मंगळवार दि.२९ सप्टेंबर २०२६

गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरातील गांधीनगर येथे एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
उर्मिता संजय साळुंखे, रा. गांधीनगर, आजरा असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२८ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, उर्मिता यांनी आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणाने साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. ही माहिती त्यांचे भाऊ अमित तानाजी गोसावी, वय ३२, रा. शिंदे नगर, निपाणी यांनी आजरा पोलिस ठाण्यात दिली.
या घटनेची नोंद आजरा पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साजिद शिकलगार करीत आहेत.

जनता सहकारी गृहतारण संस्थेची रौप्यमहोत्सवी वार्षिक सभा खेळीमेळीत :११% लाभांश

आजरा : प्रतिनिधी
येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ६४ लाख ७५ हजार ४५० रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात आल्याचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून पुणे व कागल येथे नवीन शाखा विस्तार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा, पदोन्नती, सेवानिवृत्ती झालेल्यांचा व जिल्हा परिषदेचा सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चौथी, ७वी शिष्यवृत्ती, १० वी, १२ वी, पदवीधर अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव चिन्ह देऊन सत्कार केला.
संस्थेने ४६ हजार ठेवीदार व हितचिंतकांकडून १३२ कोटींच्या ठेवी जमा केल्या आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षात सभासदांना ३ हजार रुपयांची भेटवस्तू व ५०० रुपयांचा बोनस शेअर दिला आहे. आजपर्यंत शंभर रुपयाच्या शेअर्सला एक हजार रुपयाचा बोनस शेअर देणारी ही पहिलीच संस्था आहे. सहकारातील एक अग्रगण्य संस्था म्हणून वाटचाल सुरु असल्याचे अध्यक्ष मोरे यांनी सांगितले.
संस्थेला सहकारी भारती कोल्हापूर उत्कृष्ट संस्था व आयएसओ मानांकन ९००१:२०१५ प्राप्त झाले आहे. आपली संस्था स्व-भांडवलावर सुरू असून कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता व्यवहार सुरू आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे उपाध्यक्ष प्रा अशोक बाचुळकर यांनी स्वागत व प्रास्ताविकात सांगितले.
सूत्रसंचालन व श्रद्धांजली ठरावाचे वाचन संचालिका प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. विषय पत्रिका, मागील सभेचे इतिवृत्त, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, शासकीय लेखापरीक्षण व संचालक मंडळ कर्ज यादीचे वाचन मॅनेजर मधुकर खबरे यांनी केले. प्रकाश देसाई, सी. आर. देसाई, सुभाष देसाई, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, महादेव मोरुस्कर यांनी अभिनंदनाचा ठराव केला. आभार प्रा. सौ. क्रांती शिवणे यांनी मानले.
यावेळी आजरा शाखेचे संचालक प्राचार्य डॉ. अशोक सादळे, दिनकर पोटे, प्रा. आनंद चव्हाण, कृष्णा ढेकरे, युवराज शेटके, प्रा. तानाजी कांबळे, प्रा.सौ. नेहा पेंडणेकर, प्रा. सौ. क्रांती शिवणे, प्रदीप मोरे, मॅनेजर मधुकर खबरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, विभागीय अधिकारी विलास पाटील, शाखाधिकारी अरविंद कुंभार, गडहिंग्लजचे चेअरमन प्रकाश पोवार, कोल्हापूरचे चेअरमन प्रा. गोपाळ गावडे, गारगोटीचे चेअरमन प्रा. आनंद चव्हाण, इचलकरंजीचे चेअरमन प्रा. प्रकाश शिंदे, सांगलीचे चेअरमन प्रा. संजयकुमार गायकवाड, पाटणे फाटाचे चेअरमन प्रा.अशोक दोरुगडे व सर्व शाखांचे व्हा. चेअरमन, संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेला १ कोटी २५ लाख नफा; १० टक्के लाभांश मंजूर

आजरा : प्रतिनिधी
येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला अहवाल सालात १ कोटी २५ लाख २५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केल्याची माहिती चेअरमन दयानंद भुसारी यांनी ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलताना दिली.
संस्थेचे वसूल भाग भांडवल ४ कोटी ५८ लाख असून १९२ कोटी ८८ लाखांपेक्षा अधिक ठेवी आहेत. १६९ कोटी ३९ लाख कर्जवाटप व ३५४ कोटी १९ लाखांचा व्यवसाय केला आहे. बँक गुंतवणूक ५८ कोटी ५९ लाख असून संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
जनरल मॅनेजर सुरेश सावंत यांनी सभा नोटीस व आर्थिक पत्रकांचे वाचन केले. संचालक सुधीर चोडणकर यांनी श्रद्धांजली ठराव मांडला.
ठेवीदार, खातेदार व हितचिंतकांचा विश्वास हीच प्रगतीची ताकद असून सभासद व कर्मचारी वर्गाच्या कष्टावर संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे चेअरमन भुसारी म्हणाले.
यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा व ७० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद घुगरे, नूतन जनरल मॅनेजर सुरेश सावंत व माजी जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार यांचाही सत्कार करण्यात आला.
सभासद बंडोपंत चव्हाण, रामचंद्र इंजल, मारुती पाटील यांनी सूचना मांडल्या, त्यांना चेअरमन भुसारी, जी.एम. सावंत व माजी जी.एम. कुंभार यांनी उत्तरे दिली. सन २०२६-२७ साठी लेखापरीक्षक नेमणुकीचा अधिकार संचालक मंडळास देण्यात आला. २०० कोटी ठेवींचा टप्पा पार केल्याबद्दल सतिश कोंगेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.
यावेळी ज्येष्ठ संचालक नारायण सावंत, रविंद्र दामले, शिवाजी येसणे, गणपत जाधव, विश्वजीत मुंज, राजेंद्र चंदनवाले, मुकुंद कांबळे, संचालिका सुनिता कुंभार, सारिका देसाई, शाखा सल्लागार आनंदा मस्कर, निवृत्ती डोंगरे, तुकाराम पाटील, धनाजी कुंभार, आनंदा चौगुले, समिती सदस्य मलिककुमार बुरुड, अरुण देसाई, उत्तम कुंभार, माजी संचालक सुरेश कुंभार, संजय घंटे, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. व्हा.चेअरमन सुधीर कुंभार यांनी आभार मानले.

जागतिक रेबीज दिनानिमित्त उत्तूरमध्ये ४५ पाळीव प्राण्यांचे लसीकरण

उत्तूर : प्रतिनिधी
जागतिक रेबीज प्रतिबंधक दिनानिमित्त उत्तूर येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात कुत्रे व मांजरींसाठी विशेष मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४५ पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली.
रेबीजसारख्या प्राणघातक आजारापासून पाळीव प्राण्यांसह नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. शिबिराची माहिती आठ दिवसांपूर्वीपासून डिजिटल माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आल्याने परिसरातील पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. सी. मुल्येपोड यांनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली व जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.लसीकरण मोहिमेसाठी डॉ. निखिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सागर झेंडे-पाटील, दाजीबा पोटे, अमोल कांबळे आणि दयानंद अत्याळकर यांनी सहकार्य केले.

छाया वृत्त…

सोमवार दि.२८ रोजी महाराष्ट्र शासन कृषि विभाग – कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कोल्हापूर आयोजित जिल्हा रानभाजी महोत्सव २०२६ मध्ये रणरागिणी शेतकरी गट, बोलकेवाडी, ता. आजरा यांनी रानभाजी प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.

बामणादेवी ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था जेऊर यांच्याकडून महाराष्ट्रात सरकारी व अनुदानित शाळा वाचवण्यासाठी ५ ऑक्टोबर पासून मुंबई आझाद मैदान येथे सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी रुपये पाच हजारचा निधी आज लढ्याचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांच्याकडे जमा केला.
निधन वार्ता
वसंत मोहीते

पेरणोली ता. आजरा येथील वसंत बचाराम मोहिते ( वय ६६ वर्षे ,मुळगाव इंचनाळ ) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुल,गे सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सैनिक कुलदीप मोहिते यांचे ते वडील होत.

आजचे पंचांग

दिनांक : २९ सप्टेंबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : तृतीया तिथी (सायंकाळी ०५.०९ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (सकाळी ०९.०२ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : हर्षण योग (३० सप्टेंबर सकाळी ०३.१९ पर्यंत) त्यानंतर वज्र योग
करण : विस्ती भद्रा करण (सायंकाळी ०५.०९ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.२८ ते सायंकाळी ०४.५८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०५ ते दुपारी १२.५३
सूर्योदय : सकाळी ०६.३०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
दिंडी सोहळा…
ह.भ.प. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांच्या सप्ताहा निमित्त शिवाजीनगर येथील समाधी स्थळावरून दिंडीचा शुभारंभ आज दुपारी बारा वाजता होणार आहे.
