

राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभाग यांच्याकडून लेखी स्पष्टता द्यावी.
उपविभागीय अधिकऱ्यांकडे मागणी

संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील चार तर आजरा तालुक्यातील तेरा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गडहिंग्लज तालुक्यात साधारण १.११५ किमी तर आजरा तालुक्यातील ६.५०० किमी अंतरातील संपादन करावे लागणार असल्याने महत्त्वाच्या मुद्द्यांच्यावर चर्चा झाली असून त्याची कार्यवाही तातडीने सुरु करण्यात यावी अशी मागणी संकेश्वर बांधा महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांच्याकडे करण्यात आली आहे.
यामध्ये प्राधान्याने पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली
१- संकेश्वर बांदा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावातून जाणार आहे त्या गावांतून तो नेमका कसा जाणार आहे त्याची स्पष्टता दर्शविणारा नकाशा त्या त्या गावचावाडीवर लावणे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता यांनी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत प्रत्येक गावचावडीवर नकाशा लावला जाईल असे सांगितले आहे.
२- नेमके किती क्षेत्र कोणाचे जाणार आहे त्याची माहिती त्या त्या गावच्या गावचावडीवर लावून ती लोकांसाठी ती खुली करण्याची सूचना मांडली असता तीही वरील तारखेपूर्वी लावण्याचे ठरले आहे.
३- महामार्गासाठी जमीन संपादन करीत असतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंची मोजणी होऊन त्या त्या संबंधित शेतकऱ्यांना त्याची माहिती देणे. संयुक्त मोजणी करतांना तोडलेल्या झाडांची नोंद घेतली पाहिजे. त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
४- आता अस्तित्वात असलेला रस्ता अजूनही मूळ शेतकऱ्याच्या नावावर आहे. त्याचा फेरफार अजून झालेला नाही. त्यामुळे त्याचेही संपादन होऊन त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री ना नितीन गडकरी यांच्यासोबत संपर्क करण्याची जबाबदरी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून तसा रिपोर्ट त्यांच्या कार्यालयाकडे कार्यालयाकडे पाठविण्याचे ठरले आहे.
५- या रस्त्यावर किती आणि कोणत्या ठिकाणी टोल नाके होणार आहेत त्याची माहिती मिळाली पाहिजे. आजरा या गावाशेजारी टोल नाका होणार असला तरी हा रस्ता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर नसल्याने व यासाठी लागणारा सर्व पैसा केंद्र सरकार देणार असल्यने टोल रद्द करावा.
६- रस्त्याचे बांधकाम करतांना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक निचरा होण्याचे जे मार्ग आहेत त्यांना इजा होणार नाही याची काळजी घेतली जावी. विशेषतः आजरा आणि गडहिंग्लज या गावात पावसाळ्याच्या काळात पाणी तुंबणार नाही या दृष्टीने रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे.
७- रस्त्याचे काम आता चालू असून मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रजातीच्या झाडांची तोड झाली आहे. त्या त्या विभागाची एक परिसंस्था असते. ती यामुळे तुटते म्हणून आमचे असे म्हणणे आहे कि ज्या गावातील झाडे तोडली जातील त्याचं गावात त्या त्या प्रजातीची लागवड एकास दहा या प्रमाणात केली पाहिजे.
८- शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या दराने मोबदला मिळाला पाहिजे.
वरील प्रश्नांची चर्चा चर्चा या दोन्ही बैठकांच्या मध्ये झाली असून या बैठकात झालेले निर्णय आणि शेतकऱ्यांच्या वतीने मांडलेल्या सूचना याची अमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी विनंतीही करण्यात आली आहे.
यावेळी कॉ संपत देसाई, सुधीर देसाई, प्रकाश मोरुस्कर
शांताराम पाटील चंद्रकांत जाधव,निवृत्ती अडकुरकर
गोपाळ पाटील ,आलेक्स बारदेस्कर उपस्थित होते.
………..
दुंडगे हद्दीत महामार्गाचे काम संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बंद पाडलेसाईड पट्टीमध्ये पूर्वीपासून असणारी पाण्याची पाईपलाईन फोडल्यानंतर शेतकरी संतप्त.

संकेश्वर -बांदा महामार्गाचे काम चालू केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष काँ.शिवाजी गुरव यांना शेतकऱ्यांनी दिली. गुरव यांनी संघटनेचे कार्यकर्ते जयवंत थोरवतकर यांना सूचना दिली त्याप्रमाणे थोरवतकर व अन्नासो पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम बंद पाडले. तसेच बाळाप्पा व साताप्पा नाईक रा.दुंडगे यांच्या शेतीची पाईपलाईन फोडल्याने शासनाचा निषेध केला.
अशीच ठिकाणे बदलून काम केल्यास सुरु केल्यास पुन्हा पुन्हा काम बंद केले जाईल. उद्यापासून संकेश्वर ते आंबोली पर्यंत महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन करून गस्त घातली जाणार आहे. ही गस्ती पथके काम चालू होताच शेतकऱ्यांना एकत्रित करून काम बंद आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याची जमीन मोजून त्याची मोजदाद करून सर्वे केला जात नाही, घरांचा सर्वे केला जात नाही तोपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचे काम करू दिले जाणार नाही असा निर्धार संघटनेने केला आहे.
दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी प्रांताधिकारी गडहिंग्लज यांना दूरध्वनीवरून संपर्क करून शेतकऱ्याच्या नुकसानी बाबत माहिती दिली व चर्चा केली.


आजरा हायस्कूल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक तर हॉलीबॉल स्पर्धेत मुले व मुली गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर १४ वर्षाखालीलमुलीच्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा हात्तीवडेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आल्या होत्या.
या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.स्पर्धेतील खेळाडू पुढीलप्रमाणे (कबड्डी) कोमल तेजस,दिक्षा वाजंत्री,मिसबा आगा,प्राची घेवडे, अनुष्का पोवार, श्रुती परीट,श्रृती का चाळके,दिव्या पोतनीस, सानिका मोहिते ,समिक्षा कदम सहभागी होते तर हॉलीबॉल स्पर्धेत (मुले) अभिनंदन बुरुड,जयंत परीट, रामचंद्र वास्कर, आयुष प्रधान,हर्षद लाड शुभम केसरकर, समर्थ टोपले त्याचबरोबर मुलीच्या संघात प्रेरणा लवटे ,मधुरा पारपोलकर, अंजली केसरकर,आदिती सुतार,गजाला बागवान, संस्कृती कुंभार सहभागी होते
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक एम. एस. गोरे ,एस. एच. मर्दाने,सौ. एम. पी. चव्हाण व ए. एस. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले .तर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री अशोकआण्णा चराटी मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल देशपांडे सचिव रमेश कुरुणकर मुख्याध्यापक शिवाजी येसणे उपमुख्याध्यापक बी एम दरी पर्यवेक्षक एस. पी. होलम प्रोत्साहन लाभले.




