

सुस्त नगरपंचायत…
वाद व्यावसायिकांचा…
हस्तक्षेप पोलिसांचा…

आजरा:प्रतिनिधी
आजरा बस स्थानकाच्या समोरून जाणाऱ्या रस्त्या शेजारील परिसरात छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची असणारी दुकाने व खोकी ही नागरपंचायतीच्या दृष्टीने केवळ कर आकारण्याची साधने असून अलीकडे राष्ट्रीय महामार्गाचे गटर्सचे काम पूर्ण झाल्यानंतर खोकी घालण्यावरून होणारे वाद हे पोलीस खात्याच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. वाद व्यावसायिकांचे… कर नगरपंचायतीला… आणि डोकेदुखी पोलीस प्रशासनाची असाच काहीसा प्रकार दिसत आहे.
गेले चार महिने आजरा बस स्थानक परिसरातील गटर्स व रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू आहे. लेंड ओहोळच्या पुढील बाजूस असणाऱ्या व्यावसायिकांना या कामाचा बराच त्रास सहन करावा लागत आहे.नाल्यापलीकडे खाजगी जमिनी असल्याने या जमीन मालकांकडून नाल्या शेजारी व समोरील बाजूस असणाऱ्या खोकीधारकांना हटवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. हा वाद सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते.
गटर्सचे कामाकरता हलवण्यात आलेली खोकी काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एक वेळ मूळ जागी बसवण्याचा प्रयत्न संबंधित व्यावसायिकांकडून केले जात आहेत, तर याला मागच्या बाजूस असणाऱ्या दुकानदार व जागा मालकांकडून आक्षेप घेतला जात आहे. काल शनिवारी ही याबाबत जोरदार वाद झाला. यामुळे नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद तात्पुरता थांबवला आहे. परंतु पुन्हा केंव्हाही हे वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोण बरोबर, कोण चूक हा प्रश्न बाजूला ठेवला तर नगरपंचायत कर आकारणीपुरतीच आहे का ? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन हस्तक्षेप करीत असले तरी नगरपंचायतीची कांही जबाबदारी नाही का? असा सवालही आता उपस्थित होत आहे.


सर्फनाला धरणाचे काम बंद पाडणार…
सर्फनाला धरणग्रस्तांच्या मेळाव्यात निर्णय

आजरा: प्रतिनिधी
सर्फनाला धरणाचे काम पूर्णत्वाकडे आले असून पुनर्वसनाचे काम मात्र अजूनही रखडले आहे. यावर्षी धरणात पाणी तुंबविले जाणार असून घळभरणीचं काम सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणे आवश्यक होती पण ती बैठक जिल्हाधिकारी यांनी घेतलेली नाही. त्यामुळे नवीन आलेले जिल्हाधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची प्रकल्पग्रस्तांसह बैठक घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याची खात्री जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत धरणाचे काम बंद पाडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी ६ तारखेला पारपोली, गावठाण आणि खेडगे गावातील स्त्री-पुरुष मोर्चाने जाऊन धरणाचे काम बंद पाडतील असा निर्णय केला आहे.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, अशोक मालव, प्रकाश शेटगे, प्रकाश कविटकर, संतोष पाटील, शंकर ढोकरे, गोविंद पाटील, श्रावण पवार यांच्यासह स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रोजरी माऊली यात्रा उत्साहात सुरू..

आजरा: प्रतिनिधी
आजरा येथील रोजरी माऊली चर्च यात्रा उत्साहात सुरू झाली असून काल शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम व प्रार्थना पार पडली.
फादर रिचर्ड सालडान्हा हे मुख्य प्रार्थना समर्पित करण्यात आली. प्रार्थनेनंतर ख्रिश्चन बांधवांची चर्च गल्लीतून फेरी काढण्यात आली. यामध्ये फादर जो.मंतेरो व मुख्य धर्मगुरूंसह ख्रिश्चन स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर रोजरी चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध प्रकारचे खेळण्यांची व मिठाईची दुकाने मांडण्यात आली आहेत. यात्रेसाठी कोकण,कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील प्रमुख भागातील ख्रिश्चन बांधव आजरा शहरात दाखल झाले असून आज रविवार व उद्या सोमवारपर्यंत अशी यात्रा सुरू राहणार आहे आहे.


कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे…स.पो.नि.
नागेश यमगर

आजरा:प्रतिनिधी
निसर्गरम्य अशी ओळख आणि सांस्कृतिक, साहित्यिक वारसा असणाऱ्या आजरा तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तालुकावासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन आजरा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केले. आजरा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी यमगर म्हणाले, सध्या तरुणांच्या उत्साहावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पालकांनी तरुणाईवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.
तालुक्यामध्ये असणाऱ्या शांतता कमिट्या, तंटामुक्त कमिट्या, मोहल्ला कमिट्या यांना सक्रिय करून तालुका शांत राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
शहरामध्ये अथवा तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व संशयास्पद अशा घटना घडत असतील तर तातडीने नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
सोशल मीडियावर विशेष लक्ष…
सोशल मीडियाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बरेच बाद उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यामध्ये सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. कोणताही धार्मिक व सामाजिक वाद किंवा बदनामी करणारे वादग्रस्त मजकूर प्रसारित होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन यमगर यांनी केले.


पुरस्कार…
सौ.भारती डेळेकर

राजर्षी शाहू प्रतिष्ठान पुणे चा २०२४ करिता असणारा राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार सोहाळे तालुका आजरा येथील सरपंच सौ. भारती कृष्णा डेळेकर यांना जाहीर झाला आहे.
सरपंच म्हणून डेळेकर यांचे काम निश्चितच आदर्शवत आहे. लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाल्यानंतर शासनाकडून मिळणारे मानधन स्वतः करता न वापरता त्यांनी गावच्या विकास कामाकरिता वापरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलातही आणला. सौ.डेळेकर यांनी गावामध्ये विविध शासकीय योजना राबवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.


निधन वार्ता…
राणूबाई पावले

मसोली ता. आजरा येथील राणूबाई कृष्णा पावले यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पक्षात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली,सून, जावई, नातवंडे यासह मोठा परिवार आहे, व्यंकटराव हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक आप्पा पावले यांच्या त्या मातोश्री होत.
रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ५ रोजी मसोली येथे आहे.





