

मलिग्रे येथे तरुणीची आत्महत्या

आजरा : प्रतिनिधी
मलिग्रे ता. आजरा येथे शिवानी उत्तम लोहार या तेवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिवानी हिने राहत्या घराच्या माळ्यावरील लोखंडी पोलला गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबतची वर्दी उत्तम तुकाराम लोहार यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस हवालदार आनंदा नाईक पुढील तपास करीत आहेत.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

शहरवासीयांकडून अधिकाऱ्यांची व पाणी योजना ठेकेदारांची धुलाई…
रस्ते व पाणी प्रश्नी शहरवासीय आक्रमक

आजरा : प्रतिनिधी
अन्याय निवारण समितीने केलेल्या मागणीनुसार आजरा नगरपंचायतीच्या सभागृहात मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग व आजरा सुधारित पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची शहरवासीयांनी अक्षरश: धुलाई केली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये नवीन नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात वापरले जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, ठेकेदाराकडून हेतू पुरस्सर माहिती फलक न लावणे जाणे, नागरिकांच्या प्रश्नांना दिशाभूल करणारी उत्तरे देणे यावरून शहरवासीय चांगलेच संतप्त झाले होते. महामार्गाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार व महामार्गाचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना जबाबदार कोण ? असा सवाल यावेळी करण्यात आला. पाणीपुरवठा योजनेत कोणताही गैरप्रकार झाला तर प्रसंगी शहरवासीय पाणी पाजतील असा इशारा अधिकाऱ्यांना दिला गेला.

माजी ग्रामपंचायत सदस्य विजय थोरवत व समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची आपण गुणवत्ता तपासणी करून घेतली आहे असे यावेळी बामणे यांनी सांगितले. कामाच्या मंजुरीसाठी दिलेल्या इस्टिमेटमधील साहित्यानुसार हे साहित्य वापरले जात नसून ठेकेदार व अधिकारी वर्गाकडून चुकीची उत्तरे दिली जात असल्याने या योजनेचा ठेका रद्द करावा अशी मागणीही केली.
समितीचे उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी नळ पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक मुद्द्यावर आधारित प्रश्नांचा अधिकाऱ्यांवर भडीमार केला. इर्शाद बुड्डेखान, नौशाद बुड्डेखान व जेम्स फर्नांडिस यांनी चर्च गल्ली, दर्गा गल्ली येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित करून पाणीपुरवठा योजनेच्या गळत्यांकडे कर्मचारी वर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यांच्याकडून उद्धट उत्तरे दिली जातात असा आरोप केला.
यावेळी पाणीपुरवठा योजनेच्या एकंदर परिस्थिती बाबत दयानंद भोपळे, सलीम लतीफ, कुदरत लतीफ , शाकीर भडगावकर, भडगावकर,नाथा देसाई, विलास नाईक, अशोकअण्णा चराटी, सचिन भोई, पांडुरंग सावरतकर, अर्जुन भुइंबर आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले.
शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची हमी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल पाटील यांनी दिली. तर तातडीने पाणीपुरवठा योजनेचे माहिती देणारे फलक लावण्यात येतील असे पाणीपुरवठा योजनेचे शिवकुमार चौगुले व प्रकल्प सल्लागार एस.जी. जोशी यांनी सांगितले.

बैठकीस माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेवक आनंदा कुंभार,संभाजी पाटील, अनिरुद्ध केसरकर, सिकंदर दरवाजकर, किरण कांबळे,बापू पारपोलकर, प्रकाश सावंत, रमेश पाटील, कृष्णा यादव, भरत तानवडे, शरद कोलते यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकाऱ्यांना आज पाहिले…
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांना आज शहरवासीयांनी पाहिले असे सांगत राकेश करमळकर यांनी अधिकाऱ्यांनी बेजबाबदार पद्धतीने वागू नये व शहरवासीयांचा अंत पाहू नये अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले.
पाईप मातीखाली गेल्यावर फलक लावा…
नळ पाणीपुरवठा योजनेकरता वापरले जाणारे पाईप निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेचे पाईप मातीखाली गेल्यानंतर या वापरल्या जाणाऱ्या पाईपसह योजनेबद्दलची माहिती देणारे फलक लावावेत असा उपरोधिक सल्ला महेश दळवी यांनी अधिकाऱ्यांना दिला.
नवीन मालमत्ता नोंदणी शुल्क कमी करण्याचा निर्णय
नवीन मालमत्ता नोंदणी करण्याकरता नगरपंचायतीकडून आकारली जाणारे नोंदणी शुल्क प्रति लाख शंभर रुपये प्रमाणे करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली, तर त्याला मुख्याधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. शहरातील विस्कळीत झालेली नळ पाणीपुरवठा योजना दोन दिवसात सुरळीत होईल असे मुकादम सुरेश कांबळे यांनी स्पष्ट केले.


दिल्ली येथील संचलनात सहभागी छात्र सैनिकांचा हात्तीवडे येथे गौरव

आजरा: प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आर डी सी परेडमध्ये सहभागी झालेल्या हत्तीवडे येथील सानिका शंकर पाटील, मोरेवाडी येथील विठ्ठल धडाम व आजरा येथील प्राजक्ता केसरकर या तीन छात्र सैनिकांचा गौरव समारंभ हात्तिवडे येथे आजरा साखर कारखान्याचे संचालक विष्णुपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी सरपंच आणि आजरा साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील (हात्तीवडेकर) सरपंच सौ. शकुंतला सुतार व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना विष्णुपंत केसरकर म्हणाले, शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम अंगी बाणवण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी अत्यंत कष्टाने व मेहनतीने तालुक्याचा झेंडा दिल्ली दरबारी फडकवला आहे. कष्ट व मेहनतीच्या जोरावर यापुढेही त्यांनी तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यास हातभार लावावा असे आवाहन करत आजरा तालुक्याच्या दृष्टीने सानिका पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली दरबारी मिळालेला सन्मान ही अभिमानाची गोष्ट असल्याचेही स्पष्ट केले.
हात्तिवडे येथील माजी सरपंच संभाजी पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय अमनगी यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी सरपंच सौ. शकुंतला सुतार, उपसरपंच पांडुरंग पाटील, शिवाजी हरेर, दत्तात्रय खाडे,सदाशिव सुतार, सौ. सुमन पाटील, आप्पा पाटील, सुनील पाटील, सिताराम पाटील, अजित हरेर,विक्रम गोईडकर, संतोष बेलवाडकर, सुहास जोंधळे, विश्वास चव्हाण, शंकर पाटील, शामराव खांडेकर, विजय केसरकर यांच्यासह ग्रामपंचायत, स्थानिक सहकारी संस्था, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, महात्मा शिक्षण समितीचे पदाधिकारी, रोजरी इंग्लिश स्कूलचा शिक्षक वर्ग, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


पेरणोलीच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

आजरा:प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या पेरणोली शाखा कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या हस्ते व जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शाखाध्यक्ष नामदेव मोहिते व उपाध्यक्ष प्रशांत सोले यांनी दिली.
या उद्घाटन कार्यक्रमास भाजपाचे नेते शिवाजीराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर , नाथाजी पाटील, तालुका अध्यक्ष बाळ केसरकर, भगवान काटे, सचिन बल्लाळ, सुधीर कुंभार, जनार्दन टोपले, डॉ. सुधीर मुंज, अरुण देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित रहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


निधन वार्ता
केरबा कागिनकर

मलिग्रे ता्.आजरा येथील केरबा ज्ञानू कागिनकर (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरूवार दि. ८ रोजी आहे.



