

जळालेल्या उसात महीलेचा मृतदेह

आजरा : प्रतिनिधी
भादवण ता.आजरा येथे जळालेल्या ऊसाच्या शेतात आशाताई मारुती खुळे (वय ४३ रा.भादवण ) या महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
भादवण व भादवणवाडी रस्त्यावर दीपक खुळे, आनंदा देवरकर यांची ऊसाचे शेत आहे. गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान उसाला आग लागली.ती विझविण्यासाठी ग्रामस्थ गेले असता त्या ऊसात आशाताई खुळे या स्थानिक महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. सदरचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक व पोलीस घटनास्थळी हजर झाले.
संबंधित महिलेला काल दुपारी चार वाजेपर्यंत ग्रामस्थांनी गावामध्ये पाहिले होते त्यानंतर मात्र ती आढळून आली नाही. उसाला लागलेल्या आगीत महिलेचा मृतदेह झाला असल्याचे वर्दीत म्हटले आहे.
रात्री उशिरापर्यंत पोलीस भादवण येते घटनेची माहिती घेत होते. काशिनाथ नारायण खुळे यांनी याबाबतची वर्दी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहे त.


दिवसावर चार्जेस…
रेंजची बोंब

आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुक्यामध्ये सर्वच मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कची बोंब सुरू असून नेटवर्क गायब होणे, कॉल ड्रॉप होणे, कॉल न लागणे असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे मोबाईल धारकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मोबाईल धारकांची तालुक्यात संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे यापूर्वी उभा करण्यात आलेले मोबाईल टॉवर मधून असणारी क्षमता व मोबाईल धारकांची संख्या यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने हा प्रकार घडत असलेले जाणकारांकडून सांगितले जाते.
सर्वच मोबाईल कंपन्यांची हीच स्थिती असल्याने ग्राहकांना एकमेकाशी संपर्क साधण्याबरोबरच ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. दिवसावर चार्जेस आकारणी केल्या जाणाऱ्या मोबाईल कंपन्यांकडून दिवसभर जर रेंजच उपलब्ध करून दिली जात नसेल तर कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.


गायरान जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्यास विरोध

आजरा: प्रतिनिधी
चितळे(या.आजरा) येथील गायरान जमीन प्रकल्पग्रस्त देण्यासाठी विरोध दर्शवला. चितळे येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जमीन ताबा पट्टी देण्यास विरोध केला.
सदर जमिन गावालगत असून ही जमिनी गावच्या विस्तारासाठी गावठाण वाढ व सार्वजनिक प्रयोजनार्थ ठेवावी ही स्थानिक ग्रामस्थांची भूमिका आहे.मौजे चितळे येथे आणखी एक गट ६३ नंबर संपादित केला असून त्या ठिकाणी दहा एकर जमीन उपलब्ध आहे. ही जमीन या प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी कोणताही विरोध नसल्याचे सदर आंदोलनातील कार्यकर्त्यांनी व लोकांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिली.
यावेळी संजय सांबरेकर, उदय सरदेसाई, मारुती गुरव, पुंडलिक सुतार, धोंडीबा मळेकर, शामराव दुर्गुडे, बाळू माफकर, आकाश सरदेसाई, दिगंबर सरदेसाई यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते.


निवडणूक न लढण्याचा निर्धार ते अध्यक्षपदापर्यंत मजल

आजरा:प्रतिनिधी
आजरा साखर कारखाना निवडणुकीत अनेक अनपेक्षित घडामोडी घडत गेल्या. निवडणूक जाहीर झाल्यावर सुरुवातीला बिनविरोधच्या हालचाली, त्यानंतर राष्ट्रवादीने निवडणूकीला सामोरे न जाण्याचा घेतलेला निर्णय, पुन्हा कार्यकर्त्यांच्या दबावामुळे घेतलेला यू टर्न त्यानंतर ताकतीने लढवलेली निवडणूक, एकतर्फी विजय मिळवून बिनविरोधच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या कांही संचालकांना व उमेदवारांना धक्कादायकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागणे अशा अनेक घटना या निवडणुकीत घडत गेल्या.
निवडणुकीचे नगारे वाजू लागले तसे ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई व माजी अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी आपण निवडणुकीला सामोरे जाणार नाही अशी भूमिका घेतली तशा हालचालीही बिनविरोधच्या दरम्यान सुरू होत्या.परंतु अचानकपणे माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने वरिष्ठांच्या आदेशामुळे या तिघांनाही निवडणूक रिंगणात उतरणे भाग पडले. इच्छा नसताना घेतलेली उमेदवारी तिघांच्याही पथ्यावर पडल्याची दिसत आहे. अध्यक्ष निवडीमध्ये या तिघांनाही संधी दिली जाणार आहे.त्यामुळे एक वेळ निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलेल्या या मंडळींना संचालक पद मिळाले आहेच परंतु त्याचबरोबर अध्यक्षपद भूषवण्याची संधीही मिळणार आहे.
नुकतीच संधी देण्यात आलेले अध्यक्ष वसंतराव धुरे व उपाध्यक्ष एम.के. देसाई ही दोघेही संस्थापक संचालक यांची मुले आहेत हेदेखील वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल.


उद्या आजरा येथे अक्षता कलश मिरवणूक

आजरा: प्रतिनिधी
श्री राम मंदिर,अयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षता कलशांची मिरवणूक ही शनिवारी दि.३० डिसेंबर,२०२३ रोजी आजरा येथे आयोजीत करण्यात आली आहे.सदर मिरवणूक ही व्यंकटराव हायस्कूल,आजरा ते श्री राम मंदिर,आजरा या मार्गावर होणार आहे.
सदर मिरवणुकित हलगी व सांस्कृतिक वाद्य तसेच अनेक भक्तीगीत हे आकर्षण असणार असून प्रामुख्याने श्री राम रथ व अनेक अक्षता कलषधारी महिला तसेच वारकरी सांप्रदाय,आज-यातील सर्व हिंदू संघटना सहभागी होणार आहेत.
दि.३० डिसेंबर २०२३ ते ते २२ जानेवारी,२०२४ या कालावधीत श्री रामलला प्रतिष्ठापणा अभियानाच्या माध्यमातून आजरा तालुक्यात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.


शेतकरी हाच खरा साखर कारखान्याचा मालक :अशोक तर्डेकर

आजरा:प्रतिनिधी
आजरा तालूका शेतकरी सहकारी साखर कारखान्याला ऊर्जीत स्वरूप देणे ही आम्हा संचालकांची जबाबदारी असून, तालुक्यातील शेतकरी व साखर कारखाना कामगार याना शाश्वत विकास देण्यासाठी पंचसूत्राचा अवलंब करून सभासदांचा विश्वस्त म्हणून कार्यरत राहणार असून, शेतकरी हाच खरा या साखर कारखान्याचा मालक आहे असे प्रतिपादन कारखान्यातील नूतन संचालक अशोक तर्डेकर यांनी केले.
मलिग्रे येथील मलिकार्जून मंदिरांत मलिग्रे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने आजरा साखर कारखाना संचालकपदी निवड झाले बद्दल, सत्कार प्रसंगी ते बोलत होते . अध्यक्ष स्थानी शंकर नेसरीकर होते.
यावेळी तर्डेकर यांनी सहकारी साखर कारखान्यात सर्वाचा प्रतिनिधी म्हणून
लक्ष घालून,शेअर्स संदर्भातील अडचणी, समजून घेवून जन जागृती करणार आहे. ऊस उत्पादकांचे प्रश्न, तसेच सभासदांना साखर वाटप . कामगारांना असणाऱ्या अडचणी व साखर कारखाना कर्जमुक्त होण्यासाठी, विरोधी बाकावरून पंचसूत्राचा वापर करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अनिरुध्द रेडेकर यांनी तर्डेकर यांनी आपल्या कौशल्याच्या सहाय्याने आजरावासीयांचे सहकारातील वैभव जपण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर नेसरीकर यांनी मलिग्रे गावाला मिळालेले प्रतिनिधित्व हे अभ्यासपूर्ण माहिती असणारे नेतृत्व आहे .या निमित्ताने जिल्ह्यातील लोकांपर्यंत मलिग्रे गावचे नेतृत्व पोहचले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्वागत व सुत्रसंचालन संजय घाटगे यांनी केले .प्रास्ताविक अशोक शिंदे यांनी केले यावेळी समिर पारदे, सरपंच सौ शारदा गुरव, सुरेश पारदे यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ, भावेश्वरी पत संस्था, रवळनाथ दुध संस्था, मलिकार्जून विकास संस्था व मुंबई मित्र मंडळ याच्यावतीने संचालक तर्डेकर याचा सत्कार करणेत आला.
यावेळी उपसरपंच सुरेखा तर्डेकर, शोभा जाधव,चेअरमन शिवाजी कागिनकर केशव बुगडे, विष्णू आसबे, पांडूरंग सावंत, दशरथ पारदे, विश्वास बुगडे, अनिल बुगडे, बावीस बार्देसकर,अनिल कागिनकर, आप्पाजी बुगडे,पोलिस पाटील मोहन सावंत, तंटा कमिटी अध्यक्ष संजय बुगडे याच्या सह सर्व संस्था चे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार मारूती इक्के यांनी मानले.





