
गणेशोत्सवात वेळवट्टी येथील यादव कुटुंबियावर काळाचा घाला…

वेळवट्टी (ता. आजरा) येथील यादव कुटुंबीय गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून चारचाकीतून आजरा तालुक्यातील वेळवट्टी या गावी परतत होते. मात्र त्यांच्या गाडीला अंबप येथे १६ सप्टेंबर रोजी पहाटे अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गुरुनाथ तुकाराम यादव (वय ४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.
यादव हे मुंबई येथे चालक म्हणून काम करतात. गणेशोत्सवासाठी ते वेळवट्टी या आपल्या गावी ओमनी गाडीने पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत येत होते . अंबपजवळ आल्यावर त्यांची गाडी पुढील चारचाकीवर आदळली.
यामध्ये त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती. मुलाच्या पायाला मार लागला होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. गेले आठवडाभर सुरु असलेली त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तालुक्यातील दुसरी दुर्घटना…
गणेशोत्सवादिवशीच तालुक्यातील बोलकेवाडी येथील सचिन सुतार यांचा गणेश मूर्ती आणताना मृत्यू झाला तर केवळ आठवडाभरातच मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमी गुरुनाथ यादव यांचा अपघाती मृत्यू झाला.

बनावट धनादेश देणाऱ्यास शिक्षा

आजरा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आजरा या बँकेच्या प्रतिभा नगर शाखेतील थकीत कर्जदार अमोल बळवंत जाधव यांनी थकीत कर्ज परतफेड साठी दिलेला ४ लाख ९३ हजार रुपयांचा धनादेश न वटल्यामुळे त्यांना आजरा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. जाधव यांनी एक वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.दंड न भरल्यास ३ महिन्याची साधी कैद तसेच धनादेशातील नमूद रक्कम जाधव यांनी फिर्यादी बँकेस तीस दिवसांच्या आत देणे बाबतचा आदेश दिला आहे.
बँकेतर्फे ॲड. डी.डी. आजगेकर व ॲड. एस.टी. पाटील यांनी काम पाहिले.

शिक्षण विभागातील कंत्राटी नोकर भरती व सरकारी शाळांच्या खाजगीकरणास शिवसेनेचा विरोध

सरकारने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय नोकर भरती यापुढे खाजगीकरण व कंत्राटीकरणाद्वारे करण्यात येणार आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कंत्राटी कंपन्या मनमानी कारभार करतील व कर्मचाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. याचबरोबर शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणानुसार शाळांचे खाजगीकरण करून कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याच्या धोरणाला शिवसेनेने विरोध केला आहे.
शासनाने हे आदेश तातडीने मागे घ्यावेत अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले असून यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, राजेंद्रसिंह सावंत, उपजिल्हा ,संघटक संभाजी पाटील, आजरा शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, शाखाप्रमुख संजय मोहिते, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, मारुती मुळीक, विजय डोंगरे, तुषार भिऊंगडे, राजू गुरव, राजकुमार भोगन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. भावेश्वरी विकास सेवा संस्था मर्या. बुरुडे ता. आजरा या संस्थेची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात…

श्री. भावेश्वरी विकास सेवा संस्था मर्या. बुरुडे ता. आजरा या संस्थेची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक सातोसकर होते.
जेष्ठ संचालक आवणाप्पा होण्याळकर यांचे हस्ते श्री. भावेश्वरी देवीला हार अर्पण व पूजन करून सभेच्या कामकाजाची सुरूवात झाली. संस्थेचे सचिव श्री. दत्तात्रय पाटील यांनी विषय पत्रिका व अहवाल वाचन केले.
संस्थेच्या स्थापनेत योगदान असणारे संस्थेचे माजी सचिव अजित देसाई यांचे सेवा- निवृत्ती निमित्य आजरा सूतगिरणीचे संचालक शशिकांत सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन सचिव दत्तात्रय पाटील यांचा सत्कार डॉ. दीपक सातोसकर यांनी केला. संस्थेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘ अ ‘ असून, गेली ७ वर्षे संस्थेची थकबाकी शून्य टक्के(० %) असल्याबद्दल सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले.
संस्थेत नवीन सभासदांनी सामील व्हावे, त्यांनी आपल्या ७/१२ पत्रकाची नावाप्रमाणे फोड करून घ्यावी व इतर संस्थात असणाऱ्या सभासद ग्रामस्थांनी आपले सभासदत्व या संस्थेकडे वर्ग करून घ्यावे आदी सूचना सभासदांनी मांडल्या.
डॉ. दीपक सातोसकर यांनी आपल्या भाषणात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या धोरणानुसार छोट्या उद्योगांना व व्यवसायांना चालना मिळावी म्हणून, सभासदांनी संस्थेशी कायम संपर्कात राहून आपले व्यवहार वाढवावे असे सांगितले. संस्थेचा ऑडिट वर्ग ‘ अ ‘ व नफा कायम टिकावा यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे. तसेच संस्थेच्या कार्यालयासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी. म्हणजे इमारत बांधकाम करता येईल असे सांगितले. शशिकांत सावंत यांनीही मार्गदर्शन केले व आभार मानले.
सभेस व्हा. चेअरमन सुनील बागवे, नीलेश बागवे, राजाराम बागवे, विजय कांबळे, तसेच महिला संचालिका सौ. अश्विनी बागवे, व सौ. शोभा जोशीलकर यांच्यासह सभासद व मान्यवर उपस्थित होते.

आजरा साखर कारखानाप्रश्र्नी सभासद सुनील शिंदे आक्रमक…

आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी होत असून या सभेच्या पार्श्वभूमीवर सभासद सुनील शिंदे आक्रमक झाले असून त्यांनी कारखान्याच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर संचालक मंडळासमोर उपस्थित केलेल्या या प्रश्नांना संचालक मंडळ कसे सामोरे जाणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे
अभ्यासू सभासद अशी ओळख असणाऱ्या सुनील शिंदे यांचे प्रश्न पुढील प्रमाणे…
१. कारखान्याचा कर्मचारी पगार सहा कोटी ६८ लाख २६ हजार इतका खर्च पडला आहे. तो ६० टक्के प्रमाणे बरोबर आहे का? उर्वरित ४०% ची तरतूद कोठे केली आहे? तरतूद नसलेने भविष्यात देणे पगार कसा व कुठून देणार? पगाराची तरतूद केल्यास पगाराचा आकडा किती कोटींनी वाढणार? पर्यायाने चालू वर्षी नफा की तोटा?
२. कारखाना तोट्यामध्ये तसेच भरमसाठ कर्जामध्ये असताना जाहिरात व प्रसिद्धीसाठी रुपये १० लाख २३ हजार इतका खर्च करून कोणती जाहिरात केली?
३. कायदा व सल्लागार फि रुपये अकरा लाख ६९ हजार कोणाला व कशासाठी देण्यात आली?
४. मार्च २०२२ ला कारखान्यावरील कर्ज १८० कोटी ६५ लाख १४ हजार रुपये इतके होते तेच कर्ज मार्च २०२३ ला १९८ कोटी ९२ लाख ६१ हजार इतके झालेले आहे म्हणजे कर्जामध्ये यावर्षी १८ कोटी तीस लाख ४७ हजार इतकी वाढ झाली आहे मग त्यास कारखान्याची प्रगती म्हणावी की अधोगती?
५. सन २०१८ मध्ये कारखान्यावर एकूण कर्ज रुपये १२४ कोटी ८० लाख १९ हजार इतके होते. पुढील दोन वर्षे कारखाना बंद होता. त्यानंतर ३१ मार्च २०२३ रोजी असणारे कर्ज रुपये १९८ कोटी ९२ लाख ६१ हजार इतके झाले. सन २०१८ चे कर्ज वजा जाता कारखान्यावर नवीन कर्जाचा बोजा रुपये ८४ कोटी १२ लाख ४२ हजार रुपये वाढला आहे. याची जबाबदारी कोणाची?
६. कारखान्यात बेरिंग चोरी प्रकरण झाले होते. त्यासाठी आपण कारखान्यासोबत फौजदारी गुन्ह्याचे प्रकरण दाखल केले होते. याबाबतचा फौजदारी तपासाबाबतचा अहवाल संचालक मंडळाकडे लेखी स्वरुपात मागणी करूनही अद्याप त्याची प्रत देण्यात आलेली नाही. कारखान्याच्या सभासदांनी या प्रकरणाविषयी काय अर्थ घ्यायचा?
यासह अन्य शिंदे यांनी उपस्थित केले असून कारखाना अध्यक्ष, व्यवस्थापन व संचालक मंडळ या प्रश्नांना नेमकी काय उत्तरे देणार याकडे तालुकावासीयांचे व सभासदांचे लक्ष लागून आहे.
आज शहरात…
♦आजरा तालुका भाजपाच्या वतीने अण्णा-भाऊ सांस्कृतिक हॉलमध्ये सेवा पंधरवड्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर
♦गणेशोत्सवानिमित्त लिंगायत गल्ली,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत दुपारी बारा ते चार या वेळेत महाप्रसाद
♦सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रवळनाथ मंदिर) येथे सायंकाळी सजीव देखाव्याचे उद्घाटन
…गणेश दर्शन…
श्री गणेश संस्कृती कला व क्रीडा मंडळ उत्तुर

अध्यक्ष :- महेश लोहार उपाध्यक्ष :- वैभव घेवडे खजिनदार ;- संजय गुरव. सचिव :- स्वराज जाधव
बाजारपेठ मित्र मंडळ उत्तुर

अध्यक्ष :- शिरीष (बाबू) धुरे
उपाध्यक्ष :- हर्षित पाटील
खजिनदार :- राजू यळकुद्रे,
सचिव :- सिद्धिविनायक आमनगी
मुरुडेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुरुडे

अध्यक्ष :- पांडुरंग बबन हरेर
उपाध्यक्ष :- प्रवीण पांडुरंग पोवार
सचिव :- राहुल कुंडलिक राणे



