mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


संगनमताने 
१२ हजार वृक्षांची कत्तल
जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       संकेश्वर – बांदा महामार्गाच्या उभारणीच्या पार्श्वभूमीवर संकेश्वर ते आंबोली मार्गावरील बारा हजार वृक्षांची वनविभाग व संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून कत्तल केली असल्याचा आरोप गर्जना संघटनेच्या वतीने पत्रकार बैठकीद्वारे करण्यात आला असून यामध्ये जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी व त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणीही संघटनेचे प्रमुख प्रकाश बेलवाडे यांनी केली आहे.

      यावेळी बेलवाडे म्हणाले,मुळात हा मार्ग उभारणीसाठी अडसर असणाऱ्या व वृक्षतोडीसाठी परवानगी असणाऱ्या झाडांपेक्षा तब्बल चौपट झाडे तोडण्यात आली असून या झाडांची किंमत करोडोमध्ये आहे. यामध्ये वनविभागाने आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. परंतु निसर्ग संपन्न अशा आजरा तालुक्याच्या तापमान वाढीचा प्रश्नही तयार करण्यास वनविभाग कारणीभूत ठरला आहे.

       शासनाने परवानगी दिलेल्या २८०० वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर नव्याने शासकीय जमिनीमध्ये नव्याने ६८५६ वृक्ष लावण्याची अट घालण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र सरोळी/आजरा येथील खाजगी ४५ गुंठे जागेमध्ये ६८५६ वृक्ष लावल्याचा हास्यास्पद दाखला वन विभागाने दिला आहे. प्रत्यक्षात मात्र येथे एकही झाड लावण्यात आलेले नाही.याची सखोल चौकशी होवून वनाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे अशी मागणी गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी केली आहे. कारवाई होईपर्यंत गर्जना संघटना याचा पाठपुरावा करणार असल्याचे बेलवाडे यांनी सांगितले.

       यावेळी सुयश लाड, जोतिबा नांदवडेकर,सुरेश हातकर, बाजीराव लोखंडे, नारायण भोसले, श्रावण कांबळे, अमोल ढोणूक्षे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वन विभागापासून झाडांचे रक्षण करण्याची गरज…?

       यावेळी बोलताना बेलवाडे म्हणाले झाडांना खरा धोका हा वनविभागापासून आहे असे यापूर्वी धामण्यासह वझरे, पेरणोली, खानापूर येथे पडझडीच्या नावावर चांगल्या झाडांच्या झालेल्या तोडीमुळे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील वनसंपदाला सर्वात मोठा धोका हा वनविभागाकडूनच आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हास्तरीय अधिकाऱ्याच्या जमिनीत वृक्षारोपण केल्याचा दाखला…?

       जिल्ह्यातील सर्वोच्च तत्कालीन अधिकाऱ्याशी संबंधित शेत जमिनीमध्ये ४५ गुंठे क्षेत्रामध्ये ६८५८ वृक्ष लावल्याचे धक्कादायक पत्र रस्त्याच्या संबंधित कंपनीला रस्ता पूर्णत्वाचे दाखला मिळवण्यासाठी देण्यात आले आहे. किमान ही जमीन कोणाची याची तरी माहिती वन अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे होते. आज या जमिनीत ऊस पीक घेतले जाते . तर या जमिनीमध्ये वृक्ष लागवड झाली आहे असा दाखला दिला असला तरीही संबंधित जमीन मालकांना याची काडीचीही कल्पना नाही.

उता-यांवरील वृक्षांच्या नोंदी काढणार…?

        परवानगी पेक्षा जादा वृक्षतोड झालेल्या वृक्षांचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने यंत्रांच्या साह्याने मुळापासून वृक्ष उखडून काढण्यात आले आहेत. जेणेकरून वृक्षतोडीचे पुरावे मिळू नयेत हा या मागचा उद्देश आहे. परंतु या संबंधित जमिनीवरील उताऱ्यावर असणारी झाडांची नोंद कशी काढणार ?असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून संकेश्वर ते आंबोली हद्दीपर्यंतच्या मार्गावरील गावातील स्थानिक रहिवासी, वनविभागाचे कर्मचारी आणि गर्जनाचे कार्यकर्ते संयुक्त पायी दौरा करून वृक्षतोड प्रत्यक्षात किती तोड झाली आहे याची माहिती निश्चितच शोधून काढू असा विश्वासही बेलवाडे यांनी व्यक्त केला.

सर्व शासकीय
योजनांचा लाभ सर्वसामान्यांना दिल्याचे समाधान : आमदार प्रकाश आबिटकर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         गावागावातील अनेक कुटुंबे औषधे, शिक्षण व इतर मूलभूत गरजांसाठी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत हे ओळखून व सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून शासकीय योजनांचे जास्तीत जास्त लाभ अशा गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. महायुती सरकारने संवेदनशील म्हणून चांगल्या पद्धतीचे काम सुरू ठेवले आहे. असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते.

       यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राधानगरी विधानसभा मतदार संघात आजरा तालुक्यातील येणाऱ्या ३५ गावातील संजय गांधी निराधार योजना, प्राधान्य लाभार्थी कुटुंब रेशन कार्ड, पंचायत समितीतर्फे गोठा, शौचालय अनुदान योजना या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. लाडकी बहीण योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा यावेळी गौरव करण्यात आला.

       स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात तहसीलदार समीर माने यांनी विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. अद्यापही कांही अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत ते देखील तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.

     संजय गांधी निराधार समितीचे आजरा तालुकाध्यक्ष अल्बर्ट डिसोजा म्हणाले, संजय गांधी निराधार समितीने गट तट न पाहता समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. राज्यातील मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित दादा यांच्या नेतृत्वाखालील सरकार गोरगरीब वंचित घटकांसाठी काम करत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी समाजसेवेच्या घेतलेल्या व्रतामुळे आगामी काळात जनता त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. दुर्धर आजार असणाऱ्यां करीता उपचारासाठी लागणारे दाखले जिल्हा रुग्णालयाऐवजी उपजिल्हा रुग्णालयाकडून दिले जावेत अशी मागणीही यावेळी डिसोझा यांनी केली.

    यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य जी. एम. पाटील, दत्ता पाटील, श्वेता सरदेसाई, श्रीपती यादव, सरपंच प्रियंका जाधव, सविता जाधव, युवराज पाटील, सुनील देसाई, चंद्रकांत गुरव, काका देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, गोविंद गुरव, जितेंद्र भोसले, संतोष भाटले, विजय थोरवत, इंद्रजित देसाई, छाया कांबळे, रणजित सरदेसाई, अश्विन डोंगरे, महेश दळवी, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते, उपस्थित होते.

     मारुती डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. मंडल अधिकारी सुंदर जाधव यांनी आभार मानले.

तहसीलदारांसह ‘महसूल’चे कौतुक…

       शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजरा तहसीलदार समीर माने व महसूल विभागाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोहोचण्यास मदत होत आहे. लाभार्थ्यांची संख्याही वाढत आहे. तहसीलदार माने यांच्यासह महसूल विभाग निश्चितच कौतुकास पात्र आहे असे यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह संजय गांधी निराधार योजनेचे तालुका समिती अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा यांनी बोलून दाखवले.

बोगस बांधकाम कामगार विरोधी आंदोलनाला आले यश

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     शेतकरी कामगार परिवार संघ प्रणित बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने भाई नारायण रामू वाईगडे यांनी आमरण उपोषण गेली १० दिवस प्रांतकार्यालय, गडहिंग्लज या कार्यालयासमोर बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सुरू होते.

      खरेखुरे बांधकाम कामगार यांची नोंदी व त्यांना कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने देण्यात येणारे लाभ व योजना मिळाल्या पाहिजेत. खोट्या बांधकाम कामगारांच्या नोंदी रद्द करून, त्यांना लाभ देण्याचे बंद केले पाहिजे. यातील राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे, एजंट यांच्याकडून होणारी फसवणूक व आर्थिक लुबडणूक थांबली पाहिजे. अशा अनेक मागण्यांच्यासाठी हे आमरण उपोषण सुरू होते. या आंदोलनाची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आपल्या कार्यालय येथे संघटनेबरोबर दि.४ रोजी बैठक घेऊन सविस्तर प्रत्येक मागण्यांवर चर्चा केली. या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त, मुक्ती संघर्ष समितीचे सल्लागार प्रमोद पाटील, बांधकाम कामगार संघटनेचे प्रतिनिधी महादेव कदम, बाबु चौगुले, अवधुत भुजबळ, रमेश कलगुटगी उपस्थित होते. त्या बैठकीनंतर दि. ५ रोजी संघटनेला पत्र सहाय्यक कामगार आयुक्त यांनी देऊन, आपल्या सर्व मुद्द्यांची या कार्यालयाने दखल घेतली असून जिल्हास्तरावरील व या कार्यालयीन स्तरावरील मुद्द्यांबाबत या कार्यालयामार्फत कार्यवाही करण्यात येईल व धोरणात्मक बाबींविषयी आपले पत्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या कार्यालयास पाठवण्यात आले आहे. यामुळे उपोषण मागे घ्यावे. असे लेखी पत्र देऊन आवाहन केल्यानंतर जनता दलाचे नेते बाळेश नाईक, मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत,सल्लागार प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोवार यांच्या उपस्थितीत भाई नारायण वाईंगडे यांनी आमरण उपोषण स्थगित केले.

      यावेळी बाळेश नाईक, संग्राम संग्राम सावंत, सुरेश पोवार यांची भाषणे झाली. यावेळी घोषणा देऊन आंदोलनाचा समारोप केला. आभार महादेव कदम यांनी व्यक्त केले. यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

तालुकास्तरीय शासकीय शालेय १४ वयोगटातील खो- खो, क्रीडा स्पर्धेत ‘ व्यंकटराव ‘चे यश

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      नुकत्याच पार पडलेल्या आजरा तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये यामध्ये व्यंकटराव हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने व मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला .

      सहभागी खेळाडू (मुले संघ) –

आर्यन संदीप केसरकर कप्तान , वेदांत जितेंद्र नांदवडे , पार्थ महेंद्र देसाई, सार्थ संदीप वेंगुळकर , साद शफीउल्ला मुल्ला , मोहम्मद रहीम मुल्ला , नौमान इकबाल मुल्ला , सक्षम वसंत पाटील उमेर इसाक शेख , निरंजन सर्जेराव कांबळे , अब्बास शेख कबीर जुबेर मुल्ला , साकीब समीर पठाण , उमेर जावेद काकतीकर , उजेर फारूख पाथरवट.

( मुलीं संघ )-

प्रणाली दयानंद परीट कप्तान , साक्षी बीर बहादूर ठकुल्ला , तृप्ती पांडूरंग नवार , स्मीता उदयासिंह देसाई , आर्या अंकुश पाटील , इकरा फारूख पाथरवट , आर्चना सागर इलगे, सानवी लक्ष्मण सोले , प्रतीक्षा नागेश पाटील , गौरी विजय देसाई , अंकिता संदीप देसाई , सृष्टी भिकाजी हसबे , माऊली चंद्रकांत पाटील.

       या सर्व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री. आर.जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले. व क्रीडा शिक्षक श्री. सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात ‘श्यामची आई” पुस्तकाचे वाचन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे क्रमशः वाचनाचा उपक्रम मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये नुकताच सुरू केला.

      विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, सुस्पष्ट व आरोह-अवरोहासह आणि आकलनासह वाचन व्हावे, वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दररोज परिपाठादरम्यान दहा-पंधरा मिनिटांचे क्रमशः वाचन संपन्न होत आहे .

      या उपक्रमाचा लाभ पहिली ते चौथीचे सुमारे १६० विद्यार्थी घेत आहेत. या उपक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहा पाटील यांच्यासह सर्व सदस्य आणि प्रेमा साठे, विजयालक्ष्मी देसाई, उत्तम नातलेकर, संयोगिता सुतार, राजाराम गाडीवड्ड, संतोषी कुंभार या शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.

 दुर्गामाता दर्शन


                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त...

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शेतकऱ्याच्या सोळा बकऱ्यांवर अज्ञातांनी मारला डल्ला… सुळे येथील प्रकार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ. दीपक सातोसकर यांचा वाढदिवस उत्साहात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!