‘आजरा अर्बन ‘ मार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील : डॉ. अनिल देशपांडे
बँकेची ६३ वी वार्षिक सभा उत्साहात

बँकिंग क्षेत्रामधील सर्व आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करून देण्यास आजरा अर्बन बँक प्रयत्नशील आहे. व्हाट्सअप बँकींगसह बँकेचा स्वतःचा क्यू आर कोड व यूपीआय सुविधा, एटीएम सेंटर द्वारे रकमा काढण्याच्या सुविधा, बँकेचा स्वतःचा आयएफएससी कोड, आरटीजीएस,लॉकर, पॅन कार्ड यासह विविध सेवा पुरवण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. बँकेकडून सध्या प्रधानमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग योजना व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई या कर्ज योजनेसह पंतप्रधान विश्वकर्मा योजना देखील राबवली जात आहे. या सर्व योजनांचा सभासद व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आजरा (मल्टीस्टेट) चे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. बँकेच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर फळणीकर व संचालक प्रकाश गुंडोपंत वाटवे यांच्यासह मान्यवरांच्या श्रद्धांजलीच्या ठराव बँकेचे उपाध्यक्ष रमेश करूणकर यांनी मांडला.
यावेळी बोलताना डॉ. देशपांडे पुढे म्हणाले, देशाच्या सकल उत्पादन दरामध्ये सहकार क्षेत्राचा वाटा अधोरेखित झाला आहे. सहकारातून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. बँकेमार्फत सभासद व ग्राहकांकरीता विविध योजना राबवल्या जात असून यामध्ये बँकेचे सभासद व कर्मचारी वर्गाचे योगदान निश्चितच मोठे आहे. बँकेच्या विविध ठिकाणी तीन नवीन शाखा मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ संचालक अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. अनुत्पादक कर्ज आणि थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी संचालक मंडळाचे विशेष प्रयत्न सुरू असून कर्ज वितरणात वाढ होण्याबरोबरच वेळेत कर्ज वसुलीसाठी बँकेने कर्जावर रिबेट योजना सुरू केली आहे असे स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून बँकेमार्फत शासनाच्या राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन सभासदांशी थेट संवाद साधला. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.

यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्यासह संस्थेच्या ७५ वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ सभासदांचा अध्यक्ष डॉ. देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
सभेमध्ये सभासद शंकर उर्फ भैया टोपले यांनी बँकेचे कार्यक्षेत्र गोवा राज्यामध्ये वाढवून मडगाव,म्हापसा व पणजी येथे शाखा सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत असा ठराव मांडला. दिवाकर नलवडे यांच्यासह सभासदांनी ठरावाला उत्स्फूर्तपणे मंजुरी दिली.
सभेस नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, आजरा सूतगिरणीचे संचालक जी.एम. पाटील,अनिकेत चराटी,विजयकुमार पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, शशिकांत सावंत, दशरथ अमृते, सौ. मनिषा कुरुणकर, डॉ. अंजनी देशपांडे, नारायण मुरकुटे, दिगंबर देसाई, यांच्यासह बँकेचे संचालक सुरेश डांग, डॉ. दीपक सातोसकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके ,सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनीस, सुनील मगदूम, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, ॲड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आदी मान्यवर, सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तानाजी गोविलकर यांनी केले.ज्येष्ठ संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.

आजरा शहरात पोलीसांचे संचलन

आजरा शहरात पोलीसांनी मंगळवार (ता. २६) रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संचलन (रुट मार्च) केले. अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद या अनुषंगाने हे संचलन झाले. आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन झाले.
आजरा – आंबोली मार्गावरील नवीन पोलीस ठाणे ते आंबोली रस्ता, येथील रवळनाथ राईस मिल ते आजरा महाविदयालय, त्यानंतर जय शिवराय गणेश मंडळ ते वाडा मशीद, छ. शिवाजी महाराजांचा पुतळा ते मुख्य बाजारपेठ व बसस्थानक असे संचलन झाले. आजरा पोलीस ठाण्याकडील दोन पोलीस अधिकारी, १९ अमलदार, १७ गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १६ कोल्हापूरच्या पथकातील अधिकारी व २४ अंमलदार यांनी संचलनात सहभाग घेतला.
संभाजी चौकात दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक…
येथील छत्रपती संभाजी चौक व बस स्थानकाच्या आवारात दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक पोलीसांनी सादर केले. राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १६ या पथकातील अधिकारी व अमलदार यामध्ये सहभागी झाले होते. सराव कवायत पहाण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

महिनाअखेर पर्यंत पेन्शन जमा न झाल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा…

अपंग, विधवा, परित्यक्त्या निराधार स्त्री पुरुषांना मिळणारी पेन्शन तीन महिने न मिळाल्याने गणपतीचा सण उसनवारीने करण्याची वेळ सर्व निराधार स्त्री- पुरुषांच्यावर शासनाने आणली. ह्या महिना अखेरपर्यंत पेन्शन न मिळाल्यास आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय तालुक्यातील अपंग, विधवा, परित्यक्त्या निराधार स्त्री पुरुषांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष् कॉ. संपत देसाई होते.
पेन्शन हा आमचा अधिकार असून ती कांही भीक नाही. या देशातील अपंग, विधवा, परित्यक्त्या, निराधार स्त्री पुरुषांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही पेन्शन राज्य आणि केंद्र शासनाने डाव्या पुरोगामी संघटनाच्या आंदोलनामुळे संयुक्तपणे सुरु केली. खरंतर ही पेन्शन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खात्यावर जमा होणे गरजेचे आहे. पण केवळ प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे आणि हालगर्जीपणामुळे ही पेन्शन वेळेवर मिळतं नाही. वेळेवर पेन्शन मिळावी यासाठी निराधार स्त्री पुरुषांना वेळोवेळी आंदोलन करावे लागणे हे क्लेशदायक आहे. हा शासनाचा आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. त्यामुळे येत्या महिना अखेर पर्यंत पेन्शन न मिळाल्यास आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी मुकुंद नार्वेकर, कृष्णा सावंत, दशरथ घुरे, प्रकाश मोरूस्कर, नारायण भडांगे, निवृत्ती फगरे, संतोष सुतार, पांडुरंग गाडे, बाळू पाटील, सुशीला होरंबळे, सरिता कांबळे, सर्जेराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आज-यात महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत महा-आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन दिप प्रज्वलन करून भा.ज.पा.चे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले व भा.ज.पा. तालुका अध्यक्ष अनिरुध्द ऊर्फ बाळ केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये सुमारे २०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास सुरेश पाटील, अनिल पाटील,धोंडीबा कवळीकट्टी,रोहित बुरुड,सुशील लतिफ,गौतम भोसले, तोफिक आगा, शुभम पाटील अभिजीत केसरकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

आजऱ्यात एक तारीख… एक घंटा उपक्रम

आजरा नगरपंचायत मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आजरा शहरामध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा २०२३” अंतर्गत दि. ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी एक तारीख – एक घंटा ( एक तारीख – एक तास) हा स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणावर आजरा शहरातील खालील
ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.
१. रामतीर्थ
२. वडाचा गोंड
३. आजरा महाविद्यालय, आजरा परिसर
४. आजरा हायस्कूल, आजरा परिसर
५. व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा परिसर
६. पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा परिसर
तरी नागरिकांनी जवळील ठिकाणी सकाळी ९.४५ वाजता उपस्थित राहावे. व या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. नागरिकांनी उपक्रम ठिकाणी उपस्थित राहताना सोबत पाण्याची बॉटल घेऊन यावे. तसेच आजरा शहरामध्ये प्लास्टिक बंदी ची १००% अंमलबजावणी असल्याने सोबत कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक वस्तू आणू नयेत असे आजरा नगरपंचायत मार्फत आवाहन करण्यात आले आहे.

आज शहरात…
♦शिवसेना प्रणित जय शिवराय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसाद व सायंकाळी सात वाजता महिलांसाठी हळदी – कुंकू कार्यक्रम
♦आजरा अर्बन बँकेची दुपारी २ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा
स्थळ:- अण्णा – भाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा हायस्कूल
♦अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीची स.११ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा
स्थळ :- सूतगिरणी साईट
♦आजरा तालुका खरेदी विक्री संघाची दू.१ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा
स्थळ :- डॉ.जे.पी. नाईक सभागृह, बाजार मैदान, आजरा
पाऊसपाणी…
गेल्या २४ तासात आजरा शहर व परिसरात ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गणेश दर्शन
श्री.बसवेश्वर तरुण मंडळ निंगुडगे.

अध्यक्ष :- पृथ्वीराज देसाई उपाध्यक्ष:- विशाल सरदेसाई सचिव:- बाबुराव पाटणे कार्याध्यक्ष :- सुनील देसाई खजिनदार कुलदीप सरदेसाई
विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होनेवाडी

अध्यक्ष : अक्षय सुतार. उपाध्यक्ष : आदिनाथ पाटिल सचिव : विशाल येजरे


