त्याबदल्यात आम्हाला खंड द्या” असा प्रस्ताव मांडला आहे.
महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून जीवितहानी घडण्यापूर्वी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.
आठ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी सरपंच बापू नेऊंगरे, के.व्ही.येसणे, आनंदा घंटे व, संदीप पाटील, अनिकेत कवळेकर, शिवराज मोहिते, पांडुरंग जाधव, शामल कातकर, मनीषा कालेकर, डॉ.आनंदा कांबळे, आनंदा मुरकुटे, सूर्यकांत चोडणकर, सुनीता येसणे, दशरथ कुंभार ,सुदाम पाटील, तानाजी येसणे,अंबाजी जाधव, भूषण कातकर , उत्तम काणेकर दशरथ घाटगे, प्रकाश कडगावकर, मधुकर पाटील, निवृत्ती डोंगरे, महादेव घाटगे यांच्यासह बिबट्याच्या त्रासाने पीडित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदिरानगरच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी – मंत्री बावनकुळे यांना निवेदन

उत्तूर : मंदार हाळवणकर
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात उत्तूर येथील इंदिरानगरच्या प्रॉपर्टी कार्डचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. यासंदर्भात इंदिरानगरमधील युवकांनी बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. इंदिरानगर परिसरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला असून, तो मार्गी लावण्यासाठी स्थानिक युवकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन या प्रश्नासंदर्भातील माहिती संकलित करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडेही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. तसेच या प्रश्नासंदर्भात ग्रामपंचायत मतदारसंघाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे. महसूल विभागाचा विषय असल्याने बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा फायदा घेत इंदिरानगरच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी बावनकुळे यांनी निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित विषयाचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी भास्कर भाईगडे, सुधीर जाधव, सतीश दळवी, अवधूत इंगळे, प्रशांत हातरगी, सागर दळवी उपस्थित होते.
मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत ‘व्यंकटराव’चा प्रतीक येसणे राज्यात तृतीय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत शहरी राज्यस्तर स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलचा विद्यार्थी कु. प्रतीक रमेश येसणे या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. या विजेत्या स्पर्धकाला मुंबई येथे संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री .नाम. डॉ. उदय सामंत यांचे हस्ते रोख रक्कम १०,००० /- रु. सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी शाळेतील इयत्ता नवावीचे एकूण २२ विद्यार्थी बसले होते . सदर परीक्षा ही आॕनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे . यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मराठी विषय शिक्षिका श्रीमती एस. के, कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ, आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे माजी प्राचार्य श्री . एम.एम.नागुर्डेकर , प्राचार्य श्री.एस.एन.पाटील, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.

‘मृत्युंजय महान्यूज’ च्या वृत्ताचा दणका -धामणे घाटातील धोकादायक चर तात्काळ मुजवली

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धामणे (ता. आजरा) येथील घाटरस्त्यावर संरक्षक कठड्यालगत पडलेली धोकादायक चर अखेर तात्काळ बुजविण्यात आली. मृत्युंजयने शुक्रवारी ‘ घाटातील चर अपघातास निमंत्रण’ या मथळ्याखाली छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित यंत्रणेने त्वरित कारवाई केली.
पांगीरे-नेसरी रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे सध्या धामणे घाटातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. कठड्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता व कठडा यांच्या मधील खोल चरवाहनचालकांसाठी गंभीर धोका ठरत होती.
वृत्ताची दखल घेत दगड व माती टाकून चर बुजविण्यात आल्याने संभाव्य अपघाताचा धोका टळला असून वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
निधन वार्ता
कासुबाई भिऊंगडे

आजरा, ता. २४ : पेरणोली ता. आजरा येथील कासुबाई परस् भिऊंगडे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुन, नातवंडे, नातसून असा परिवार आहे. उद्या मंगळवार (ता. २४) सकाळी ९ वाजता रक्षाविसर्जन होईल. आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी भरत परस् भिऊंगडे यांच्या त्या आई होत.
अजित देसाई

वाटंगी तालुका आजरा येथील अजित वसंतराव देसाई (वय ४७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

श्री. रवळनाथ प्राथमिक शाळेत ‘एक राखी देशाच्या सैनिकांसाठी’ उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता एज्युकेशन सोसायटी संचलित श्री. रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर, आजरा येथे ‘एक राखी देशाच्या सैनिक बांधवांसाठी’ उपक्रम झाला.
मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला देसाई व जेष्ठ शिक्षिका निलांबरी कामत यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्व सांगितले, तर विशाल गुरव , सौ. मोनिका पाटील, स्नेहल भोसले यांनी विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून घेतल्या. तयार राख्या बेळगाव येथील मराठा लाईन इन्फ्रंट्री रेजीमेंट सेंटरला पाठविण्यात आल्या.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेशअण्णा कुरुणकर व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले. यावेळी आजरा पंचायत समितीच्या उपसभापती यशोदा पोवार* व जागृती बी.एड्. कॉलेज, गडहिंग्लजच्या छात्राध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
उमरा यात्रेसाठी मुराद यांना रवळनाथ ग्रामीण बिगरशेती संस्थेतर्फे शुभेच्छा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक मजीद मुराद हे पवित्र उमरा यात्रेसाठी प्रस्थान करीत असल्याने संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. व्हा. चेअरमन समीर गुंजाटी यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन अभिषेक शिंपी यांनी शुभेच्छा देत त्यांची यात्रा मंगलमय होवो अशा शुभेच्छा दिल्या .
यावेळी चेअरमन अभिषेक शिंपी, संचालक किरण कांबळे, विक्रम पटेकर, इब्राहिम इंचनाळकर, युसूफ गवसेकर, सिकंदर दरवाजकर, महंमदरसुल आगा, हुसेन दरवाजकर, मॅनेजर विश्वास हरेर आदी उपस्थित होते.
छाया वृत्त

श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार व एकादशी निमित्त रामतिर्थ क्षेत्र येथे आज महादेव मंदिर येथे किर्तन सोहळा आयोजित केला होता.त्यासाठी साळगाव येथुन ग्रंथ दिंडी आली होती दुपारी एक वाजता दिंडी महादेव मंदिर येथे आली.त्यानंतर ह.भ.प. डाॅ. पन्हाळकर महाराज यांचे किर्तन झाले चार वाजता सर्व वारकरी व भाविकाना फराळ व दूध वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी श्रीधर जाधव महाराज,धनाजी शिंदे, दशरथ पंडित,उतम पाटील, गुरू गोवेकर, अरविंद ठाणेकर.पारखे महाराज यांनी विषेश परिश्रम घेतले.
आजचे पंचांग
दिनांक : २५ ऑगस्ट २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (रात्री १०.५० पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : आयुष्मान योग (सकाळी ०७.४० पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
करण : कौलव करण (सायंकाळी ०७.१३ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४९ ते सायंकाळी ०५.२४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.२३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

