

या चोरट्यांचं करायचं तरी काय…?
शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांचा उत्छाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातसह ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून बंद घरांना केले जाणारे टार्गेट डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे ठिकठिकाणी झालेल्या चोऱ्या व घरफोड्यांप्रकरणी कोणाही संशयिताला अद्याप अटक झालेली अथवा ताब्यात घेतलेले दिसत नाही. याचाच अर्थ या गुन्हेगारांचा छडा लावण्यात पोलीस दलावर मर्यादा येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकांचा फड रंगाला असतानाच चोरट्यांनी आजरा शहरासह ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. भुरट्या चोऱ्या व घरपोळ्यांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. अगदी तांब्या पितळेच्या भांड्यांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यापर्यंतच्या चो-या होताना दिसतात.
पोलिसी चौकशीचे लचांड मागे नको म्हणून अनेक छोट्या चो-यांबद्दल पोलिसांकडे दाद मागितली जात नाही हे वास्तव आहे.उन्हाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या चाकरमान्यांची घरे लक्ष्य बनवली जात आहेत. तालुक्याची एकूण लोकसंख्या, गावांची संख्या याच्याशी पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येशी तुलना करता पोलीस दलाला गस्तीसारखे उपक्रम राबवताना अनेक मर्यादा येताना दिसतात. एकंदर तालुक्यामध्ये चो-यांचे प्रमाण वाढले आहे हे निश्चित.
सीसीटीव्ही कॅमे-यांना पर्याय नाही…
चो-यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व्यापारी वर्गासह ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही सारखी यंत्रणा प्रभावीपणे वापरात आणणे गरजेचे आहे. सध्या तरी चोऱ्यांवर थोडाफार आळा घालण्याकरता सीसीटीव्ही यंत्रणेशिवाय पर्याय नाही असेच चित्र आहे.


आक्काताईला मिळाला निवारा
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आक्काताई रामू कदम रा. हांदेवाडी या निराधार महिलेला कोणी जवळचे नातेवाईक नसल्याने ती एकटीच रहात होती. शेजापाजारी जे काही आणून देतील ते खाणे व शेडमध्ये राहणे अशी अवस्था. शेडमध्ये वारंवार पावसाचे पाणी जाते. शिवाय शेडला लागून असलेली भिंत पक्की नसल्याने भिंतीला तडे गेलेले आहेत त्यामुळे ती केंव्हाही पडण्याची शक्यता नाकारता
आजरा येथील सामाजिक कार्यकर्त्या गीता पोतदार यांनी ही परिस्थिती प्रत्यक्ष जाऊन पाहिली. शेजाऱ्यांशी चर्चा करून सर्व माहिती मिळवली. ‘एकटी’ संस्था कोल्हापूर येथे अशा एकटे राहणाऱ्या महिलांना राहण्याची सोय केली जाते अशी माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांना संस्थेच्या प्रमुखांशी संपर्क साधून संस्थेत प्रवेश मिळवून दिला. अन्न व निवाऱ्याची सोय झाल्यामुळे आक्काताई यांच्या जगण्याला बळ मिळाले आहे.
अनुराधा भोसले यांच्या या संस्थेत तिला मोफत निवारा दिला. सामाजिक कार्यकर्त्या गीता पोतदार यांच्या बरोबरच संवेदना फाउंडेशन चे गिरधर रेडेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
जनता बँकेच्या कळंबा शाखेचे आज उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील जनता सहकारी बँकेच्या कळंबा शाखेचे उद्घाटन आज रविवार दिनांक २ जून रोजी होत असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई व संचालक मंडळाने दिली..
सर्वसामान्यांची बँक अशी ओळख असणाऱ्या या बँकेकडे दि. ३१ मार्च २०२४ अखेर रू. ३५६५४.१२ लाखांच्या ठेवी, रू. २३१०४.७२ लाख कर्जवाटप, रू. १५६५.५२ लाख भागभांडवल, रू. १५२६९.७१ लाख गुंतवणूक व ०% नेट एनपीए अशी आर्थिक स्थिती आहे. रिझर्व बँकेचे FSWM च्या शर्ती पूर्ण करून रिझर्व बँकेच्या सर्व कसोट्यावर पात्र ठरली आहे. ग्रामिण अर्थव्यवस्थेचा कणा असणारी जनता सहकारी बँक आपल्या सेवेत कळंबा (कोल्हापूर) येथे १९ वी शाखा सुरू होत आहे .
सदर समारंभास सर्व सभासद ठेवीदार ग्राहक व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन हे देसाई यांनी केले आहे. दुपारी चार ते सात वाजेपर्यंत सदर कार्यक्रम होणार आहे.




