
प्रकल्पग्रस्तांना घर बांधणीसाठी १ लाख ६५ हजार रु. देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
श्रमिक मुक्ती दलाच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश…

आजरा: प्रतिनिधी
श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने केलेल्या लढ्याला अखेर यश आले असून प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे घरबांधणी अनुदान म्हणून १,६५,००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. यबोबरच राहत्या गावापासून विस्थापित ठिकाणापर्यंत संसार उपयोगी साहित्य हलविण्यासाठी प्रति कुटुंब रुपये पन्नास हजार, ज्या कुटुंबाची गुरे आहेत त्यांना गोठा बांधण्यासाठी रुपये पन्नास हजार, कारागीर कुटुंबाना त्यांचा नव्या गावी व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार आणि दुकानासाठी पन्नास हजार अशी रक्कम देण्याचा जीआर काढण्यात आला आहे.
विकसनशील पुनर्वसनाचा मुद्दा घेऊन गेली अनेक वर्षे श्रमिक मुक्ती दलाने हे विषय लावून धरले होते.
भूसंपादन व पुनर्स्थापना अधिनियम २०१३ मधील नियमाच्या आधारे हे शासन निर्णय करावेत अशी मागणी श्रमुदने गेली अनेक वर्षे लावून धरली होती. त्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिय्या आंदोलने, लॉंग मार्च, परिषदा मोर्चे श्रमुदने संघटित केले होते. याची दखल घेत २०१४ पूर्वी मान्यता मिळालेल्या सर्व धरण प्रकल्पांना हे निर्णय लागू होणार आहेत. अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी दिली.


माद्याळ येथे साडे दोन एकरातील ऊस व काजू जळून खाक

आजरा : प्रतिनिधी
देवर्डे पैकी माद्याळ (ता. आजरा) येथे शाँर्ट सर्किटने लागलेल्या आगीत साडेतीन एकर क्षेत्रावरील काजू व ऊस जळून खाक झाला.शिवाजी रामचंद्र शेळके या शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती मेढेवाडी गावाजवळ रांगी नावाचे शेळके यांचे शेत आहे. दुपारी साडे बाराच्या सुमाराला आग लागली. प्रसंगावधान साधून आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शार्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.
या शेतातील दोन एकर क्षेत्रावर त्यानी ऊसाची व एक एकरावर काजू लागवड केली होती. या शेता लगत विद्युत वाहीनी गेली आहे.
ऊसाला आग लागल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी सांगितले.नागरिकांनी पाणी व झांडाचे डहाळे वापरून आग विझवली.


शासकीय योजनांचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा :
प्रातांधिकारी वसुंधरा बारवेआजऱ्यात तालुकास्तरीय कर्ज मार्गदर्शन मेळावा

आजरा: प्रतिनिधी
देशामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या एकूण सुशिक्षित लोकांपैकी ४४ टक्के लोक बेरोजगार आहेत. मोबाईलच्या मायाजाळात गुरफटलेल्या तरुणाईला बेरोजगारीचे भान राहीलेले नाही. तरुणाईने मोबाईलमधून बाहेर पडून उद्योग व व्यवसायांकडे वळावे. शासनाने बेरोजगार तस्णांच्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आजरा- भूदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले.
आजरा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नव उदयोजकांसाठी आयोजीत कर्ज व व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात प्रांताधिकारी श्रीमती बारवे बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते. यावेळी विविध विभागाचे मांडलेल्या स्टालचे उद्घाटन तहसीलदार माने यांच्या हस्ते झाले. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली,
श्रीमती बारवे म्हणाल्या, बाजारपेठेचे अभ्यास करून उद्योजकांनी उत्पादन तयार करावीत. आपण बेरोजगार आहोत याचे भान मोबाईलमुळे होत नाही. वेळीच भानावर येवून उद्योग व व्यवसायाकडे वळावे. तहसीलदार माने म्हणाले, अनेक जण उद्योग करू इच्छितात पण त्यांना योग्य माहीती मिळू शकत नाही. त्यामुळे योजनांची प्रसिध्दी व प्रचार होवून त्या योजनांची माहीती सर्वसामान्या पर्यंत पोहचवण्यासाठी मेळावा होत आहे. उपस्थितांनी योजना समजून घ्याव्यात.
उपविभागीय कृषी अधिकारी विनायक देशमुख म्हणाले, एकाच पिकाच्या मागे न लागता किमान आपल्या कुटुंबाला पुरतील इतकी भरड व कडधान्य उत्पादीत करावीत. आत्मा अंतर्गत गट तयार करण्याची सुविधा आहे. उत्पादित मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत आणल्यास निश्चितच फायदा नवउद्योजकांना होईल. सामाजिक कल्याण कार्यालय कोल्हापूरच्या समन्वयक रेखा डवर, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वाटप केले. या वेळी विविध आर्थिक विकास महामंडळ, मत्स्य दुग्धविकास, खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक यांचे स्टॉल लावले होते.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसूल नायब तहसीलदार विकास कोलते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक विकास कुलकणीं, बैंक आफ इंडिया शाखा उत्तूरचे व्यवस्थापक चंद्रकांत त्रिभुवणे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नवउद्योजक व महीला बचतगट प्रतिनिधी उपस्थित होते.


आनंदामध्ये चुका शोधू नका, चूकांमध्ये आनंद शोधा: डॉ. संजय कळमकर

आजरा: प्रतिनिधी
विज्ञान प्रगत होतेय, आभासी जगात सर्व मग्न होत आहोत. पण संवेदनशून्यता वाढते आहे. आभासी जगात किती रमायचं बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या दुःखाला भेटूच शकत नाही, त्याचे दुःख बाळगण्याची सवय जडते आहे. आभासी जगात रमण्याचा हा परिणाम बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण प्रणालीतून क्षमता विकसित करण्याचे आवाहन अहमदनगर येथील ‘हसायदान’फेम वक्ते आणि कथाकथनकार डॉ संजय कळमकर यांनी आजरा येथे केले.
येथील आजरा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलासराव नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी वर्षभरात शिक्षण, कला, सांस्कृतिक, क्रीडा, एनएसएस, एनसीसी आदी क्षेत्रात यशस्वीतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ. कळमकर म्हणाले, आज स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती असताना त्यामागील विचार विसरू नयेत. स्वामी विवेकानंदांनी युवकांना सक्षम होण्याचे आवाहन केले होते, तर जिजाऊंनी छत्रपती शिवबांना घडवले. ही आईच्या संस्कारांची फलश्रुती होती. यामुळे जगात खरेतर सर्वात सुंदर फक्त आईच असते. पण हल्लीची पिढी तिलाच विसरत चालली आहे. पण तिचे संस्कार विसरू नका. जिजाऊंच्या संस्कारातून घडलेल्या शिवबासारखे समर्थ व्हा. मिळालेली संधी आणि आलेल्या संकटातून क्षमता विकसित करा. क्षमतेतून भविष्य घडवा. त्यासाठी घेतलेल्या आदर्शांचा इतिहासही तपासा. याचे शहाणपण शिक्षणातूनच मिळते. त्यावर विश्वास ठेवा. असे मौलिक आवाहन अत्यंत खुमासदार रीतीने विनोदाची पेरणी करीत त्यांनी युवकांना केले.
स्वागत व पाहुण्यांचा परिचय स्नेहसंमेलन प्रमुख प्रा मनोज देसाई यांनी करून दिला. प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी सविस्तर प्रास्ताविकात हेतू स्पष्ट केला. पारीतोषिक वाचन डॉ. अशोक बाचुळकर यांनी केले. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा. विनायक चव्हाण यांनी केले. यावेळी डॉ.अनिल देशपांडे, डॉ. दीपक सतोसकर, के. व्ही. येसणे, माजी उपनगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील आदींसह सल्लागार व मान्यवर उपस्थित होते. आभार डॉ अविनाश वर्धन यांनी मानले.


पंडित दीनदयाळ विद्यालयात आज वार्षिक पारितोषिक वितरण

आजरा : प्रतिनिधी
पंडित दीनदयाळ विद्यालयात आज शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा सकाळी ठीक १०.३० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.त्याचबरोबर माजी विद्यार्थी स्नेहमेळावा हा दुपारी १२.३० वा. संस्थेचे अध्यक्ष ,सचिव, पदाधिकारी, शिक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे.उद्या रविवार दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे.


संक्षिप्त…

मराठा महासंघाच्या वतीने आजरा येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. सुधीर मुंज यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी माहिती दिली.

भोवताल...

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सहकार्याने गडहिंग्लजचे पंचायत समिती उपसभापती विद्याधर गुरबे यांनी अर्जुनवाडी गावाकरीता आणलेल्या विविध निधीतील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.



