mrityunjaymahanews
अन्य

रविवार – सातच्या बातम्या

रविवार  

दि.११ ऑक्टोबर २०२६

दुर्गा मातेच्या स्वागतासाठी आजरा नगरी सज्ज, विविध कार्यक्रमांची रेलचेल

आजरा : प्रतिनिधी

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गा मातेच्या स्वागतासाठी आजरा नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. आज घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून शहरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

आज दिवसभरात शहरातील सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या दुर्गा मातेच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी कालपासूनच मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून मंदिरे आणि मंडपांना आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली आहे.

मूर्ती आगमनानिमित्त विविध मंडळांच्या वतीने आज ढोल ताशे व पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य आगमन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुका शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

दरम्यान नवरात्र काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी, मंडप परिसरात जादा पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी देखील नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुढील नऊ दिवस आजरा शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

गांधीनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गामाता मूर्तीचे दणक्यात स्वागत

आजरा : प्रतिनिधी

आजरा येथील गांधीनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गामाता मूर्तीचे आगमन रविवारी घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात आणि दणक्यात स्वागत करण्यात आले.

यावेळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत लेझीम पथक आणि हलगीच्या तालावर नाचणारा घोडा हे विशेष आकर्षण ठरले. देवीच्या जयघोषात संपूर्ण गांधीनगर परिसर दुमदुमून गेला होता.

मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक, महिला, युवक आणि मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि देवीच्या मूर्तीचे मनमोहक रूप यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

घटस्थापनेपूर्वी मूर्तीची मिरवणूक काढण्याची गांधीनगर मंडळाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून, पुढील नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.

साळगाव येथून तरुणी बेपत्ता

आजरा : प्रतिनिधी

साळगाव ता. आजरा येथून एक १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आजरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साळगाव येथील तरुणी ही दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान मंदिरात जाऊन येते असे सांगून घरातून निघून गेली. ती परत न आल्याने तिचा आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईक व मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

याबाबत तिच्या आईने वर्दी दिली आहे. पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत.

विजयानंद गूळ कारखान्याच्या  चौथ्या गळीताचा  शुभारंभ आज

आजरा / बेलेवाडी काळम्मा : प्रतिनिधी

चिकोत्रा खोऱ्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे आणि आधी पुनर्वसन आणि मगच धरण हे सूत्र प्रत्यक्षात साकारणारे जेष्ठ नेते श्री. आनंदरावदादा पाटील यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच संकल्पनेतून उभारलेल्या आनंददादादादा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. निर्मित विजयानंद गूळ कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा आज रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता बेलेवाडी काळम्मा येथे आयोजित करण्यात आला आहे.

हा शुभारंभ सोहळा जगातील प्रथम क्रमांकाची शाळा बनविणारे ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ दत्तात्रय वारे गुरुजी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पिंपळगावच्या शाखाधिकारी नेहा सरपोतदार, महालक्ष्मी सहकारी पतसंस्था करंबळी गडहिंग्लजचे चेअरमन ॲड. विकास पाटील आणि आजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव नांदवडेकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून बेलेवाडी काळम्माच्या सरपंच कु. अबोली कांबळे, सेवानिवृत्त सीईओ जे. के. गुरव, संविधान प्रचारक संदीप बर्वे, सहकार्यवाह भारती विद्यापीठ पुणेचे प्रा. एम. एस. सगरे सर, संविधान अभ्यासक नूरखाँ पठाण, पाणी हक्क परिषद पुणेचे समन्वयक प्रा. विजय परांजपे, पंचायत राज अभ्यासक दत्ता गुरव, संविधान प्रचारक प्रा. नीलम पंडित आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे कुलगुरू अरुण अडसूळ उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी संचालक प्रा. मोहन पाटील, उपाध्यक्ष श्री. टी. एस. गडकरी, संचालक श्री. वसंतराव तारळेकर, संचालिका सौ. गीतांजली पाटील, संचालक श्री. रंगराव भोसले, संचालिका श्रीमती चंदाराणी पाटील, तज्ज्ञ संचालक श्री. विश्वासराव देसाई, तज्ज्ञ संचालक श्री. सचिन पाटील, तज्ज्ञ संचालक श्री. शा. बा. पाटील (गुरुजी), तज्ज्ञ संचालक श्री. राहुल टोपले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप पाटील आणि जनरल मॅनेजर श्री. बी. वाय. पाटील यांनी केले आहे.

व्यंकटराव येथे ‘हादगा बोळवण’ समारंभ उत्साहात संपन्न


आजरा : प्रतिनिधी

येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये हादगा बोळवण समारंभ उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमासाठी व्याख्यात्या सौ. पुष्पावती जयवंत दरेकर यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांना मंत्र मुग्ध केले. त्यांनी आधुनिक युगातील प्रसार माध्यमे, इंटरनेटचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम ,त्यातील संधी, आव्हाने, सुरक्षितता त्याचा जबाबदारीने वापर कसा करावा त्याबद्दल मार्गदर्शन केले.. उपस्थित सर्व विद्यार्थी हे आजरा तालुक्याच्या लाल मातीची दौलत आहेत, विद्यार्थ्यांनी पालकांचा आदर करावा, सद्सद्विवेक बुद्धी व कार्यकारणभाव त्याची सांगड घालावी ही अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांना मौलीक संदेश दिला.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रसार माध्यमांचा सकारात्मक वापर कसा करावा याबाबत सांगताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अलका जयवंतराव शिंपी यांनी सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज साधत आजच्या या विज्ञान युगात आपली संस्कृती जतन करून ठेवण्यासाठी असे लोकोत्सव कार्यक्रम शालेय जीवनापासूनच साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सदस्या सौ.आशा सचिन शिंपी, प्राचार्य श्री. एस.एन.पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार, शिक्षिका श्रीमती एन.ए. मोरे, सौ.एस. डी. इलगे, सौ.एस.टी.पाटील, सौ.व्ही.ए.वडवळेकर, सौ.ए.एस. गुरव, श्रीम.एम. व्ही.बिल्ले, श्रीम.एम.एम. शिप्पुरकर, एस वाय देसाई, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्रीम आर.एन पाटील, अतिथी परिचय श्रीम एस के कुंभार, व आभार सौ.ए.डी पाटील यांनी केले.

कलाशिक्षक श्री. कृष्णा दावणे यांनी मैदानावर साकारलेली भव्य हत्तीची रांगोळी कलाकृती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. या हत्तीच्या रांगोळी भोवती मुली व सर्व शिक्षिका यांनी फेर धरून सुंदर गाणी साकारली

आजरा हायस्कूलमध्ये हादगा बोळवण कार्यक्रम उत्साहात संपन्न

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये हादगा बोळवण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षा ,तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात हादगा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवर, महिला व विद्यार्थिनींच्या सहभागाने हादगा फेर घेण्यात आला.

सौ. टी. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सौ.व्ही. पी. हरेर यांनी पाहुण्यांचा परिचय करून सत्कार केला. कुमारी वेदिका विजय पोद्दार हिने हादगा परंपरेविषयी माहिती दिली. हादग्या निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या सुगम हादगा गीत गायन स्पर्धा , टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे .विजेत्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

प्रमुख पाहुण्या डॉ. गौरी भोसले यांनी ‘सोशल मीडिया आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. सौ. एस. डी. भालेराव यांनी हादगा व भोंडल्याच्या परंपरेची माहिती दिली. अध्यक्षस्थानी सौ. शितल कुरुणकर होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजेत्या स्पर्धकांनी हादगा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एम.एस.शेलार यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.एम.एस.कांबळे यांनी केले.

भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळाकडून कार्यक्रमांची रेलचेल

आजरा : प्रतिनिधी

सालाबाद प्रमाणे यावर्षीही भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने भगवा रक्षक नवरात्र उत्सव आजरा येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यंदाचे हे ३० वे वर्ष असून या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाची सुरुवात आज रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दुर्गा मातेचा भव्य शाही प्रथम दर्शन सोहळा व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाने होणार आहे. हा सोहळा सोमवार पेठ, आजरा येथे होईल.

सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. रास दांडिया, मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्यामार्फत दुर्गा सप्तशती पाठ सेवा आणि रात्री ९.३० वा. विश्वास पाटील कौलवकर यांचा हिप्नॉटिझम कार्यक्रम होईल.

बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वा. समर्थ भजनी मंडळ यांचे भजन व सुगम गायन (संतोष सुतार गडहिंग्लज) आणि रात्री ९.३० वा. फनी गेम्स, गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिर, सायं. ६ वा. रवळनाथ भजनी मंडळ आजरा यांचे भजन आणि रात्री ९.३० वा. आई तुळजाभवानी मालिकेतील सूर्य देव भूमिका साकारणारे निवेदक अभिनेता ऋतुराज पाटील यांचा महिलांसाठी होम मिनिस्टर हा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती श्री दुर्गामाता देवीसाठी नवचंडी याग, दुपारी १२ वा. कुंकुमार्चन, सायं. ४ वा. महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आणि सायं. ७.३० वा. महाआरती होईल. शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. सत्यांबा पूजा, दुपारी १२ वा. महाप्रसाद आणि रात्री ९.३० वा. मनोरंजनात्मक गायन स्पर्धा (कराओके) होईल.

रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. स्थानिक कलाकारांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा, सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुप्रसिद्ध शाहीर पृथ्वीराज माळी व हर्षराज माळी यांचा लोक कलेचे शिलेदार हा भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम होईल. मंगळवार दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. दसरा महोत्सव व दुर्गा मातेची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांचा आनंद सर्वांनी घेऊन मंडळाला उपकृत करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मा. संजय (भाऊ) सावंत, अध्यक्ष श्री. रवि तळेवाडीकर, उपाध्यक्ष श्री. सिद्धेश नाईक आणि भगवा रक्षक तरुण मंडळ, आजरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ११ ऑक्टोबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : प्रथम तिथी (रात्री ०९.३० पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (रात्री १०.३२ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : वैधृति योग (रात्री ०९.०५ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : किंस्तुघना करण (सकाळी ०९.२१ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : कन्या राशी (सकाळी १०.०३ पर्यंत) त्यानंतर तुळ राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०४.४९ ते सायंकाळी ०६.१८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०२ ते दुपारी १२.४९
सूर्योदय : सकाळी ०६.३३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

बुधवार सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोळगाव येथील तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!