सोमवार दि.२८ सप्टेंबर २०२६

भरधाव ट्रक पलटी होऊन चालकाचा मृत्यू

आजरा : प्रतिनिधी
आजरा – उत्तरकडून आजऱ्याकडे येणारा आयशर ट्रक (क्र. MH 11 DV 1377) चालकाच्या ताब्यातून सुटून पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आंबेओहोळ पुलाजवळ, पेढारवाडी (ता. आजरा) येथे आजरा रोडवर हा अपघात झाला. ट्रक भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
या अपघातात ट्रक चालक रामलखन गंगाराम जाधव (वय ४०, रा. निंबर्गा, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हा गंभीर जखमी होऊन मयत झाला.
या घटनेची वर्दी पोलीस पाटील सुभाष आजरेकर (रा. पेढारवाडी) यांनी आजरा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

आजरा शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ; फिरणे झाले अवघड

आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे.
शहरातील बाजारपेठ, बस स्थानक परिसर, शाळा, महाविद्यालय परिसर आणि गल्ली-बोळात कुत्र्यांचे टोळके दिसत आहेत. सकाळी आणि रात्रीच्या वेळी ही कुत्री नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर येत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरीही नगरपंचायतीकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज येथे गणपती उत्सवानिमित झिम्मा फुगडी कार्यक्रम

आजरा : प्रतिनिधी
व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज येथे गणपती उत्सवानिमित झिम्मा फुगडी कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी या प्रशालेचे प्राचार्य एस. एन. पाटील , पर्यवेक्षिका व्ही.जे. शेलार , ज्युनिअर व्यवस्थापक एम. ए. पाटील आणि सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत गौरी गीते , पारंपरिक फुगडी झिम्मा इत्यादी खेळ सादर केले करून महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जोपासण्यात आली.

एकतेची आणि समतेची भाषा हिंदी – रमजान मुजावर

आजरा : प्रतिनिधी
भारत हा विविधता आणि अनेक संस्कृतींचा देश आहे. विविधतेमध्ये एकता असणारा एकमेव देश म्हणून भारत ओळखला जातो. विविधतेमध्ये एकता टिकवून ठेवण्याचे काम हिंदी भाषेने सातत्याने केले आहे, पुढेही करत राहील, असे प्रतिपादन रमजान मुजावर यांनी केले.
आजरा महाविद्यालयामध्ये हिंदी पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, भाषा ही मनुष्याची खरी संपत्ती आहे, तीच माणसाची खरी ओळख आहे. भाषा शिकणे, भाषा जपणे म्हणजे संस्कृती जपणे, परंपरा जपणे होय. तेव्हा प्रत्येकाने आपल्या व इतरांच्या भाषेचा आदर केला पाहिजे.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. किरण पोतदार होते. ते म्हणाले की, माणसाला अनेक भाषा अवगत असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. जितक्या जास्त भाषा, तेवढी जास्त विचारांची उंची असते.
यावेळी हिंदी दिवस व अण्णा-भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

ठराव धारक शेतात व गावीच , मग पडताळणीला कोण..? गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट
आजरा : प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येत असून ठराव पडताळणीवरून आता वाद निर्माण झाला आहे.काल कोल्हापूर येथे झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ठरावांच्या आकडेवारीची शहानिशा करण्यात आली. यावेळी ठरावधारक संस्थांची चाचपणी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कांही मूळ ठरावधारक हे कोल्हापूर बैठकीला न जाता गावीच आपल्या शेतात काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
त्यामुळे कोल्हापूर येथे नेमकी कोणाची पडताळणी झाली? मूळ ठरावधारक नसताना पडताळणी कशी झाली? याबाबत आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये ठराव पडताळणीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, कांहीं ठरावधारक शेतात,गावी असताना झालेल्या पडताळणीत ठराव धारकांच्या संख्येचा दावा , प्रत्यक्ष ठराव धारक आणि उपस्थित ठराव धारक यामध्ये कोणता ताळमेळ नसल्याने गोकुळ निवडणुकीत नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. गडहिंग्लजसह अनेक तालुक्यातील ठराव धारकांच्या बाबत वेगवेगळे आक्षेप नेते मंडळीं समोरच पक्षांतर्गत वादातून घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २८ सप्टेंबर २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (सायंकाळी ०७.१३ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : रेवती नक्षत्र (सकाळी १०.१५ पर्यंत) त्यानंतर अश्विनी नक्षत्र
योग : ध्रुव योग (सकाळी ०८.५३ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : तैतुला करण (सकाळी ०८.०८ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मीन राशी (सकाळी १०.१५ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५९ ते सकाळी ०९.२९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०५ ते दुपारी १२.५३
सूर्योदय : सकाळी ०६.३०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आज जागर
ह.भ. प. लक्ष्मण बुवा मोरजकर महाराज सप्ताह सोहळ्याचा आज सोमवारी जागर कार्यक्रम असून उद्या मंगळवारी दिंडीचा कार्यक्रम होणार आहे, तर बुधवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
