mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


महीला प्रवाशाच्या साडेपाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

खाजगी प्रवासी बसमधील प्रकार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मुंबई ते आजरा खाजगी प्रवासी बसमधून प्रवासादरम्यान देवर्डे ता.आजरा येथील सौ. शितल दिलीप पाटील या महिलेचे ५ लाख ३१ हजारांचे दागिने व ५ हजारांची रोकड  चोरट्यांनी लंपास केली . याबाबतची फिर्याद पाटील यांनी आजरा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे खाजगी प्रवासी बसमधील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व साहित्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रवासी वर्गात खळबळ उडाली आहे.

      याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, रक्षाबंधनासाठी गेलेल्या सौ.पाटील या पतीसह दि . २५ रोजी लोअर परेल, मुंबई येथून रक्षाबंधन आटोपून स्वामी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतूक कंपनीच्या ट्रॅव्हल्सने आजरा येथे येण्यासाठी निघाल्या . दि . २६ रोजी सकाळी ७ .३० वाजता त्या आजरा येथे पोहोचल्यानंतर त्यांना आपल्या पर्समधील ५ तोळयाचे गंठण व दीड तोळ्याचा नेकलेस , एक तोळे वजनाची सोन्याची चेन असे ५ लाख ३१ हजारांचे दागिने व ५ हजारांची रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले . त्यांनी याबाबत आजरा पोलीसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

       सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पुढील तपास करीत आहेत .

खाजगी बसमध्ये छोट्या-मोठ्या चोरांचा सुळसुळाट

      खाजगी प्रवासी बसमधील प्रवाशांच्या साहित्याची चोरी होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. पण इतक्या मोठ्या प्रमाणावरील चोरी होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाने यापुढे खाजगी प्रवासी बसमधून प्रवास करताना काळजी घेण्याची गरज आहे.

सायरन वाजला…
चोरटे पळाले
महागाव येथे जनता बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जनता सहकारी बँक, आजराचे महागाव ता. गडहिंग्लज शाखा इमारती नजीक असणारे एटीएम मशीन गॅस कटरने तोडून त्यातील पैसे चोरट्यांकडून पळवण्याचा प्रयत्न सुरू असताना सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला व एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.

     रविवार दिनांक २५ रोजी रात्री सदर घटना घडली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत बसवंत कांबळे रा. महागाव यांनी पोलिसांत दिली आहे.

टोल’मुक्ती च्या पार्श्वभूमीवर आज आंदोलन…

पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना नोटीसा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

   आज बुधवार दि २८ रोजी संकेश्वर – बांदा महामार्गावर आज-यानजीक होणाऱ्या टोलला विरोध दर्शवण्यासाठी टोल नाक्यावरच रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची गेले पंधरा दिवस तयारी सुरू असून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार टोल मुक्त मुक्ती संघर्ष समितीने केला आहे.

       यावेळी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले .

      दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने जमावबंदी कलमांतर्गत प्रमुख २४ आंदोलकांना नोटीस बजावली आहे. तरीही आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

जय्यत तयारी…

         आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी डिजिटल बॅनर लावण्यासह गावागावांमध्ये बैठकाही पार पडल्या आहेत. टोलनाक्याला विरोधाचे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही केले आहेत. या आजच्या आंदोलनाची जय्यत तयारी टोलमुक्ती संघर्ष समितीने केली आहे.

आजऱ्यात पाऊस सुरूच


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यात पावसाची संततधार सुरुच असून हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे गेल्या चार दिवसात तालुक्यातील सुमारे २२ घरांची पडझड झाली आहे.नदीचे पाणी पात्रा बाहेर आले आहे. साळगाव बंधारा अद्यापही पाण्याखाली आहे.

तालुक्यात चोवीस तासात ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राजकीय आकसापोटीच आरोप…

निंगुडगे सरपंच कृष्णा कुंभार यांचे प्रत्युत्तर 

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     निंगुडगे गावातील विकास कामांचा धडका पाहून माजी सरपंच सरदेसाई यांना पोटशूळ उठला आहे. सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून ते राजकीय आकसापोटी खोटे आरोप करीत असल्याचा पलटवार निंगुडगेचे सरपंच कृष्णा कुंभार यांनी पत्रकार बैठकीतून केला. ते सरपंच असताना त्यांच्या मागणीवरूनच आपण शाळेला एक खोली बांधून दिली आहे. असे असताना शाळेची जागा हडप करण्याचा प्रश्न येतोच कोठे असा सवालही कुंभार यांनी उपस्थित केला.

       गेली साडेतीन वर्षे सरपंच म्हणून काम पाहत असून उपसरपंच तसेच सर्व सदस्य व सहकाऱ्यांच्या सहकार्यातून गावात विविध विकास कामे केली आहेत. आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून तब्बल तीन कोटींचा विकास निधी गावात आणला आहे. शासनाच्या विविध योजनाही प्रभावीपणे राबविल्यामुळे आपले राजकीय अस्तित्व संपते की काय अशी मिती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळेच ते व त्यांचे बगलबच्चे खोटे आरोप करून केवळ आम्हाला बदनाम करण्याचा प – यत्न करीत असल्याचा आरोप कुंभार यांनी केला.

      निंगुडगे प्राथमिक शाळा व गायरान गट नंबर ७३७ या गटांच्या मध्ये ७६८ गट नंबर आहे. या गटात ७/१२ पत्रकी आपली ३३ गुंठे जमीन नोंद आहे. या जागेत आपण गेली ४० वर्षे वीटभट्टी व्यवसाय करीत आहेत. माजी सरपंच रमेश गंधवाले व सरदेसाई यांनी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत असताना मारून दिलेल्या चरीच्या बाहेर एक इंचही आपण सरकलेलो नाही. त्यामुळे शाळेची जागा हडप करण्याचा त्यांनी केलेला आरोप निखालस खोटा असल्याचे कुंभार यांनी सांगितले.

      जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ८ ऑगस्ट रोजी शाळेच्या जागेची मोजणी करण्यात आली आहे. यावरही विरोधी मंडळींचा विश्वास नाही. ७६८ गट नंबर मधील मालकांकडून बक्षिसपत्राने जागा घेऊन शाळेच्या नावे करण्यासाठी चर्चा केली होती. मात्र तत्कालीन सरपंच सरदेसाई यांनी याकडे दुर्लक्ष केले. उलटपक्षी या जागेत प्लॉट पाडून पैसे उखळण्याचा त्यांचा डाव आम्ही ग्रामस्थांच्या सहाय्याने उधळून लावला याचाही राग त्यांच्या मनात आहे.

       ग्रामपंचायत सदस्य अमृत गोपाळ देसाई यांना सामाजिक कार्यापेक्षा तक्रारी करण्यात स्वारस्य असल्याचा आरोप आप्पासाहेब सरदेसाई यांनी केला. त्यांनी तत्कालीन सरपंच सरदेसाई यांच्यावर गायरान निलगिरी प्रकरणी तक्रार केली होती. गावातील तलावांची कामे नियमाप्रमाणे जलसंधारण विभागाकडून सुरू आहेत. सरपंच कुंभार यांनी गावात चांगली कामे केली आहेत. शाळेची जागा हडप करणार नाहीत असा विश्वाह उपसरपंच प्रमोद देसाई, सदस्या वंदना देसाई, उर्मिला सरदेसाई, नंदिनी सरदेसाई, शितल चौगुले, संगीता गंधवाले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

      या पत्रकार बैठकीवेळी अनिल वसंतराव सरदेसाई, आनंदा गंधवाले, आप्पासाहेब सरदेसाई, विशाल सरदेसाई, तानाजी पाटणे,माजी उपसरपंच दिनकर मगदूम, युवराज देसाई आदि उपस्थित होते.

निधन वार्ता 

समीर नाईक

      आजरा येथील विद्यानगर परिसरात राहणारे समीर आनंदा नाईक (वय ४४ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

     त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अपघातात युवक ठार

mrityunjay mahanews

विनापरवाना बांधकामांची माहिती तातडीने सभागृहास सादर करा ….आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांनी  बांधकाम विभागाला विभागाला धरले धारेवर… जनता बँक उत्तूर विभागासाठी विकासगंगा बनेल : के. पी. पाटील यांचे प्रतिपादन : जनता बँक आजराच्या उत्तूर शाखेचे उद्घाटन…. दुध उत्पादनात वाढ करण्यासाठी आधुनिकतेची जोड द्यावी:अंजनाताई रेडेकर….आज-यातील दहीहंडीवर ‘संघर्ष’ ने कोरले नाव … डाॅ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्याचा शोध घेण्याची मागणी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!